महसुली थकबाकी भरण्यासाठी देण्यात आलेल्या चार वर्षांच्या स्थगिती कालावधीचा (मोरॅटोरियम) पर्याय स्वीकारत असल्याचे व्होडाफोन-आयडियाने बुधवारी जाहीर केले. केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या महिन्यात दूरसंचार क्षेत्राला दिलासा देणाऱ्या घेतलेल्या निर्णयाप्रमाणे हा पर्याय स्वीकारणारी ही पहिलीच कंपनी आहे. 

‘एजीआर’संबंधित थकबाकी चुकती करण्यास दिल्या गेलेल्या चार वर्षांच्या स्थगितीचा लाभ घेण्याच्या पर्यायाचा स्वीकार करायचा की नाही हे ठरविण्यासाठी दूरसंचार कंपन्यांना येत्या २९ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. व्होडाफोन-आयडियाने या सवलतीचा वापर करण्यासह ध्वनिलहरी (स्पेक्ट्रम) वापर शुल्काशी संबंधित बँक हमी कधी परत मिळेल याबाबतही दूरसंचार विभागाकडे विचारणा केली आहे.

केंद्र सरकारने मुभा दिल्याप्रमाणे, व्होडाफोन-आयडिया, भारती एअरटेल, रिलायन्स कम्युनिकेशन्स या आर्थिक चणचणीत असलेल्या दूरसंचार कंपन्यांना, पुढील चार वर्षांपर्यंत ‘एजीआर’ थकबाकीचा एक रुपयाही सरकारकडे भरावा लागणार नाही. यामुळे त्यांच्यावरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच दूरसंचार क्षेत्रासंबंधी सरकारने हाती घेतलेल्या अन्य सुधारणांमुळे सुमारे २५,००० कोटी रुपयांची वार्षिक बचत या कंपन्यांना शक्य होणार आहे.

ग्राहकसंख्येत जिओची आघाडी

मुंबई : नवीन ग्राहक जोडण्यात रिलायन्स जिओने ऑगस्ट महिन्यात पुन्हा आघाडी घेतली आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जिओने ६.४९ लाख नवीन ग्राहक जोडले असून ग्राहकांची संख्या ४४.३८ कोटींवर पोहोचली. तर भारती एअरटेलने १.३८ लाख ग्राहक जोडले आहेत. एअरटेलच्या ग्राहकांची संख्या ३५.४१ कोटी झाली. ऑगस्टमध्ये व्होडाफोन-आयडियाने ८.३३ लाख ग्राहक गमावले आहेत. मात्र जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात सेवा नाकारणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत तिने घट नोंदविली आहे. परिणामी ऑगस्टअखेर तिच्या ग्राहकांची संख्या २७.१ कोटींवर आली आहे.