भारतातील वृद्ध व त्याच्याशी निगडित व्यवसायावर आधारित प्रदर्शन चालू आठवडा अखेर मुंबईत होत असून दादर (पश्चिम) येथील भारत स्काऊट आणि गाईड सभागृहात ते दोन दिवस चालेल. २१ आणि २२ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान होणाऱ्या या परिषदेसाठी खुला प्रवेश आहे.
गेल्या दोनेक महिन्यात बंगळूरू आणि चेन्नई येथे असेच परिषद पार पडल्यानंतर हे आयोजन आता मुंबईत होत आहे. या माध्यमातून सूक्ष्मदर्श्ी अशा ग्राहकांसाठी नवीन उत्पादने आणि सेवा उपलब्ध होणार आहेत. निवृत्तीनंतर करियरचे नियोजन आणि समृद्धी साधने यावरही प्रकाश टाकण्यात येईल.
वाढत्या वयातील आणि म्हातारपणातील जीवनशैलीवर भारतातील हे एकमेव प्रदर्शन प्रकाश टाकणार असून परिषदही त्याच विषयावर होत आहे. येथे सहभागी होणाऱ्या ज्येष्ठांना वेगवेगळ्या पद्धतींच्या नवनवीन उपक्रमांमधून माहिती दिली जाणार आहे. दोन संपूर्ण दिवसांच्या या प्रदर्शन आणि संवादरुपी सत्रांमध्ये योग, जीवनशैली आणि विनामूल्य सर्वसाधारण आरोग्य तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती आयोजक जानकी रामन यांनी दिली.
या व्यासपीठाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व पर्याय एकत्रित करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. त्यात सामाजिक, पर्यावरणीय, बौद्धिक, शारीरिक, भावनिक, अध्यात्मिक आणि व्यावसायिक अशा बाबींचा समावेश आहे. आमच्या ज्येष्ठ नागरिकांचे अधिकाधिक कल्याण करण्याच्या दृष्टीने सखोल नियोजन आणि तयारीची गरज आहे, असेही रामन यांनी प्रदर्शनाबाबत माहिती देताना सांगितले.
संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार, भारतातील ज्येष्ठांचे प्रमाण हे वाढते आहे. ६० वष्रे वयाच्या वरील लोकसंखेचे प्रमाण २०१६ पर्यंत ११.६१ कोटीपर्यंत जाणार आहे.