गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या तिहार तुरुंगात असलेल्या सहाराप्रमुख सुब्रता रॉय यांच्या सुटकेसाठी उभारावयाच्या निधीबाबत येत्या दोन आठवडय़ांत ठोस योजना सादर करा, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सुनावले. रॉय यांच्या जामिनाबाबतचा निर्णयही न्यायालयाने या वेळी राखून ठेवला.
सहाराने १.६ अब्ज डॉलरची रक्कम उभी करण्याबाबत यापूर्वी वेळोवेळी योजना सादर केली; मात्र प्रत्यक्षात निधी उभारणी झालीच नाही. याबाबतच्या गुरुवारच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर यांनी समूहाला येत्या दोन आठवडय़ांत योग्य योजना सादर करण्यास सांगितले आहे.
गुंतवणूकदारांची रक्कम परस्पर अन्य योजनांमध्ये गुंतविल्याच्या प्रकरणात सेबीने केलेल्या कारवाईत रॉय हे गेल्या वर्षभरापासून तुरुंगात आहेत. त्यांच्या जामिनासाठी १०,००० कोटी रुपये भरण्याचे आदेश यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ५,००० कोटींच्या बँक हमीव्यतिरिक्त अन्य तेवढय़ाच रकमेची निधी उभारणी समूहाला अद्याप करता आली नाही.