भांडवली बाजारातील तेजीचा प्रवास सलग तिसऱ्या दिवशीही कायम राहिला. नव्या आठवडय़ाची १८२.५८ अंश वाढीने सुरुवात करताना सेन्सेक्स १९.५७७.३९ वर बंद होताना महिन्याभराच्या उच्चांकावर पोहोचला. आघाडीच्या कंपन्यांमधील विशेषत: विदेशी निधीचा ओघ पुन्हा दिसून आला आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील सप्ताहाच्या पहिल्या दिवशी ५६.६५ अंशांने वाढत ५,८९८.८५ वर बंद झाला. तर एमसीएक्स-एसएक्सचा एसएक्स४० हा निर्देशांक १२६.४६ अंश वधारणेसह ११,६२०.८१ पर्यंत पोहोचला आहे.
सकाळच्या व्यवहारातच सेन्सेक्स ६१ अंशांनी वधारला होता. यावेळी तो १९,४५६.६९ च्या वर होता. रिलायन्स, मारुती सुझुकी, लार्सन अॅन्ड टुब्रो, टाटा पॉवर, एनटीपीसी असे आघाडीच्या समभागांचे मूल्य उंचावले होते. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बांधकाम ५.२६ टक्क्यांसह आघाडीवर होता. ऊर्जा, वाहन, पोलाद निर्देशांकही उंचावले होते. सेन्सेक्समधील ३० पैकी २४ समभाग तेजीच्या यादीत होते.
मुंबई निर्देशांक दिवसभरात १९,५९८.४३ या उच्चांकावर पोहोचला होता. गेल्या तीनही सत्रात मिळून बाजारात १,०२५ अंशांची अर्थात ५.५३ टक्क्यांची भर पडली आहे.
सेन्सेक्स यापूर्वी ६ जून रोजी १९,६१०.४८ वर होता. आजच्या व्यवहराने गुंतवणूकदारांची मालमत्ताही ९०,००० कोटी रुपयांनी वाढली. भांडवली बाजारातील विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांमार्फत गेल्या महिन्यात सलग १३ दिवस निधी काढून घेतला जात होता.ते थांबल्याचे चित्र आता दिसू लागले आहे. गेल्या सप्ताहअखेरच्या व्यवहारातही त्यांनी १,१२४.३१ कोटी रुपये स्थानिक समभागांमध्ये गुंतविले होते.
डॉलरच्या तुलनेतील रुपयाची तेजी नव्या सप्ताहारंभी काहीशी निमाली. सोमवारी रुपया १३ पैशांनी कमकुवत होत ५९.५२ वर स्थिरावला. गेल्या सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर चलन प्रथमच घसरले आहे. सत्राची सुरुवात करताना रुपया १० पैशांनी उंचावला. यावेळी तो डॉलरच्या तुलनेत ५९.२९ र्पयच वधारला होता. दिवसअखेर मात्र त्यात घसरण नोंदली गेली. चलनाने २६ जून रोजी ६०.७२ हा सार्वकालिक नीचांक नोंदविला होता. त्यादिवशीच्या एकाच व्यवहारात रुपया १०६ पैशांनी रोडावला होता. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला ५६.७६ वर असणारा रुपया जूनची अखेर करताना २८ रोजी ५९.३९ वर होता. त्यादिवशी चलनात ८० पैशांची भरही पडली होती.
गुंतवणूकदारांच्या खरेदीच्या धोरणामुळे भांडवली बाजाराबरोबरच सराफा बाजारातही सोमवारी तेजी पहायला मिळाली. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने घसरण होत असलेल्या मौल्यवान धातूंचे दर पुन्हा वधारू लागले आहेत. मुंबई शहरात स्टॅन्डर्ड सोन्याचे दर तोळ्यासाठी २५ रुपयांनी वधारले. सोमवारी त्याला १० ग्रॅमसाठी २५,८०० रुपयांचा भाव मिळाला. पिवळ्या धातूचे दर गेल्या काही सत्रांमध्ये कमालीने खाली आले होते. जूनमधील सुरुवातीच्या १० ग्रॅमसाठी २८ हजार रुपयांच्या घरात असणारे सोने महिनाअखेपर्यंत २६ हजाराच्या खाली विसावताना दिसत होते. आता ते पुन्हा २६ हजाराच्या वर जाऊ पाहत आहे. किलोचा चांदीचा दर मात्र ८५ रुपयांनी घसरून ४१,१२५ रुपयांवर स्थिरावला.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jul 2013 रोजी प्रकाशित
सेन्सेक्स महिन्याच्या उच्चांकावर
भांडवली बाजारातील तेजीचा प्रवास सलग तिसऱ्या दिवशीही कायम राहिला. नव्या आठवडय़ाची १८२.५८ अंश वाढीने सुरुवात करताना सेन्सेक्स १९.५७७.३९ वर बंद होताना महिन्याभराच्या उच्चांकावर पोहोचला. आघाडीच्या कंपन्यांमधील विशेषत: विदेशी निधीचा ओघ पुन्हा दिसून आला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील सप्ताहाच्या पहिल्या दिवशी ५६.६५ अंशांने वाढत ५,८९८.८५ वर बंद झाला.
First published on: 04-07-2013 at 12:06 IST
TOPICSबिझनेस न्यूजBusiness Newsबीएसई सेन्सेक्सBSE Sensexशेअर बाजारShare Marketस्टॉक मार्केटStock Market
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex soars 182 pts on fiis monsoon hope maruti suzuki shares rally