वसंत माधव कुळकर्णी
वेगवेगळ्या गुंतवणूक कालावधी आणि वित्तीय ध्येयांसाठी (सेवानिवृत्ती किंवा मुलांचे शिक्षण), तसेच नियमित उत्पन्न प्राप्तीसारख्या गरजांसाठीही अनेकविध पोर्टफोलिओ; अचूक गुंतवणूक साधनांची निवड (म्युच्युअल फंड, मुदत ठेव, मुदतीची विमा योजना, अल्पबचतीच्या सरकारी योजना) करण्यास साहाय्य.. असा हा ‘सेबी’कडे नोंदणीकृत असलेला ‘गुंतवणूक विश्लेषक’ मंच आहे. वार्षिक वर्गणी भरून गुंतवणूकदारांना निष्पक्ष सल्ला मिळविण्यासाठी खुले झालेले हे र्सवकष व्यासपीठच!
जगभरात ‘डू इट युवरसेल्फ (डीआयवाय)’ संप्रदाय वेगाने फोफावतो आहे. याला गुंतवणूक व्यवस्थापनही अपवाद राहिलेले नाही. ‘स्वत: करा (डीआयवाय) गुंतवणूक’ ही एक पद्धत आणि धोरण आहे ज्यात वैयक्तिक गुंतवणूकदार स्वत:ची गुंतवणूक, स्वत:च व्यवस्थापित करतात. गुंतवणूकदार सामान्यत: पूर्ण-सेवा दलाली (फुल सर्व्हिस ब्रोकर) किंवा व्यावसायिक निधी व्यवस्थापकांची (आरआयए) सेवा न घेता सवलतीच्या दलाली संस्था (डिस्काऊंट ब्रोकर्स) आणि नि:शुल्क गुंतवणुकीची सेवा देणाऱ्या मंचांचा वापर करतात. नव्याने उदयाला आलेल्या या ‘डीआयवाय’ गुंतवणूकदार संप्रदायाच्या अगदी विरुद्ध ‘डन फॉर मी’ म्हणजे सर्व काही हातात मिळण्यासाठी व्यावसायिक शुल्क देऊन त्यांचे सेवा घेणारे गुंतवणूकदारसुद्धा मोठय़ा प्रमाणावर आहेत.
‘डीआयवाय’ संप्रदायाचे काही तोटे आहेत. हे सांप्रदायिक मुख्यत्वे हौशी किंवा यांत्रिक (रोबो) सल्लागाराचे साहाय्य घेतात. हौशी किंवा यांत्रिक (रोबो) सल्लय़ांत व्यावसायिकतेचा अभाव असतो. यांत्रिक सल्लागारांना केवळ आकडे कळतात. त्यांच्या सल्लय़ात भावनांचा अभाव असतो. हे यांत्रिक सल्लागार मुख्यत्वे ‘अल्गोरिदम’चा (संगणक प्रणालीवर आधारित कार्यसूचनांचे पालन) वापर करून साचेबद्ध पर्याय सुचवितात. मुखत्वे ही पद्धत निष्क्रिय गुंतवणुकीचा मागोवा घेण्यासाठी वापरली जाते. सक्रिय व्यवस्थापन असलेल्या फंडात मानवी हस्तक्षेप अर्थात निधी व्यवस्थापकाचे कौशल्य तांत्रिक सल्लागारापेक्षा चांगला परतावा मिळवून देते असे आढळून आले आहे. ‘डीआयवाय’ पंथातील गुंतवणूकदारांची नेमकी हीच गरज ओळखून सुरू झालेला ‘प्राइमइन्व्हेस्टर डॉट इन’ PrimeInvestor.in हा मंच अस्तित्वात आल्याला एक वर्ष पूर्ण झाले असल्याने त्याची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते.
‘प्राइमइन्व्हेस्टर डॉट इन’ हा विश्लेषण मंच आहे. या मंचाने ‘सेबी’कडे ‘गुंतवणूक विश्लेषक’ (इन्व्हेस्टमेंट अॅनालिस्ट) म्हणून नोंदणी केली आहे. गुंतवणूकदारांना वार्षिक वर्गणी आकारून निष्पक्ष सल्ला मिळविण्याची सुविधा हा मंच प्रदान करतो. आधुनिक काळातील गुंतवणूकदारांना पडणाऱ्या प्रश्नांचा मागोवा घेत, ‘प्राइम’द्वारे उच्च-गुणवत्तापूर्ण आणि निष्पक्ष संशोधनावर आधारित विश्लेषणात्मक उत्तरे देणारे संशोधन अहवाल वर्गणीदारांपर्यंत पोहोचविले जातात. ‘प्राइम’ जवळजवळ उपलब्ध सर्व वैयक्तिक गुंतवणूक/ विमा उत्पादनांचे विश्लेषण करून संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधनानंतर शिफारस करतो किंवा गुंतवणूक टाळण्याचा सल्ला देतो. या मंचाचे वर्गणीदार होण्यापूर्वी संभाव्य वर्गणीदार कशाची अपेक्षा करू शकतात आणि कशाची अपेक्षा करू नये याची जंत्री ‘प्राइम’ने संकेतस्थळावर दिली आहे.
चेन्नईस्थित श्रीकांत मीनाक्षी यांना या नवोद्यमी उपक्रमाची कल्पना सुचली. सध्याचा उपक्रम सुरू करण्याआधी त्यांनी राष्ट्रीय पातळीवर म्युच्युअल फंड वितरणाची यंत्रणा उभी केली होती. या वितरण मंचासाठी कार्यरत असतानाच्या त्यांच्या माजी सहकारी विद्या बाला आणि भावना आचार्य यांच्या सहयोगाने ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली. मंच अस्तित्वात आल्यानंतर आरती कृष्णन या चमूला सल्लागार संपादक म्हणून येऊन मिळाल्या. विद्या बाला आणि आरती कृष्णन यांची ओळख गुंतवणूकदारांना स्तंभलेखिका म्हणून आहे. त्यांनी विविध इंग्रजी नियतकालिकांसाठी प्रदीर्घ काळ स्तंभलेखन केले आहे. वर्षभरापूर्वी तीन संस्थापक आणि दोन कर्मचारी यांच्यासह सुरू झालेला हा प्रवास वर्ष संपत असताना दहावर पोहोचला आहे.
‘प्राइम’चे ‘रेडी टू यूज’ स्वरूपाचे २० वेगवेगळे पोर्टफोलिओ वर्गणीदारांना उपलब्ध असून वेगवेगळ्या गुंतवणूक कालावधींसाठी, वेगवेगळ्या वित्तीय ध्येयांसाठी (सेवानिवृत्ती किंवा मुलांचे शिक्षण), वेगवेगळ्या गरजांसाठीही (नियमित उत्पन्न, वाढ इत्यादी) पोर्टफोलिओ आहेत. वर्गणीदारांना गुंतवणूक साधनांची अचूक निवड (फंड, मुदत ठेव, निधी, मुदतीची विमा योजना, वेगवेगळ्या अल्प बचतीच्या सरकारी योजना) करण्यास साहाय्य करतात. या मंचावर प्रत्येक पोर्टफोलिओसाठी तपशीलवार विवरण, त्यामागची तर्कसंगत कारणे वर्गणीदाराला कळतात. एक सामान्य गुंतवणूकदार त्यांच्याशी संबंधित कोणत्याही गरजेसाठी पोर्टफोलिओची निवड करू शकतो. विवेकी गुंतवणूकदार स्वत:ची वित्तीय उद्दिष्टे निश्चित करण्यासाठी ‘प्राइम’ची मदत घेऊ शकतात. एक सामान्य गुंतवणूकदार त्यांच्या कोणत्याही गुंतवणूकविषयक प्रश्नांची पर्यायी उत्तरे या मंचावर शोधू शकेल. अनुभवी गुंतवणूकदारांसाठी, ‘प्राइम’ने फंड निवडण्यासाठी ‘थीम पार्क’ उपलब्ध करून दिले असून वर्गणीदार गुंतवणुकीच्या कल्पनांसह या ठिकाणी जाऊन वित्तीय ध्येयांची पूर्तता करणाऱ्या फंडांची निवड करू शकतील. सर्व वर्गणीदारांसाठी त्यांच्या गुंतवणुकीवर तज्ज्ञांचे मत अजमावण्यासाठी पुनरावलोकन साधने उपलब्ध असून शिफारस केलेले फंड आणि ईटीएफची यादी वापरू शकतात. ‘‘आम्ही प्रत्येक तिमाहीअंती आमच्या शिफारसप्राप्त फंडांची कामगिरी तपासून आवश्यक भासल्यास बदल करतो. याशिवाय, ‘प्राइम’ आठवडय़ातून तीन वेळा फंड रणनीतीसंदर्भातील शिफारसी आणि बाजार विश्लेषणाच्या आधारे दर्जेदार मजकूर प्रकाशित करतो, असे मंचाच्या एक संस्थापक विद्या बाला सांगतात. या सर्व सेवा वार्षिक २५०० रुपये वर्गणीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ‘पर्सनलफिन’, ‘मनीलाइफ’, ‘व्हॅल्यू रिसर्च’ आणि ‘मॉर्निगस्टार’ यासह अन्य माध्यमे संशोधन सेवा देत असली तरी, ‘‘या सर्वाची उपलब्धता मर्यादित किंवा विशिष्ट सेवांपुरती मर्यादित आहे, तर ‘प्राइम’च्या सेवा वित्तीय बाजारातील सर्व उत्पादनांना सामावणाऱ्या आहेत. ग्राहकांकडून घेतलेले सदस्यत्व शुल्क हे केवळ प्राइमच्या उत्पन्नाचा स्रोत आहे. कोणताही मोबदला, दलाली किंवा संकेतस्थळावर जाहिरात करण्यासाठी म्युच्युअल फंड किंवा विमा कंपन्यांकडून शुल्क स्वीकारत नाही,’’ असा श्रीकांत यांचा दावा आहे. वार्षिक वर्गणी स्वीकारण्यास सुरुवात झाल्यापासून या मंचाचे ५००० नोंदणीकृत वापरकर्ते आणि १००० वर्गणीदार ग्राहक असल्याची माहिती श्रीकांत यांनी दिली. ‘हे कोणत्याही विपणन खर्चाशिवाय तसेच विविध माध्यमांनी आमच्या उपक्रमाची दखल घेतली म्हणून हे शक्य झाले. पुढच्या तीन वर्षांत ‘प्राइम’ने दरवर्षी १०० टक्के वाढीचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच साहसी गुंतवणूकदारांकडून निधी उभारण्याचा विचार नसल्याचे सांगत नजीकच्या विस्तारासाठी संस्थापकच आर्थिकदृष्टय़ा सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.
shreeyachebaba@gmail.com
* म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर