गत ५८ दिवसांमध्ये डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन म्हणून सुमारे १० लाख ग्राहक आणि व्यापाऱ्यांना १५३.५ कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेचे वाटप केले गेले आहे, अशी माहिती निती आयोगाचे मुख्याधिकारी अमिताभ कांत यांनी मंगळवारी येथे दिली.

निश्चलनीकरणाच्या पाश्र्वभूमीवर निती आयोगाने रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन म्हणून ‘भाग्यवान ग्राहक योजना’ आणि ‘डिजि-धन व्यापार योजना’ अशा दोन प्रोत्साहनपर योजना सुरू केल्या. गेल्या ५८ दिवसांत त्यांना उमदा प्रतिसाद मिळाला असून, अपेक्षित परिणामही दिसून आले आहेत, असे कांत यांनी प्रतिपादन केले.

या योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने प्रसृत केलेल्या आकडेवारीनुसार, या योजनांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली त्या २५ डिसेंबर २०१६ ते २० फेब्रुवारी २०१७ पर्यंतच्या ५८ दिवसांत जवळपास १० लाख ग्राहक आणि व्यापाऱ्यांकडून रोखीपासून फारकत घेऊन, ई-व्यवहारांचा अवलंब केला आणि त्यासाठी बक्षीसरूपात त्यांना १५३.५ कोटी रुपये प्रदान केले आहेत. यापैकी व्यापारी-दुकानदारांची संख्या ५६,००० तर उर्वरित हे ग्राहक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या योजनांतील विजेत्यांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि दिल्ली या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक दिसून आली. शिवाय शेतकरी, व्यापारी, छोटे उद्योजक, व्यावसायिक, गृहिणी ते विद्यार्थी आणि सेवानिवृत्त असे विविध सामाजिक-आर्थिक स्तरातील लोकांचा विजेत्यांमध्ये विविधांगी सहभाग असल्याचेही कांत यांनी स्पष्ट  केले. उल्लेखनीय म्हणजे २१ ते ३० वयोगटांतील ग्राहकांचा विजेत्यांमध्ये मोठा भरणा असला तरी ६० पेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठांची संख्याही लक्षणीय असल्याचे ते म्हणाले. ही बक्षीस योजना १४ एप्रिल २०१७ पर्यंत सुरू राहणार आहे.