तृप्ती राणे

जास्त कर भरावा लागेल या भीतीने अनेक जण गुंतवणूक दुसऱ्याच्या नावाने करतात. जसे, आई, वडील, बायको, मुलं! अनेक लोकांना वाटतं की, असं केल्याने त्यांचा खर्च वाचेल. ‘गिफ्ट’ या नावाखाली सुद्धा काही जण कर वाचवायचा प्रयत्न करतात. तेव्हा या बाबतीत असलेले कायदे काय आहेत हे आजच्या लेखातून आपण जाणून घेऊ या.

१) भेट / गिफ्ट

एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली रक्कम/संपत्ती ही भेट/गिफ्ट प्रकारामध्ये मोडते आणि तिथे सर्वात पहिला कायदा जो लागू होतो तो आहे मिळकत कर कायदा. ही रक्कम ‘इतर मिळकत’ म्हणून गणली जाते आणि त्यावर भेट स्वीकारणाऱ्याला स्लॅबनुसार कर भरावा लागतो. परंतु मिळकत कायद्यानुसार काही गिफ्ट्स या करमुक्त आहेत. उदाहरणार्थ, लग्नात मिळालेला आहेर, गिफ्टपोटी मिळालेली वार्षिक पन्नास हजारापर्यंतची रक्कम, स्थावर मालमत्ता जिची मुद्रांक शुल्कानुसार ठरवलेली किंमत पन्नास हजारापर्यंत आहे, इतर मालमत्ता जिची मार्केट व्हॅल्यू पन्नास हजारापर्यंत आहे. या शिवाय काही ठरावीक नात्यांमध्ये झालेली देवाण/घेवाण, वारसा हक्काने किंवा इच्छापत्रातून मिळालेली मालमत्ता, हिंदू अविभक्त कुटुंबाच्या विभाजनातून मिळालेली संपत्ती इत्यादीवर जरी रक्कम/किंमत पन्नास हजार रुपयांच्या पुढे असली तरीही ती भेट स्वीकारणाऱ्याला कर लागत नाही. एक गोष्ट जी लक्षात ठेवणं आहे ती म्हणजे या गिफ्टमधून होणाऱ्या मिळकतीवर लागणारा कर! म्हणजे गिफ्ट दिलं आणि आपण सुटलो असं प्रत्येक वेळी होत नाही. मिळकत कायद्याच्या ‘कलम ६४’नुसार अशा गिफ्टमधून केलेल्या गुंतवणुकीवर मिळालेल्या फायद्यावर कर भरणं ही गिफ्ट देणाऱ्याची जबाबदारी असते, गिफ्ट स्वीकारणाऱ्याची नाही. म्हणजेच, नवऱ्याने बायको अथवा १८ वर्षांखालील मुलांना गिफ्ट दिली आणि पुढे त्यातून गुंतवणूक करून व्याज, भाडे किंवा भांडवली फायदा झाल्यास त्याच्यावर कर नवऱ्याला भरायला लागेल. एक अजून गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे ती म्हणजे २०१७-१८ सालापासून काही विशिष्ट आयकर विवरणात गिफ्ट्सचा तपशील द्यायची तरतूद केलेली आहे.

२) बेनामी मालमत्ता कायदा

काही ठिकाणी गुंतवणूक करणारी व्यक्ती वेगळी असते आणि गुंतवणुकीवर नाव एका वेगळ्या व्यक्तीचे चढविले जाते. अशा वेळी त्या मालमत्तेचा मालक आणि खरा फायदा मिळवणारी व्यक्ती वेगळी असल्यामुळे, हा कायदा लागू होतो. या कायद्याखाली शिक्षा, दंड किंवा जप्ती होऊ शकते. या कायद्यामध्ये काही अपवादसुद्धा दिलेले आहेत. उदाहरणार्थ, नवऱ्याने बायकोच्या नावाने मालमत्ता बाळगणे ज्यामध्ये त्याची जाहीर मिळकत आणि मालमत्तेची किंमत याचा ताळमेळ व्यवस्थितपणे सिद्ध करता येतो. परंतु, आई, वडील, भाऊ, बहिणीच्या नावाने गुंतवणूक करताना मात्र या कायद्याचं भान ठेवणं गरजेचं आहे. कुणी पैसे दिले, त्यावर योग्य कर भरला होता का, गुंतवणुकीचा खरा फायदा कुणाला होतोय हे सर्व आज तपासलं जातंय. या कायद्याची व्याप्ती आधीपेक्षा जास्त झालेली असल्यामुळे गुंतवणूकदारांनी व्यवहार करताना हा कायदा समजून करणे हे त्यांच्या फायद्याचे होईल.

३) फेमा कायदा

आपल्या देशात निवासी (रेसिडेंट) आणि अनिवासी (नॉन-रेसिडेंट) यांच्या गुंतवणुकीबद्दल वेगळे नियम आहेत. उदाहरणार्थ, पीपीएफ खातं उघडायची परवानगी फक्त निवासी व्यक्तीला आहे. शिवाय परदेशी पैसे पाठवताना किती रकमेपर्यंत रिझव्‍‌र्ह बँकेने मोकळीक दिलेली आहे हेसुद्धा निवासी आणि अनिवासी व्यक्तीसाठी वेगळं आहे. यामध्ये जर चुका झाल्या तर आजवर फक्त दंड होत आहे. परंतु या कायद्यामध्ये बदल अपेक्षित असून त्यामध्ये फौजदारी कार्यवाहीसुद्धा केली जाईल अशी दाट शक्यता आहे.

४) परदेशात स्थायिक होण्यासाठी लागणारे (इमिग्रेशन) नियम

परदेशातील व्हिसा आणि कायमचे वास्तव्य मिळवताना इतर देशात काय संपत्ती आहे याची यादी त्या देशामध्ये द्यावी लागते. अशा वेळी काहीही नाही असं सांगून जर खोटी माहिती दिली आणि त्याबाबत चौकशी झाली तर अशा केसमध्येसुद्धा त्या देशातील नियमानुसार त्या व्यक्तीवर कार्यवाही होऊ शकते. जसे, अमेरिकेत व्हिसा मिळविण्यासाठी जेव्हा अर्ज केला जातो तेव्हा इतर देशात असलेली मालमत्ता आणि मिळकत या दोघांचाही तपशील द्यावा लागतो. मग एखाद्या मुलाने त्याच्या अर्जात काही नाही म्हणून सांगितलं आणि भारतात त्याच्या नावाने गुंतवणूक सापडली तर त्याला व्हिसा नाकारला जाऊ शकतो आणि नागरिकत्व कायमचे रद्द होऊन कायदेशीर कार्यवाहीसुद्धा होऊ शकते.

शिवाय इतर कायदेसुद्धा आहेत जे चुकीच्या पद्धतीने केलेल्या गुंतवणुकीवर लागू होऊ शकतात. तेव्हा प्रामाणिक आणि जागरूक गुंतवणूकदारांनी खालील गोष्टी ध्यानात ठेवाव्यात :

१.   आपल्या मिळकतीचा तपशील व्यवस्थित ठेवा आणि योग्य पद्धतीने कर विवरणात जाहीर करा.

२. भेट/गिफ्ट देताना त्यासंबंधी लागू होणारे कायदे समजून घेऊन मग कागदोपत्री व्यवहार करा.

३.   निवासी असून अनिवासी किंवा अनिवासी असून निवासी दाखवू नका.

४.   पैशांचे व्यवहार बँकेतून करा आणि स्वतच्या खात्यामध्ये येणाऱ्या पैशाचा हिशेब व्यवस्थित ठेवा. तुमच्या खात्यात दुसरा कुणी पैसे जर ठेवत असेल तर खबरदार व्हा. खातं तुमचं असल्यामुळे चौकशी तुमची होणार.

५.   कर चुकवेगिरी न करता कर व्यवस्थापन करा. योग्य कर भरून निर्धास्त व्हा. हे तुमच्यासाठी आणि तुमच्यापश्चात तुमच्या कुटुंबासाठी फायद्याचं होईल.

* लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.

trupti_vrane@yahoo.com