नवी दिल्ली : रुपे क्रेडिट कार्ड वापरून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या (यूपीआय) माध्यमातून दोन हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयने बुधवारी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले. सर्व प्रमुख बँका व्यावसायिक आणि किरकोळ ग्राहकांना रूपे क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देत असून, रोकडरहित व्यवहारांना चालना म्हणून रुपे कार्डच्या माध्यमातून व्यवहारांना प्रोत्साहनाची सरकारची भूमिका आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्देशानुसार रुपे क्रेडिट कार्ड वापरून यूपीआयच्या माध्यमातून मर्यादित व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवहारांची पूर्तता करण्यासाठी, क्रेडिट कार्ड वापरून यूपीआय किंवा इतर अ‍ॅपवरून व्यवहार शक्य आहेत, असे एनपीसीआयने परिपत्रकात म्हटले आहे. मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर) निरंक या श्रेणीअंतर्गत २,००० रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या व्यवहारावर हा नियम लागू असेल. एमडीआर म्हणजे एखाद्या व्यापाऱ्याने त्यांच्या ग्राहकांकडून क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून रक्कम स्वीकारण्यासाठी बँकेला दिलेले शुल्क असते. हा नवीन नियम परिपत्रक जाहीर केल्यापासून म्हणजे बुधवारपासूनच लागू करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्राहकांना ऑनलाइन माध्यमातून व्यवहार करण्यासाठी विविध पर्याय मिळावेत यासाठीच क्रेडिट कार्ड वापरून यूपीआयद्वारे व्यवहाराचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. सध्या यूपीआय हे डेबिट कार्डच्या माध्यमातून बचत खाते किंवा चालू खात्यांशी जोडले जाते. रिझव्‍‌र्ह बँकेचे हे पाऊल स्वदेशी देयक प्रणालीला (पेमेंट गेटवे) प्रोत्साहन देईल आणि रुपे कार्डसच्या व्यापक स्वीकृतीला प्रोत्साहन देईल.