सायंकाळी जाहीर होणाऱ्या औद्योगिक उत्पादन दर व महागाई दरावर नजर ठेवत गुंतवणूकदारांनी सप्ताहअखेर खरेदीचे धोरण अवलंबित भांडवली बाजाराला पुन्हा तेजीत आणून ठेवले. बँक, तेल व वायू क्षेत्रातील समभागांना गुंतवणूकदारांकडून पसंती मिळालेला सेन्सेक्स दिवसअखेर ५४.३२ अंश वाढीने २६,४२५.३० वर बंद झाला. तर १७.५५ अंश वाढीमुळे निफ्टी ७,९८२.९० पर्यंत पोहोचला.
सप्ताहाची कामगिरी यंदा दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी तेजीची नोंदविली असली तरी मुंबई निर्देशांक मात्र २६,५०० पर्यंत तर निफ्टी ८,००० पर्यंतही पोहोचू शकला नाही. सप्ताहभरात सेन्सेक्स ३४३ अंशांनी आपटला आहे. सलग तिसऱ्या व्यवहारात ही घसरण नोंदली गेली आहे. मुंबई निर्देशांक गुरुवारी ४७० अंशांनी घसरत आठ महिन्यांच्या तळात विसावला होता.गेल्या सप्ताहातही दोन्ही प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले होते.

रुपया पुन्हा ६४ च्या घरात
मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयाने शुक्रवारी पुन्हा ६४ च्या खालचा प्रवास नोंदविला. सलग दुसऱ्या दिवशी कमकुवत होताना रुपया सप्ताहअखेर ९ पैशांनी घसरत ६४.०६ पर्यंत घसरला. व्यवहारात ६३.८९ पर्यंतच वर जाऊ शकणारा रुपया सत्रात ६४.१४ पर्यंत खाली आला. शुक्रवारच्या आपटीने गेल्या दोन व्यवहारांतील त्याची घसरण २२ पैशांची राहिली आहे.

रिलायन्सच्या समभाग मूल्यात किरकोळ वाढ
किरकोळ वाढ नोंदविणाऱ्या भांडवली बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग दिवसअखेर अवघ्या एक टक्क्यांनी वाढला. भांडवली बाजार व्यवहारादरम्यान सुरू असलेल्या समूहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या व्यवसाय विस्तार घोषणांवर समभागाचा शुक्रवारचा प्रवास राहिला. अखेर मुंबई शेअर बाजारात १.३६ टक्क्यांनी वाढून मूल्य ८८९.१५ रुपयांवर, तर राष्ट्रीय शेअर बाजारात १.४४ टक्क्यांनी वाढून ८९२.५० रुपयांवर स्थिरावला. व्यवहारात केवळ ८९२ रुपयांपर्यंतच समभाग उंच जाऊ शकला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.