बँकांचे खातेदार, ठेवीदार, विमा पॉलिसीधारक ते म्युच्युअल फंडांचे गुंतवणूकदार म्हणून आपल्या प्रत्येकाला या सेवांच्या बऱ्या-वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते. तुमच्या अशाच वित्तीय सेवाविषयक शंका-प्रश्नांचे तज्ज्ञांद्वारे समाधान करणारे सदर..

आज आपण म्युच्युअल फंड उद्योगाच्या अकाऊंट स्टेटमेन्ट (खाते-पत्र) या एका महत्त्वाच्या मुद्दय़ाचा विचार करणार आहोत. गुंतवणूकदाराला त्याच्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या महत्त्वाच्या तपशिलाची माहिती या अकाऊंट स्टेटमेन्टद्वारे मिळते. पूर्वी पत्रव्यवहारासाठी फक्त पोस्ट/कुरिअर किंवा ई-मेल या माध्यमांपुरत्याच सुविधा मर्यादित होत्या. आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांमुळे आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्युच्युअल फंडांद्वारा नावीन्यपूर्ण पद्धतींचा उपयोग केला जातो. म्युच्युअल फंडांकडून पत्रव्यवहार मिळविण्यासाठी तुमची अचूक ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे अतिशय महत्त्वाचे आहे.

  • अकाऊंट स्टेटमेन्ट म्हणजे काय?

अकाऊंट स्टेटमेन्टमध्ये व्यवहाराचा तपशील आणि म्युच्युअल फंडातील त्याच्या गुंतवणुकीचे त्या तारखेचे मूल्य दर्शविले जाते. यामध्ये गुंतवणूकदाराच्या एकंदर गुंतवणुकीची माहिती देखील दिली जाते.

  • म्युच्युअल फंडाचा ‘फोलिओ’ क्रमांक म्हणजे काय?

म्युच्युअल फंडात फोलिओ क्रमांक ही अतिशय महत्त्वपूर्ण प्रणाली आहे. एखाद्या बँकेच्या खाते क्रमांकाप्रमाणे संबंधित म्युच्युअल फंडातील तुमच्या गुंतवणुकीबद्दलची संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी हा एक खास क्रमांक दिला जातो. हा खास क्रमांक प्रत्येक फंड घराण्याचा वेगवेगळा असतो.

  • गुंतवणुकीचे अकाऊंट स्टेटमेन्ट कसे मिळेल?

गुंतवणूकदार खालील पद्धतीने अकाऊंट स्टेटमेन्टची विनंती करू शकतात :

  • वेबस्थळ : गुंतवणूकदार फंड घराण्याच्या वेबस्थळावर लॉग-इन करून नोंदणी केलेल्या ई-मेल आयडीवर अकाऊंट स्टेटमेन्टची विनंती करू शकतात.
  • संपर्क केंद्र : गुंतवणूकदार संबंधित एएमसीच्या कस्टमर केअर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून इंटरअ‍ॅक्टिव्ह (संवादात्मक), व्हॉइस रिस्पॉन्सच्या (आयव्हीआर) मदतीने अकाऊंट स्टेटमेन्टची विनंती करू शकतो. किंवा ग्राहक सेवा प्रतिनिधी यांना विनंती करून अकाऊंट स्टेटमेन्ट मागवू शकता. ई-मेलवर अथवा ई-मेल आयडी नोंदविली नसल्यास, छापील अकाऊंट स्टेटमेन्ट पोस्टाने पाठविण्यात येते.
  • ई-मेल, एसएमएस : म्युच्युअल फंडाच्या खास कस्टमर केअर ई-मेल आयडीवर मेल पाठवून अथवा खास क्रमांकावर एसएमएस पाठवून नोंदणी केलेल्या आपल्या ई-मेल आयडीवर अकाऊंट स्टेटमेन्ट मिळविता येते. बहुतेक म्युच्युअल फंडाद्वारा ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
  • एएमसी शाखा : गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही शाखेत जाऊन अकाऊंट स्टेटमेन्टसाठी विनंती करू शकतो.
  • मोबाइल अ‍ॅप : काही म्युच्युअल फंडांनी मोबाइल अ‍ॅप सुरू केले आहेत. त्याचा वापर करून सोयीस्कररीत्या गुंतवणूकदार त्यांचे अकाऊंट स्टेटमेन्ट डाऊनलोड करू शकतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सुविधा एएमसीद्वारे विनामूल्य पुरवल्या जातात.

कन्सॉलिडेटेड अकाऊंट स्टेटमेन्ट (कॅस) म्हणजे काय?

‘कॅस’ हे असे अकाऊंट स्टेटमेन्ट आहे जे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजन्ट्स ‘पॅन’ वरून वेगवेगळ्या फंड घराण्यांमधील सामायिक गुंतवणूकदारांची समग्र गुंतवणूक निश्चित करतात. ई-मेल आयडी उपलब्ध असल्यास ई-कॅस पाठविण्यात येते अन्यथा छापील प्रत पोस्टाने पाठविण्यात येते. कॅस दर महिन्याला पाठविले जाते. डिमॅट खातेदारांसाठी हेच काम डिपॉझिटरीकडून केले जाते.

  • मी व्यवहार न केल्यास, मला माझ्या गुंतवणुकीची स्थिती कशी समजेल?

सर्व म्युच्युअल फंड दर सहा महिन्यांच्या अखेरीस (म्हणजे सप्टेंबर/मार्चअखेर), त्या कालावधीत ज्यांच्या फोलिओमध्ये काहीही व्यवहार करण्यात आलेला नाही अशा सर्व गुंतवणूकदारांना सर्व योजनांमधील धारणांचा तपशील देणारे ‘कॅस’ पाठवितात.

गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी ‘अटाक ’ (असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया) हा संघटित उपक्रम असून गुंतवणूकदारांना त्यांच्या म्युच्युअल फंडांमधील धारणेचा एकत्रित तपशील ई-कॅस मेल-बॅक सेवेद्वारा मिळविता यावा यासाठी तो सुरू करण्यात आला आहे आणि म्युच्युअल फंड क्षेत्रात तो सुप्रस्थापित आणि मान्यताप्राप्त आहे. सर्व गुंतवणूकदारांसाठी त्यांनी   https://www.amfiindia.com/investor-corner/online-center/download-CAS.html  हा दुवा दिला आहे.

 

– भालचंद्र जोशी

(लेखक गेली २७ वर्षे बँकिंग आणि आर्थिक सेवा क्षेत्रात कार्यरत असून, सध्या रिलायन्स म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार सेवा आणि ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख आहेत.)