23 February 2020

News Flash

बंदा रुपया : पूल जोडला ध्येयासक्तीचा

मराठी मातीतील उद्यम-व्यवसायातील नवधुमाऱ्यांचा वेध घेणारे साप्ताहिक सदर ..

(संग्रहित छायाचित्र)

उद्योग-व्यवसाय म्हटला की अनेक प्रकारची जोखीम घेणे आलेच. जोखीम बाबींनाही अनेक कंगोरे असतात. व्यवसाय मराठी माणसाचा असेल तर त्याच्याकडे पाहणाऱ्यांचा दृष्टिकोन अनेकदा तितकाच नकारात्मकच असल्याचे दिसून येते. म्हणूनच सरकारसाठी महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना हातभार लावणारा व्यवसाय करणे आणि तोही मराठी माणसाने करणे असे अपवादात्मक काही करून दाखविणारे शिरीष बेंडाळे यांचे वेगळेपण भावणारे. आज मुंबई महानगर क्षेत्रात सक्षम वाहतूक व्यवस्थेसाठी उभारण्यात येणारे मेट्रो, उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपूल आणि पादचारी पूल अशा मोठय़ा पायाभूत प्रकल्पांच्या उभारणीसाठी शटरिंग आणि स्टील गर्डर तयार करते ती ठाणे जिल्ह्य़ातील अंबरनाथ येथील त्यांची ओम टेक्नो इंजिनीअर्स कंपनी.

मूळचे जळगावच्या यावल तालुक्यातील अट्रावल गावी जन्मलेल्या मात्र बालवयातच उल्हासनगर येथे आलेल्या शिरीष बेंडाळे यांना उद्योगाचे बाळकडू लहानपणीच मिळाले. वडील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नोकरीला. वडिलांना आर्थिक हातभार म्हणून शिरीष बेंडाळे हे उल्हासनगर येथील त्यांच्या अरुंद घरामध्ये भाऊ, आईसह मणी ओवणे, मिठाईचे बॉक्स तयार करणे, नॉयलॉनच्या पिशव्या तयार करणे असे उद्योग करत असत. या सर्व कामांमध्ये व्यवहार चोख ठेवण्याची जबाबदार ही बेंडाळे यांच्यावर असे. या कामांसोबतच त्यांचे सहावीपर्यंतचे शिक्षण उल्हासनगर येथे झाले. त्यानंतर वडिलांची बदली अंबरनाथ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत झाली. त्यामुळे बेंडाळे कुटुंबीय अंबरनाथ येथे राहायला आले. ११वी-१२वीचे शिक्षण आरकेटी महाविद्यालयात झाले आणि पुढे त्यांनी सोमय्या महाविद्यालयातून प्रॉडक्शन इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. कॅम्पस इंटरव्ह्य़ूद्वारे शिरीष बेंडाळे यांना गोदरेज अ‍ॅण्ड बॉईसमध्ये उत्तम पगाराची नोकरी मिळाली. मात्र अंगी उद्यमशीलता भिनली असल्याने आणि नवीन काही तरी शिकण्यास वाव मिळत नसल्याने अवघ्या ८ ते ९ महिन्यांतच त्यांनी ती नोकरी सोडली.

त्यानंतर शिरीष यांच्या एका मित्राने त्यांना फॅब्रिकेशनच्या कामाविषयी माहिती देऊन अंबरनाथच्या औद्योगिक परिसरात फॅब्रिकेशनसाठी कोणत्या सोयी आहेत याची विचारपूस करण्यास सांगितले. त्यासमयी औद्योगिक परिसरात फिरले असताना त्यांना पुढे वाढून ठेवलेल्या आव्हानांची जाणीव झाली. कोणी दाद देणे सोडाच, धडपणे बोलायलाही तयार नव्हते. काही काळ असेच धक्के सोसण्यात गेला. एका परिचितासह भागीदारीत व्यवसाय करण्याचे शिरीष यांनी ठरवले. उशिराने का होईना श्रीगणेशाही झाला. छोटय़ाशा स्टील फॅब्रिकेशनच्या कामातून त्यांना सुरुवातीलाच ७० हजारांचा नफा झाला. मात्र जोखीम घटक दुर्लक्षिल्याने जे व्हायचे तेच झाले. भागीदारीचा हा कारभार तोंडीच निर्णय करून झाला होता. याचा नेमका गैरफायदा घेतला गेला आणि शिरीष यांना त्याचा आर्थिक फटका बसला. अर्थातच भागीदारी सोडून नव्याने व्यवसाय सुरू करण्याचे त्यांनी ठरविले. हे प्रारंभिक अपयश बाजूला सारून नव्याने उभे राहण्यासाठी शिरीष यांना त्यांच्या वडिलांचा पाठिंबा मिळाला. गोदरेज अ‍ॅण्ड बॉईस कंपनीत नोकरी करत असताना साठविलेले ७५ हजार रुपयांचे भांडवल, भागीदारीच्या व्यवसायातून पदरात पडलेले दीड लाख रुपये आणि बँकेकडून मिळालेले कर्ज यावर त्यांनी नव्याने उद्योगास प्रारंभ केला. व्यवसायासाठी त्यांनी अंबरनाथच्याच औद्योगिक वसाहतीत जागा पाहण्यास सुरुवात केली. त्यासाठी मोठी शोधाशोध केली आणि अखेर त्यांना एक साजेशी जागा मिळाली. चार-पाच मदतनीसांच्या साहाय्याने शिरीष यांनी १२ जानेवारी २००३ साली ओम टेक्नो इंजिनीअर्स कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. फॅब्रिकेशनची विविध कामे घेण्यास सुरुवात केली.

धातू जोडकामातून बनावट अर्थात संविरचना हे फॅब्रिकेशनचे काम असते. यातील पाच वर्षांचा अनुभवही खूप मोलाचा असतो. म्हणूनच २००९ मध्ये शिरीष त्यांच्या कंपनीची उलाढाल ही अडीच कोटींच्या आसपास गेली. उद्योगाचा पसारा वाढत गेला तसतसे तज्ज्ञ व कुशल मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात येऊ लागली. त्याच वर्षी पाच इंजिनीअर्सचा कंपनीच्या सेवेत समावेश केला गेला. त्यानंतर काम वाढत गेल्याने त्यांनी २०११ मध्ये औद्योगिक वसाहतीत आणखी एक जागा घेण्याचे ठरवले. या जागेचे बांधकाम पाहून जवळच असणाऱ्या गोदरेज कंपनींने रसायनाच्या निर्मितासाठी आवश्यक मोठे बंब तयार करण्याचे काम शिरीष यांच्या कंपनीलाच दिले. त्यानंतर देवदार वृक्षाच्या लाकडापासून वैशिष्टय़पूर्ण चिमण्या तयार करणे, प्रेशर वेसल्स, रसायन साठवणुकीचे मोठय़ा आकाराचे बंब तयार करणे यासारखी लोह आणि पोलादाशी संबंधित विविध कामे ओम टेक्नो इंजिनीअर्सतर्फे करण्यात येऊ लागली.

प्रत्येक व्यावसायिकाच्या आयुष्यात एक प्रगतीपर निर्णायक वळण येते जे शिरीष बेंडाळे यांच्याही उद्यमजीवनातही आले. २०१४ मध्ये भाजप सरकार सत्तेवर आले. त्या वेळेस दूरचित्रवाणीवर देशातील केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे पायाभूत सोयीसुविधा विकासासंबंधी महत्त्वाकांक्षी भाषण हे शिरीष यांना खासच स्फुरण देणारे ठरले. गडकरी यांचे ध्येयधोरण ऐकून शिरीष यांनाही पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. त्यासाठी फॅब्रिकेशनच्या सुरू असलेल्या कामात काहीसा बदल करणे अपरिहार्य होते. मेट्रो, उड्डाणपूल, रेल्वे पूल आणि पादचारी पूल या मोठय़ा वाहतूक प्रकल्पांच्या उभारणीसाठी आवश्यक सामग्रीची उभारणी करण्यास त्यांनी सुरुवात केली. यामध्ये उड्डाणपुलांसाठी आवश्यक गर्डर तयार करणे, मेट्रोसाठी उभारण्यात येणाऱ्या खांबांसाठी शटरिंग तयार करणे ही कामे त्यांच्या कंपनीत करण्यात येऊ लागली. ठाणे-नाशिक महामार्गावरील माणकोली येथील उड्डाणपुलाचे १५० फूट लांबीचे लोखंडी गर्डर शिरीष यांच्या कंपनीद्वारे तयार करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मुंबई मेट्रोमधील केशरी रंगाचे सर्व स्टील सांगाडे याच कंपनीद्वारे तयार करण्यात आले आहेत. तेथील सफलतेचा फायदा म्हणून मुंबईसह नागपूर, कोची आणि पुणे या ठिकाणीही मेट्रोच्या सांगाडय़ांचे शटरिंगचे कामही ओम टेक्नो इंजिनीअर्सकडे आले. रेल्वे पूल आणि पादचारी पुलांसाठीचे स्टील गर्डरचेही कामही कंपनीला मिळाले. चेंबूर, बेलापूर, रे रोड आणि भांडुप रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलांच्या स्टील गर्डरचे काम या कंपनीकडून करण्यात आले आहे. आज शिरीष बेंडाळे हे पायाभूत सुविधांच्या बांधकामांना आवश्यक असणारे शटरिंग आणि स्टील गर्डरची तयार करण्याची कामे संपूर्ण भारतभर करत आहेत.

प्रगतीचे एक एक पाऊल पुढे टाकत आज पोलादाशी संबंधित उद्योगांमध्ये ओम टेक्नोचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. भविष्यात पायाभूत सुविधा क्षेत्रातच अधिक काम करून पुढच्या दोन वर्षांमध्ये ५० कोटी रुपयांचा वार्षिक उलाढालीचा टप्पा कंपनी गाठेल, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. या व्यवसायात रतन टाटा हेच आपले आदर्श असल्याचे शिरीष बेंडाळे सांगतात. उद्योगामध्ये येणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने सचोटीने आणि नीती-तत्त्वांसह व्यवसाय करून दिलेला शब्द पाळायला हवा. एखाद्याने मदत केली तर त्याच्या उपकाराची जाण ठेवणे व्यावसायिकाला गरजेचे असल्याचे ते आवर्जून सांगतात.

ऋषिकेश मुळे

शिरीष बेंडाळे (ओम टेक्नो इंजिनीअर्स)

* उत्पादन : अभियांत्रिकी क्षेत्रात विविध कामे

* मूळ गुंतवणूक  : ७५ हजार रु.

* गुंतवणूकदार : स्व-अर्जित निधी

* सरकारी योजनेचा फायदा? :  नाही

* कर्जदार वित्तीय संस्था :  जय हिंद को-ऑप. बँक, टीजेएसबी सहकारी बँक

* सध्याची उलाढाल : २० कोटी रु.

* रोजगार निर्मिती : ७५ कर्मचारी

* शिक्षण : प्रॉडक्शन इंजिनीअर पदवी

* डिजिटल सक्षमता : संकेतस्थळ : www.omtechno.co.in

आरडीएसओ परवाना अन् उल्लेखनीय झेप

मेट्रो आणि रेल्वेसाठी पुलांचे गर्डर बनविण्याचे काम ओम टेक्नो इंजिनीअर्सतर्फे करण्यात येत आहे. भारतीय रेल्वेसाठी या प्रकारचे पुलांसाठीचे स्टील गर्डर बनविण्याचा परवाना महाराष्ट्रात मोजक्या तीन ते चार कंपन्यांकडेच आहे. विशेष बाब म्हणजे शिरीष बेंडाळे यांच्या कंपनीचा देखील यात समावेश आहे. १ एप्रिल २०१९ रोजी कंपनीला आरडीएसओचा परवाना प्राप्त झालेला असून भारतातील कोणत्याही रेल्वेवर पादचारी पूल किंवा रेल्वे उड्डाणपूल यासाठी लागणारे स्टील गर्डर तयार करण्याचा हक्क त्यामुळे ओम टेक्नो इंजिनीअर्स कंपनीला मिळाला आहे.

* लेखक ‘लोकसत्ता’चे ठाणे प्रतिनिधी rushikesh.mule@expressindia.com

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल :  arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.

First Published on February 3, 2020 4:08 am

Web Title: article on om techno engineers company abn 97
Next Stories
1 फायद्यातील ‘एपीएल’ फॉर्म्युलेशन..
2 कुटुंबाचा अर्थसंकल्प
3 बाजाराचा तंत्र कल : बाजाराचा अपेक्षाभंग आता पुढे काय?
Just Now!
X