६२३ अंश झेप घेत सेन्सेक्स सार्वकालिक उच्चांकावर

मुंबई : भाजपासह केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने निकालपूर्व अंदाजापेक्षा सरस संख्येने बहुमत मिळविल्याचे हर्ष दलाल स्ट्रीटवर दुसऱ्या दिवशीही दिसून आला. शुक्रवारी भांडवली बाजारात निर्देशांकांच्या सार्वकालिक उच्चांक स्थापणाऱ्या झेपेत याची परिणती दिसली.

सप्ताहअखेरच्या एकाच व्यवहारातील ६२३.३३ अंश उसळी घेत मुंबई निर्देशांक ३९,४३४.७२ वर पोहोचला. तर १८७.०५ अंश झेप घेताना राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ११,८४४.१० पर्यंत स्थिरावला.

दोन्ही निर्देशांकातील १.६१ अंशापर्यंतच्या वाढीने सेन्सेक्स व निफ्टी हे आता त्याच्या विक्रमी टप्प्यानजीक पोहोचले आहे. तर शुक्रवारच्या तेजीव्यवहारामुळे मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची मालमत्ता एकाच सत्रात २.५३ लाख कोटींनी वाढली.

व्यवहारात मुंबई निर्देशांक ३९,४७६.९७ पर्यंत व राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ११,८५९.०० अंशांपर्यंत उंचावला होता. तर चालू सप्ताहात सेन्सेक्समध्ये १,५०३ अंश व निफ्टीत ४३७ अंशांची भर पडली आहे.

नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे करणाऱ्या भाजपला १७ व्या लोकसभेत ३०० नजीक, तर त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३५० पर्यंत जागा मिळाल्या आहेत. त्याचे जोरदार स्वागत गुंतवणूकदारांनी केले.

बहुमतानजीक जाणारा गुरुवारचा कल पाहिल्यानंतर सेन्सेक्सने व्यवहारात सर्वोत्तम ४०,००० चा स्तर अनुभवला होता. तर शुक्रवारी बाजाराची सुरुवात करतानाच मुंबई निर्देशांक ४०० अंशांच्या वाढीसह वाटचाल करता झाला.

सेन्सेक्समधील ३० पैकी २६ समभागांचे मूल्य वाढले. तर ४ समभाग घसरणीच्या यादीत राहिले. वाढलेल्या समभागांमध्ये आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो, भारती एअरटेल, वेदांता, टाटा मोटर्स यांचे मूल्य ४.६० अंशांपर्यंत राहिले.

मुंबई निर्देशांकातील एनटीपीसी, एचसीएल टेक, टीसीएस, हिंदुस्थान यूनिलिव्हर यांचे मूल्य मात्र खाली आले. सर्व १९ क्षेत्रीय निर्देशांक वाढले. त्यातही स्थावर मालमत्ता, भांडवली वस्तू, दूरसंचार, वाहन आदी ४.२५ टक्क्यांपर्यंत वाढले.

स्मॉल व मिड कॅप निर्देशांकांचीही कामगिरी तेजी नोंदविणारी ठरली. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या जवळपास तीन महिन्यांमध्ये खनिज तेलाच्या किमती ५ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याची दखलही बाजारात घेतली गेली. डॉलरच्या तुलनेत भक्कम रुपयाचेही स्वागत झाले.

सेन्सेक्सचा पाच वर्षांत ५१ टक्के परतावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या पहिल्या पर्वात सेन्सेक्सने ५१ टक्के परतावा दिला आहे. तुलनेत मनमोहनसिंग सरकारच्या पहिल्या पाच वर्षांच्या कालावधीत (२००४ ते २००९) मुंबई निर्देशांकाने तब्बल १८० टक्के परतावा दिला होता. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या पहिल्या सरकारच्या कारकीर्दीत सेन्सेक्सने २४५ वेळा व्यवहारातील सर्वोच्च स्तराला स्पर्श केला. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पहिल्या पाच वर्षांत ११८ वेळा सेन्सेक्सने सत्रात शिखराला गवसणी घातली.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २.५३ लाख कोटींची भर

आठवडय़ातील शेवटच्या व्यवहारातील सेन्सेक्समधील उसळीमुळे एकूण भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २.५३ लाख कोटी रुपयांची भर पडली. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य शुक्रवारअखेर १५२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

दुसऱ्या शपथविधीला कोणता टप्पा?

निकालाचे स्वागत म्हणून गुरुवारी  सेन्सेक्सने ४०,००० ला गाठले होते. तर यापूर्वी, २६ मे २०१४ रोजी बहुमत गाठणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाखालील नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला, मुंबई निर्देशांकाने सर्वप्रथम २५,००० चा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे मोदी यांच्या दुसऱ्या शपथविधीला सेन्सेक्स कोणता स्तर गाठतो, हे येत्या काही दिवसांमध्येच स्पष्ट होईल. नवे सरकार दोन आठवडय़ांत सत्तेत येणे अनिवार्य आहे.