सुधीर जोशी -sudhirjoshi23@gmail.com

याआठवडय़ातील वर्षअखेरच्या दोन दिवसांत बाजाराने नरमाई दाखवली. नवीन वर्षांच्या सुरुवातीलादेखील सुट्टीच्या वातावरणामध्ये बाजारातील व्यवहारात एकंदर मरगळ जाणवली. पण दोन तारखेला खऱ्या अर्थाने व्यवहाराची सुरुवात होताच बाजाराने अपेक्षित उसळी घेतली. अखेरच्या दिवशी अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया देऊनही दिवसअखेर बाजार सावरला आणि साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्समध्ये १११ अंशांची तर निफ्टी निर्देशांकात १९ अंशांची किरकोळ घट झाली.

पुढील पाच वर्षांत पायाभूत क्षेत्रातील १०२ लाख कोटी गुंतवणुकीचा आराखडा अर्थमंत्र्यांनी सादर केला. त्यामध्ये ऊर्जा क्षेत्राला सर्वात मोठा (२५ टक्के) वाटा असून त्याखालोखाल रस्ते विकास, रेल्वे व शहरी सुविधांना प्राधान्य मिळाले आहे. गेल्या सहा वर्षांत ५१ लाख कोटी रुपये खर्च झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही मोठी झेप आहे. सिमेंट व बांधकाम व्यवसायातील कंपन्यांसाठी ही सकारात्मक बाब आहे.

विकास दर, कर संकलन, रोजगार, सर्वच उद्योगांमधील मंदी अशा अनेक आर्थिक आघाडय़ांवर असलेली नकारात्मकता आणि त्याला अवकाळी पाऊस, जागतिक व्यापार युद्ध, थकीत कर्जे व आर्थिक घोटाळे यांनी घातलेले खतपाणी अशा वातावरणात पार पडलेल्या २०१९च्या वर्षांत प्रमुख निर्देशांकातील वाढ पाहता गुंतवणूकदार मात्र दशलक्ष कोटींनी श्रीमंत झाले! गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलियोमध्ये जर दहा टक्क्यांहून कमी वाढ झाली असेल तर पोर्टफोलियोमध्ये मिड कॅप व स्मॉल कॅप समभागांचा भरणा जास्त असू शकतो, ज्यांची कामगिरी गेली दोन वर्षे सुमार राहिली आहे, किंवा चुकीच्या कंपन्यांची निवड केली असू शकते. गुंतवणुकीसाठी निवडलेल्या कंपन्या त्या क्षेत्रामधील आघाडीच्या कंपन्या असणे जरुरीचे आहे.

सरकारच्या भांडवली खर्चाच्या तुलनेत घटलेल्या कर संकलनामुळे चालू आर्थिक वर्षांत वित्तीय तूट वाढण्याची शक्यता आहे. वित्तीय तूट वाढण्यास मुख्यत्वे अर्थसंकल्पातील अंदाजित वृद्धी दराची कमी वाढ हे मुख्य कारण आहे. अर्थसंकल्पातील ८ टक्के वद्धीदराऐवजी आठ महिन्यांतील प्रत्यक्षातील वाढ केवळ तीन टक्के आहे. दुसरे कारण कंपनी आयकराचा दर ३० टक्क्यांवरून २२ टक्के करणे. सरकारला अर्थसंकल्पात अंदाजित निर्गुतवणुकीच्या तुलनेत आठ महिन्यांत प्रत्यक्ष निर्गुतवणूक केवळ १७ टक्के झाली आहे. परंतु सर्व नकारात्मक बाबी मागे टाकून बाजार जागतिक व्यापार युद्धाच्या पहिल्या टप्प्यातील तहाकडे आशेने पाहात आहे आणि भारत सरकारच्या पायाभूत सुविधांना बळ देऊन अर्थव्यवस्था भक्कम करण्याच्या प्रयत्नांना महत्त्व देतो आहे. परदेशी गुंतवणूकदारांची त्याला साथ मिळत आहे. २०१९ मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी एका लाख कोटींहून जास्त रुपयांची गुंतवणूक केली जो गेल्या सहा वर्षांतील उच्चांक आहे. त्यातील बरीचशी गुंतवणूक वर्षअखेर केली गेली.

नवीन वर्ष धातू उद्योगासाठी आणि निवडक सरकारी व आघाडीच्या खासगी बँकांसाठी चांगले जाण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पुढील तिमाही निकालांवर नजर ठेवून यामध्ये गुंतवणूक करायला हवी. पुढील आठवडय़ात तिसऱ्या तिमाहीच्या निकालांची सुरुवात नेहमीप्रमाणे माहिती तंत्रज्ञानातील आघाडीच्या कंपन्यांच्या निकालांनी होत आहे. नजीकच्या काळात तिमाही निकाल व अर्थसंकल्पाकडे लक्ष ठेवून बाजाराची वाटचाल सुरू राहील.