scorecardresearch

‘एनपीएस’मध्ये सहभागासाठी कमाल वय वाढून ७० वर्षांपर्यंत

मोठ्या संख्येने आलेल्या आर्जवांची दखल घेत, ‘पीएफआरडीए’ने एनपीएसमध्ये सामील होण्याच्या वयोमर्यादेत वाढ केली आहे.

‘एनपीएस’मध्ये सहभागासाठी कमाल वय वाढून ७० वर्षांपर्यंत

निवृत्तिवेतन नियामक मंडळ ‘पीएफआरडीए’ने राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये (एनपीएस) गुंतवणुकीसाठी कमाल वयाची मर्यादा वाढविली आहे. आता एनपीएसमध्ये कमाल ७० वर्षे वयापर्यंतच्या व्यक्तीला खाते उघडता येईल. याआधी कमाल वयोमर्यादा ६५ वर्षे होती. तसेच, एनपीएस खातेधारकांना त्यांचे खाते ७५ वर्षे वयापर्यंत सुरू ठेवता येणार आहे.

मोठ्या संख्येने आलेल्या आर्जवांची दखल घेत, ‘पीएफआरडीए’ने एनपीएसमध्ये सामील होण्याच्या वयोमर्यादेत वाढ केली आहे. नवीन बदलानुसार, एनपीएसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान वयोमर्यादा १८ ते कमाल वयोमर्यादा ७० झाली आहे. विद्यमान ग्राहकांकडून सेवानिवृत्तीनंतरही एनपीएसअंतर्गत गुंतवणूक करण्याचा पर्याय खुला राखला जावा आणि ६५ वर्षांवरील नागरिकांची ‘एनपीएस’मध्ये खाते उघडण्याची इच्छा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहकांच्या हितासाठी आणि त्यांना दीर्घकालीन शाश्वत संपत्ती निर्माण करण्याच्या संधीचा लाभ मिळवून देण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे, असे ‘पीएफआरडीए’ने सांगितले.

सुधारित नियमानुसार, वय वर्षे ६५ वरील कोणीही निवासी किंवा अनिवासी भारतीय नागरिक आणि भारताचा प्रवासी नागरिक एनपीएसमध्ये सहभागी होऊ शकतो. वय वर्षे ७५ पर्यंत तो एनपीएस खाते कार्यरत ठेवू शकतो. शिवाय वय वर्षे ६५ ओलांडलेल्या व्यक्तीने एनपीएसमध्ये खाते उघडल्यास त्याला तीन वर्षे (लॉक इन कालावधी) गुंतवणूक काढता येणार नाही.

उच्च परताव्याच्या समभाग गुंतवणुकीच्या मात्रेतही वाढ…

आता ६५ वर्षांवरील नागरिकांना जास्तीत जास्त ५० टक्के रक्कम समभागसंलग्न (इक्विटी) साधनांमध्ये गुंतवणुकीस परवानगी देण्यात आली आहे. २६ ऑगस्ट २०२१ प्रसिद्ध करण्यात आलेल्या पीएफआरडीएच्या परिपत्रकानुसार, वय वर्षे ६५ ओलांडल्यानंतर एनपीएसमध्ये सामील होणारे ग्राहक स्वयंचलित (ऑटो) आणि सक्रि य (अ‍ॅक्टिव्ह) पर्याय निवडीअंतर्गत अनुक्रमे भविष्य निर्वाह निधीतील (पीएफ) योगदान १५ टक्के आणि ५० टक्क्यांपर्यंत समभागांमध्ये गुंतवू शकतात. सक्रिय पर्याय निवडल्यास ५० टक्क्यांपर्यंत निधी ते समभागांमध्ये गुंतवू शकतील.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या