निफ्टी ७ हजारापर्यंत?
आगामी नव्या सरकारवर देशाच्या पतमानांकनाची भिस्त अवलंबून असेल, असा सावध इशारा ‘स्टॅण्डर्ड अ‍ॅण्ड पूअर्स’ने दिला असतानाच भांडवली बाजाराच्या मुख्य निर्देशांकाच्या अंदाजाची झेप मात्र अधिकाधिक उंचीवर नेली जात आहे. चालू आर्थिक वर्षांबरोबर आगामी संपूर्ण २०१४ वर्षांसाठी सेन्सेक्ससह निफ्टीच्या नव्या उच्चांकाकडे झेप कायम राहिल, असा अंदाज आतापासूनच बांधला जात आहे.
नोमुरा फायनान्शियल अ‍ॅडव्हायजरी अ‍ॅण्ड सिक्युरिटीजने मुंबई निर्देशांकाचा मार्च २०१४ अखेरचा प्रवास सध्याच्या ऐतिहासिक टप्प्यापेक्षाही अधिक राहिल, असे म्हटले आहे. वित्तसंस्थेच्या अंदाजानुसार चालू आर्थिक वर्षअखेर सेन्सेक्स २२ हजाराचा टप्पा ओलांडेल. नोमुराने यापूर्वीचा २०,००० चा अंदाज सुधारित करताना तो अधिक उंचावला आहे.
केंद्रात नव्या सरकारनंतर अर्थव्यवस्थेतही अनपेक्षित बदलांची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आगामी सरकारद्वारे अर्थव्यवस्थेच्या सुधारासाठी आवश्यक पावले नक्कीच उचलली जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
गोल्डमॅन सॅच या अन्य एका पतमानांकन संस्थेचे आशिया पॅसिफिक विभागाचे प्रमुख टिमोथी मो यांनी निफ्टीचा आगामी स्तर ६,९०० असेल, असे म्हटले आहे. त्यांच्या अंदाजानुसार राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक त्यांनी वर्तविलेल्या ५,७०० या अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक असेल.
नव्या सरकारने प्रगतीपथ कायम न राखल्यास सध्याच्या उणेस्थितीतील भारताचे पतमानांकन खालावण्याची भिती ‘एस अ‍ॅण्ड पी’ने दोनच दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. असे असताना भांडवली बाजाराविषयीचा आशावाद उसळून आला आहे.