वसंत माधव कुळकर्णी

निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंड 

ऑक्टोबर २०१८ मध्ये ‘सेबी’ने फंड फेरवर्गीकरण आणि प्रमाणीकरणाबाबत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या. या सूचनांनुसार ज्या फंडांच्या व्यापक गुंतवणूक रणनीतीमध्ये फार फरक झाला नाही अशा फंडांपैकी ‘निप्पॉन इंडिया लार्ज कॅप’ हा एक फंड आहे. प्रमाणीकरणाआधी फंडाच्या गुंतवणुकीचा परीघ बाजार मूल्यानुसार पहिल्या दोनशे कंपन्यांच्या समभागापुरता होता. प्रमाणीकरणापश्चात फंडाच्या परिघात भांडवलीमूल्याच्या आधारे पहिले १०० समभाग आहेत. प्रमाणीकरणापूर्वी फंडाच्या गुंतवणुकीत मिड कॅप मात्रा ३० टक्के होती. आता मिड कॅप मात्रा २० टक्के आहे.

शैलेश राज भान हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. फंडाचे निधी व्यवस्थापन सक्रिय, परंतु संयमित पद्धतीचे आहे. ते फंडाच्या मानदंडात असलेल्या उद्योग क्षेत्रांच्या प्रभावाबाबत जागरूक असलेले परंतु गुंतवणुकीवर या प्रभावाच्या मर्यादा नसलेले निधी व्यवस्थापक आहेत. त्यांच्या उद्योग क्षेत्राबाबतच्या दृष्टिकोनानुसार गुंतवणुकीत उद्योग क्षेत्रातील प्रभाव कमी-अधिक करण्याची यशस्वी रणनीती ते वापरतात. समभागांच्या मूलभूत सामर्थ्यांनुसार समभागांची निवड करतात. फंड गुंतवणुकीतील आघाडीच्या दहा गुंतवणुकांपैकी सात गुंतवणुका २०१०पासून म्हणजे मागील दहा वर्षांपासून फंडाच्या गुंतवणुकीत आहेत. काही वेळा त्यांच्या समभागाबाबत दीर्घकालीन दृष्टिकोनामुळे फंडाची कामगिरी काही कालावधीपुरती खालावल्याचे प्रसंग गुंतवणूकदारांनी अनुभवले आहेत. जसे की २०१७ मध्ये मिड कॅप मात्रा अधिक असल्याने हा फंड अव्वल कामगिरी करणारा फंड होता. परंतु २०१८ मध्ये (प्रमाणीकरणापूर्वी) फंडाची मानदंडाच्या तुलनेत कामगिरी कमालीची खालावली होती.

सध्या निधी व्यवस्थापन पाहात असलेले शैलेश राज भान २००३ मध्ये तत्कालीन रिलायन्स म्युच्युअल फंडात समभाग संशोधक म्हणून रुजू झाले. या फंडाच्या सुरुवातीपासून ते निधी व्यवस्थापक आहेत. मागील १४ वर्षांत निधी व्यवस्थापक म्हणून त्यांनी दाखविलेल्या परिपक्वतेचे अनेक दाखले देता येतील. निधी व्यवस्थापक कायम ‘ग्रोथ अ‍ॅट रिझनेबल प्राइस’ या गुंतवणूक तत्त्वांशी एकनिष्ठ राहिले आहेत. नफाक्षम कंपन्यांना त्यांनी गुंतवणुकीला नेहमीच प्राधान्य दिले आहे. गुंतवणुकीत शाश्वत फायदे आणि निरंतर वाढीची शक्यता असलेल्या कंपन्यांचा त्यांनी त्या कंपन्यांना असलेल्या अधिक मूल्यांकनाची पर्वा न करता समावेश केला आहे. एखाद्या कंपनीचे मूल्यांकन करताना निधी व्यवस्थापक गुणात्मक आणि संख्यात्मक विश्लेषणावर भर देतात. शाश्वत व्यवसाय नीतिमान व्यवस्थापन स्पर्धात्मक फायदे असलेल्या कंपन्यांना त्यांनी प्राधान्य दिले आहे. विशेषत: तंत्रज्ञान, आरोग्य सेवा आणि आर्थिक सेवा यासारख्या क्षेत्रात गुंतवणूक करताना ते ‘टॉप-डाऊन’ पद्धत वापरतात. ‘कॅश कॉल’ घेणे त्यांनी कायम टाळले आहे.

जानेवारीअखेर उपलब्ध पोर्टफोलिओनुसार फंडांचा ‘पी/ई’ ३४.८५ पट आहे. पोर्टफोलिओची कार्यक्षमता मोजण्याच्या निकषांपैकी ‘ईपीएस ग्रोथ’ आणि ‘डिव्हिडंड यील्ड’ फंडाच्या मानदंडाच्या तुलनेत गुंतवणुकीस आकर्षक आहेत. ‘क्रिसिल क्वार्टरली रँकिंग’मध्ये तीन वर्षे आणि पाच वर्षे कालावधीच्या कामगिरीत हा फंड मागील काही वर्षे ‘टॉप रँकिंग’मध्ये राहिलेला आहे. एक कुशल व्यवस्थापक आणि सिद्ध रणनीतीमुळे हा फंड ‘लोकसत्ता कत्रे म्युच्युअल फंडा’च्या यादीचा मागील सहा वर्षांपासून सतत भाग राहिला आहे. या फंडातील १० टक्के रक्कम पहिल्या वर्षी कोणत्याही शुल्का (एग्झिट लोड) शिवाय काढता येते. सर्व प्रकारचे जोखिमांक असलेल्या गुंतवणूकदारांनी त्यांच्या गुंतवणुकीसाठी आवर्जून विचार करावा असा हा फंड आहे.

shreeyachebaba@gmail.com

*   म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर