03 December 2020

News Flash

नोटाबंदीनंतरची सर्वात मोठी आपटी

सेन्सेक्समध्ये टाटा सन्स समूहातील टाटा स्टीलचा समभाग सर्वाधिक, ४.७० टक्क्यांनी घसरला.

प्रतिकात्मक छायाचित्र

उत्तर कोरियाच्या युद्धखोर धमकीचा धसका *  सेन्सेक्स ३२ हजारांखाली, तर निफ्टीची १० हजाराखाली गाळण

आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तर कोरियाची अमेरिकेविरुद्ध नवीन युद्धखोर धमकी, तर स्थानिक पातळीवर वित्तीय तुटीत वाढीची पर्वा न करता आर्थिक उभारीला चालना देणाऱ्या प्रोत्साहन योजना आणण्याच्या सरकारच्या संकेतांचा भांडवली बाजाराने चांगला धसका घेतल्याचे शुक्रवारी दिसून आले. याचा परिपाक म्हणजे सप्ताहअखेर बाजारात वर्षभरातील सर्वात मोठी आपटीतून दिसला.

तब्बल ४४७.६० अंशांच्या घसरगुंडीसह सेन्सेक्स ३१,९२२.४४ वर आला, तर १५७.५० अंश आपटीसह निफ्टी ९,९६४.४० पर्यंत येऊन ठेपला. दोन्ही निर्देशांक आता त्याच्या महिन्याच्या सुरुवातीला असलेल्या टप्प्यानजीक येऊन पोहोचले आहेत. मंदीवाल्यांना जोर चढून एकाच व्यवहारात झालेल्या मोठय़ा घसरणीने सेन्सेक्सने त्याचा ३२,००० चा तर निफ्टीने १०,००० चा भावनिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण टप्पा शुक्रवारी सोडला.

मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक शुक्रवारी एक टक्क्याहून अधिक प्रमाणात घसरण राखताना त्याच्या अनोख्या टप्प्यापासूनही ढळला. दोन्ही निर्देशांकांनी १५ नोव्हेंबर २०१६ नंतर सत्रातील सर्वात मोठी आपटी आठवडय़ाच्या शेवटच्या व्यवहारात नोंदविली. वर्षभरापूर्वी बाजारात एकाच सत्रात नोंदले गेलेल्या मोठय़ा निर्देशांक आपटीला नोटाबंदीचे कारण होते.

उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी करण्याची दिलेली धमकी आणि पतमानांकन संस्थेकडून झालेली चीनची पतझड या परिणामी विशेषत: आशियाई बाजारात घसरण झाली. परिणामी, येथील बाजारातील व्यवहारदेखील सुरुवातीपासूनच किमान स्तरावर आले. त्यातच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी येथील केंद्र सरकारतर्फे आर्थिक सहकार्य करण्याच्या संकेतानंतर वित्तीय तूट वाढण्याच्या भीतीने निर्देशांकातील घसरण दिवसअखेपर्यंत विस्तारत गेली.

डॉलरच्या तुलनेत गेल्या अडीच महिन्यांच्या तळात पोहोचणाऱ्या रुपयांची धास्तीही गुंतवणूकदारांच्या विक्री व्यवहारामध्ये उमटली. स्थानिक चलनाने गुरुवारी अमेरिकी डॉलरपुढे तब्बल ५४ पैशांची नांगी टाकली होती. अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हकडून व्याजदर वाढीचे संकेत दिल्याने डॉलर भक्कम होत आहे. कमकुवत अर्थव्यवस्थेमुळे चीनचे पतमानांकन खालावण्याचे सावट आशियाई बाजारात उमटले आहेत.

सेन्सेक्समध्ये टाटा सन्स समूहातील टाटा स्टीलचा समभाग सर्वाधिक, ४.७० टक्क्यांनी घसरला. तर लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, हिरो मोटोकॉर्प, स्टेट बँक, अदानी पोर्ट्स आदीही घसरणीच्या यादीत राहिले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता ४.२९ टक्क्यांसह घसरणीच्या यादीत अग्रेसर राहिला. त्याचबरोबर भांडवली वस्तू, ऊर्जा निर्देशांकही घसरले. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल कॅप व मिड कॅप निर्देशांकांमध्ये थेट तीन टक्क्यापर्यंतची घसरण नोंदली गेली.

सप्ताह तुलनेत मुंबई निर्देशांकाने ३५०.१७ तर निफ्टी १२१ अंशांचे नुकसान सोसले आहे.

२.६८ कोटींची मत्ता लयाला

सप्ताहअखेरच्या एकाच व्यवहारात वर्षभरातील सर्वात मोठी निर्देशांक आपटीला सामोरे जाणाऱ्या मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची मालमत्ता २.६८ लाख कोटी रुपयांनी रोडावली. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आता १.३३ लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2017 3:25 am

Web Title: sensex falls below 32000 points
टॅग Sensex,Share Market
Next Stories
1 टाटा सन्स आता प्रायव्हेट लिमिटेड!
2 अर्थव्यवस्था गडबडल्याची कबुली
3 म्युच्युअल फंड मालमत्तेत बँक ठेवींच्या पाचव्या हिश्शापर्यंत अभूतपूर्व वाढ
Just Now!
X