मुंबई : देशातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेसचा (टीसीएस) एकत्रित निव्वळ नफा एप्रिल-जून तिमाहीत ५.२१ टक्के वाढीसह ९,४७८ कोटी रुपयांवर पोहोचला असल्याचे कंपनीकडून शुक्रवारी जाहीर करण्यात आले.
गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने ९,००८ कोटींच्या नफ्याची नोंद केली होती. वर्षांगणिक नफा वाढला असला तरी तिमाही दर तिमाही तुलनेत नफ्यात ४.५१ टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीच्या महसुलात वार्षिक आधारावर १६.२ टक्क्यांची वाढ होत तो आता ५२,७५८ कोटींवर पोहोचला आहे.
नवीन आर्थिक वर्षांची सुरुवात अतिशय दमदारपणे केली गेली असून कंपनीच्या सर्वच विभागांची कामगिरी चांगली राहिली, असे टीसीएसचे मुख्याधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन म्हणाले. जागतिक पातळीवर अस्थिरता असली तरी कंपनीने नवीन मागणी व कार्यादेशात वाढ नोंदवली आहे. व्यवस्थापकीय संरचनेमुळे कंपनीतील वातावरण कर्मचारीसुलभ आणि ग्राहककेंद्री बनण्यास मदत झाली आहे. कंपनीला अधिक गतिशील बनवण्यासाठी तंत्रज्ञानावर गुंतवणूक केली जात आहे, असेही ते म्हणाले.
भागधारकांना ८ रुपये लाभांश
कंपनीने एक रुपया दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक समभागासाठी ८ रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. पुढील महिन्यात ३ ऑगस्टला भागधारकांच्या खात्यात लाभांश जमा केला जाईल. यासाठी १६ जुलै ही रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे.
गळती दर २० टक्क्यांवर
टीसीएसने पहिल्या तिमाहीच्या निकाल हंगामाची दमदार सुरुवात करत ५० हजार कोटींपुढील तिमाही महसुलाचा टप्पा ओलांडणारी कामगिरी केली असली तरी कंपनीला कर्मचारी गळतीच्या (अॅट्रिशन) वाढत्या समस्येने ग्रासले आहे. सरलेल्या तिमाहीत कर्मचारी गळतीचे प्रमाण १९.७ टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या आर्थिक वर्षांतील चौथ्या तिमाहीत हा दर १७.४ टक्के नोंदवला गेला होता. सरलेल्या जून तिमाहीत कंपनीने १४,१३६ नवीन कर्मचारी जोडले आहेत. आता कंपनीतील कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ६ लाखांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने २४,००० नवीन कर्मचारी कामावर घेतले होते. चालू आर्थिक वर्षांत कंपनीने ४०,००० लोकांना रोजगार देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.