नवी दिल्ली : सरलेल्या जून महिन्यात भारताच्या व्यापार तुटीने विक्रमी २५.६३ अब्ज डॉलरची पातळी गाठल्याचे सोमवारी वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीने स्पष्ट केले. मे २०२२ मध्ये व्यापार तुटीचे प्रमाण २४.२९ अब्ज डॉलर होते.

एकीकडे देशाची निर्यात वाढत असली तरी आयातीत त्यापेक्षा अधिक वाढ होत आहे आणि या दोहोतील तफावत म्हणजे व्यापार तूट महिनागणिक वाढत चालली आहे. सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत व्यापार तूट दुपटीने वाढत ७०.२५ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ती ३१.४२ अब्ज डॉलरवर मर्यादित होती. सोने व वाढत्या खनिज तेलाच्या आयातीमुळे वित्तीय तूट सरलेल्या महिन्यात विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.

सरलेल्या जून महिन्यात देशाच्या व्यापारी मालाची निर्यात१६.७८ टक्क्यांनी वाढून ३७.९४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. तर खनिज तेलाच्या कडाडलेल्या आंतरराष्ट्रीय किमतींमुळे याच महिन्यात आयातीतही ५१ टक्क्यांची वाढ होत तिने  ६३.५८ अब्ज डॉलरचा टप्पा गाठला आहे.

चालू आर्थिक वर्षांत (२०२२-२३) एप्रिल आणि जून तिमाहीत एकत्रित निर्यात २२.२२ टक्क्यांनी उंचावली असून ११६.७७  अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. तर या तीन महिन्यांच्या काळात देशात आयात करण्यात येणाऱ्या वस्तू आणि सेवांमध्ये ४७.३१ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. आयात सरलेल्या तिमाहीत १८७.०२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जून महिन्यात सोन्याची आयात १६९.५ टक्क्यांनी वाढून २.६१ डॉलर अब्ज झाली आहे. खनिज तेलाच्या आयातीत ९४ टक्के वाढ झाली असून तिने २०.७३ अब्ज डॉलरचा टप्पा गाठला आहे.  दुसरीकडे पेट्रोलियम उत्पादने निर्यातीत ९८ टक्के वाढ होत ती  ७.८२ अब्ज डॉलरवर पोहोचली.