portfolioमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ही मिड-कॅप कंपनी गेली दीड -दोन वष्रे सातत्याने उत्तम कामगिरी करत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात माध्यम, किरकोळ विक्री आणि पर्यटन आदी क्षेत्रात ‘अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट’ आणि सल्लागार म्हणून माइंड ट्री यशस्वीरीत्या कार्यरत आहे. कंपनीच्या एकूण उत्पन्नापकी ६०% उत्पन्न अमेरिकेतून तर २६% उत्पन्न युरोपातून येते. गेल्या १२ महिन्यात कंपनीने ६५ कोटी डॉलर्सची कंत्राटे av-03घेतली असून गत वर्षीच्या तुलनेत ती ३०% ने जास्त आहेत. चालू आíथक वर्षांत तसेच येणाऱ्या आíथक वर्षांत कंपनीच्या प्रगतीचा दर त्याच क्षेत्रातील इतर माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या तुलनेत थोडा जास्त म्हणजे १६% असेल, अशी अपेक्षा आहे. यंदा कंपनीने नवीन ग्राहक करारदेखील यशस्वीरीत्या केले आहेत.
३० सप्टेंबर २०१४ साठी संपणाऱ्या तिमाहीसाठी जाहीर झालेल्या आíथक निकषाप्रमाणे यंदाच्या तिमाहीत कंपनीच्या उलाढालीत १५% वाढ होऊन ती ८८८.६० कोटी रुपयांवर गेली आहे. तर नक्त नफ्यात किरकोळ ७% वाढ होऊन तो गत वर्षीच्या कालावधीच्या तुलनेत १३७.४० कोटी रुपयांवर गेला आहे. सध्या १,२०० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर मध्यम ते दीर्घ कालीन गुंतवणुकीसाठी खरेदी करा/राखून ठेवा.
गेल्या आठवडय़ात सुचवलेला ‘शेरॉन बायो मेडिसिन’ त्याच दिवशी म्हणजे सोमवारी २०% ने गडगडला. त्या दिवशी अनेक गुंतवणूकदारांनी आता हे नुकसान कसे भरून काढायचे किंवा हा शेअर का खाली गेला किंवा आता मी काय करू, अशा आशयाच्या मेल्स पाठवल्या. मी या मेल्सना उत्तरे पाठवली नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे या स्तंभातून सुचवलेले शेअर्स तुम्हाला स्वत:च्या जोखमीवर घ्यायचे आहेत. तसेच मागील अनेक लेखांमधून सुचवल्याप्रमाणे कुठल्याही शेअरच्या गुंतवणुकीसाठी स्टॉप लॉस पद्धतीचा अवलंब करायलाच हवा. गुंतवणूक सल्लागारदेखील एक माणूसच असतो आणि त्याच्याही चुका होऊ शकतात. म्हणूनच स्वत:चा अभ्यास आणि अर्थात जोखीम ही स्वत:च घ्यावी.