आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज

नवी दिल्ली : कठोर पतधोरण आणि वाढत्या इंधनाच्या किमती यामुळे भारताचा आर्थिक विकास दर  पूर्वानुमानापेक्षा कमी राहील, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने स्पष्ट केले आहे. परिणामी चालू वर्षांत विकास दर ७.३ टक्के तर २०१९ मध्ये तो ७.५ टक्के असा आपल्या आधीच्या अंदाजापेक्षा तिने खाली आणला आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने एप्रिलमध्ये व्यक्त केलेल्या भाकितानुसार, २०१८ मध्ये भारताचा विकास दर ७.४ टक्के तर २०१९ मध्ये तो ७.८ टक्क्यांचे गाठण्याची शक्यता वर्तविली होता. नाणेनिधीच्या ताज्या अंदाजात मात्र तो दोन्ही वर्षांसाठी सुधारून कमी करण्यात आला आहे. यानुसार तो आता २०१८ मध्ये ७.३ टक्के तर २०१९ मध्ये ७.५ टक्के असेल.

भारताच्या घसरत्या विकास दराला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने रिझव्‍‌र्ह बँकेद्वारे राबविले जाणारे कठोर पतधोरण तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या वाढत्या किमती हे कारण ठरेल, असे म्हटले आहे. असे असले तरी भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग हा शेजारील चीनपेक्षा अधिक असेल, असे तिने नमूद केले आहे. २०१८ मध्ये चीनची अर्थव्यवस्था ६.६ टक्के तर २०१९ मध्ये ती ६.४ टक्के दराने वाढेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

एकूण विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये भारत, चीनच्या अर्थव्यवस्थेचा वेग अधिक असेल, असेही नाणेनिधीने म्हटले आहे. जागतिक आढावा घेताना नाणेनिधीने जागतिक अर्थव्यवस्थेचा वेग मात्र स्थिर, ३.९ टक्के राहण्याचे अंदाजले आहे.