जुलैमध्ये कमाल वीज मागणी विक्रमी दोन लाख मेगावॉटवर

भारतातील आर्थिक क्रियाकलाप हे साथ-निर्बंधांच्या मरगळीतून सावरत असल्याचे सुस्पष्ट संकेत वाढलेली विजेची मागणी देत आहे. सरलेल्या जुलै महिन्यातील कमाल विजेच्या मागणीने २००,५७० मेगावॉट असा नवीन विक्रम नोंदविला. गतवर्षातील याच कालावधीच्या तुलनेत मागणीतील ही वाढ १७.६ टक्के अधिक आहे.

देशाने विजेच्या कमाल मागणीचा विक्रमी कळस ७ जुलै २०२१ रोजी दुपारी १२.०१ वाजता नोंदविला. त्या वेळी नोंदविली गेलेली २००,५७० मेगावॉटची मागणी ही याआधीच्या म्हणजे, जुलै २०२० मधील १७०,५४५ मेगावॉट कमाल वीज मागणीच्या तुलनेत जवळपास १८ टक्क्यांनी अधिक असल्याचे केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले.

ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील, पॉवर सिस्टीम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (पोसोको)च्या अहवालानुसार, जुलै २०२१ मधील दैनंदिन सरासरी वीज वापर ४,०४९ दशलक्ष युनिट राहिला आहे, जो जुलै २०२० मधील ३,६६२ दशलक्ष युनिट या दैनंदिन सरासरी वीज वापराच्या तुलनेत १०.६ टक्के अधिक आहे. उल्लेखनीय म्हणजे, ७ जुलै २०२१ रोजी सर्वाधिक दैनंदिन वीज वापर हा ४,५०८ दशलक्ष युनिट इतका होता, जो आधीच्या वर्षातील सर्वोत्तम म्हणजे २८ जुलै २०२० च्या तुलनेत (३,९३१ दशलक्ष युनिट) १४.७ टक्के अधिक आहे.

अहवालातील माहितीनुसार, वाढत्या वीज मागणीच्या पूर्ततेत अक्षय्य ऊर्जा क्षेत्राचे लक्षणीय योगदान राहिले आहे. जुलै २०२१ मधील सौर ऊर्जा प्रकल्पातून वीजनिर्मिती ही प्रतिदिन १५८ दशलक्ष युनिट होती. जुलै २०२० मधील प्रतिदिन १४७ दशलक्ष युनिटच्या तुलनेत ती ७.६ टक्के अधिक राहिली आहे.

पवन ऊर्जा प्रकल्पांमधून वीजनिर्मिती तर वर्षभराच्या कालावधीत प्रतिदिन २१२ दशलक्ष युनिट ते प्रतिदिन ३४९ दशलक्ष युनिट अशी तब्बल ६४.५ टक्के वाढली आहे. २७ जुलै २०२१ रोजी सौर व पवन एकत्रित वीजनिर्मिती ४३.१ गिगावॉट अशी सार्वकालिक उच्चांकी नोंदली गेली, यापूर्वी ११ जून २०२१ रोजी नोंदविलेला ४१.१ गिगावॉट वीजनिर्मितीचा विक्रम यातून मोडला गेला आहे.