गेल्या ४० वर्षांतील कमालीच्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांना दोन बडय़ा राष्ट्रीयीकृत बँकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. सामाजिक दायित्वाचा भाग म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रने मुख्यमंत्री मदत निधी (दुष्काळ-२०१३) साठी रु. २.५१ कोटींचे तर भारतीय स्टेट बँकेने रु. २ कोटींची देणगी अलीकडेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन दिली.
राज्य स्तरीय बँक समिती (एसएलबीसी)ची निमंत्रक या नात्याने बँक ऑफ महाराष्ट्रने या आधीच दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन, सध्याच्या कर्जाची पुनर्रचना, सिंचन, पशूधन खरेदीसाठी नव्या कर्जाना मंजुरी, परतफेड कालावधीत पाच वर्षांची वाढ, लघुउद्योग व कुटिरोद्योगांचे पुनर्वसन असे उपाय हाती घेतले आहेत. पुनर्वसन प्रक्रियेस गती देण्यासाठी ताबडतोबीने योग्य तो निर्णय घेण्याचे अधिकार देणारे शाखाधिकाऱ्यांचे सक्षमीकरणही बँकेने केले आहे. स्टेट बँकेनेही दुष्काळग्रस्त भागातील ग्रामीण व निमशहरी प्रत्येकी ५००० लिटर क्षमतेच्या ३०० पाण्याच्या टाक्या बसविण्याचे काम सुरू आहे. या कामावर बँकेतर्फे १ कोटींची रक्कम खर्च केली जाणार आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र सिंग यांनी तर स्टेट बँकेच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक ए. कृष्णकुमार यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सदर कामांची माहिती दिली आणि धनादेश सुपूर्द करताना उपस्थित होती.