काही कंपन्यांचे शेअर्स आपल्या डोळ्यासमोर झपाटय़ाने वाढत जातात आणि योग्य वेळी तो शेअर घेतला नाही म्हणून आपण सारखी हळहळ व्यक्त करीत राहतो. गंमत म्हणजे तो शेअर तरी वाढतच असल्याचे आपल्याला दिसून येते. इतका की शेवटी तो आपल्या आवाक्याबाहेर जातो. हे उदाहरण पाहून अनेक वाचक गुंतवणूकदारांना एमआरएफ, हॉकिन्स, रिलॅक्सो इ. कंपन्यांच्या शेअर्सची आठवण झाली असेल. आज सुचविलेला शेअरदेखील असाच महाग वाटण्याची शक्यता असल्याने ही प्रस्तावना!
१९५९ मध्ये पहिल्यांदा भारतीय बनावटीचा ट्रॅक्टर उत्पादन करणाऱ्या आयशरने, १९८२ मध्ये आयशर मोटर्सची स्थापना केली. सुरुवातीला केवळ ट्रॅक्टर्सचे उत्पादन करणाऱ्या या कंपनीने जपानच्या मित्सुबिशी कंपनीशी करार करून हलक्या वाणिज्य वाहनांचे उत्पादन त्याच काळात सुरू केले. त्यानंतर रॉयल एनफिल्ड या कंपनीचा हिस्सा घेऊन कंपनीने भारतातील दुचाकींचा सर्वात जुना आणि नामवंत ब्रॅण्ड ‘बुलेट’ ताब्यात घेतला. मध्यंतरीच्या काळात कंपनीने वोल्व्होबरोबर भागीदारी करार करून वाणिज्य वाहनांच्या उत्पादनासाठी व्ही ई कमíशयल व्हेइकल्स लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. त्यामुळे आता आयशर ही ट्रॅक्टर, हलकी आणि मध्यम वाणिज्य वाहने आणि मोटर सायकल्सचे उत्पादन करणारी भारतातील एक अग्रगण्य कंपनी झाली आहे. दोनच वर्षांपूर्वी कंपनीने कॉन्टिनेन्टल जीटी ५३५ रेसर ही लंडनमध्ये ५३५ सीसी क्षमतेची बाइक प्रस्तुत केली. गेल्या पाच वर्षांत कंपनीने उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या भागधारकांना खूश ठेवले आहे. गेल्या वर्षी ५००% लाभांश देणाऱ्या आयशरची गेल्या तीन वर्षांची नफ्यातील वाढ सरासरी २५.८५% असून आगामी काळातही ही घोडदौड चालूच राहील अशी अपेक्षा आहे. ३० सप्टेंबर २०१५ अखेर संपलेल्या तिमाहीतही कंपनीने विक्रीत ५९ टक्के अशी दणदणीत वाढ दाखवून १२९५.३० कोटी रुपयांच्या उलाढालीवर २२८.५० कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो ५९ टक्के वाढलाआहे. येत्या वर्षांत आपल्या वाणिज्य वाहनांच्या उत्पादनासाठी कंपनी ५०० कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करत आहे. याचा निश्चित फायदा कंपनीला आगामी काळात होईल. सध्या १६,३०० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर मध्यम कालावधीसाठी खरेदी करावा.
संग्रहित लेख, दिनांक 7th Dec 2015 रोजी प्रकाशित
‘बुलेट’ वृद्धिपथ..
काही कंपन्यांचे शेअर्स आपल्या डोळ्यासमोर झपाटय़ाने वाढत जातात आणि योग्य वेळी तो शेअर घेतला नाही
Written by मंदार गुरव
First published on: 07-12-2015 at 00:03 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on eicher motors