|| सुधीर जोशी

पायाभूत सुविधा, आरोग्यनिगा व ग्रामीण भारतावर लक्ष केंद्रित करून वित्तीय तुटीची तमा न बाळगता नवीन गुंतवणुकीच्या योजना आखणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे बाजाराने केलेले स्वागत हे न भूतो न भविष्यति असेच म्हणावे लागेल. बाजाराला भीती वाटलेल्या कुठल्याही करवाढीच्या मार्गाचा अवलंब अर्थमंत्र्यांनी केला नाही. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी अर्थसंकल्पाचे बाजाराचे प्रमुख निर्देशांक पाच टक्क्यांनी वर गेले. पुढील प्रत्येक दिवशी वरचा टप्पा गाठत सेन्सेक्स व निफ्टी हे बाजाराचे प्रमुख निर्देशांक साप्ताहिक तुलनेत साडेनऊ टक्क्यांनी वर गेले. सरकारी बँकांमधील तेजीमुळे बँकनिफ्टी साडेसोळा टक्यांनी वर गेला.

अर्थसंकल्पामध्ये ग्राहकोपभोग्य क्षेत्रासाठी कुठलाही ठोस निर्णय नसला तरी सिगारेटवर नवीन कर नसल्यामुळे आयटीसीच्या समभागात वाढ झाली. कंपनीचे तिमाही निकाल व अंतरिम लाभांशाची घोषणा या सप्ताहात अपेक्षित आहे. बाकी ग्राहकोपभोग्य कंपन्यांच्या समभागात फारशी वाढ झाली नाही तरी कंपन्यांवर किंवा सामान्य नागरिकांवर अतिरिक्त कर बोजा नसल्यामुळे या क्षेत्रातील प्रगतीला अडसर येणार नाही. रस्ते व वाहतूक क्षेत्राच्या वाढीसाठीच्या तरतुदीत १७ टक्क्यांची वाढ करण्यात आली. त्याचा फायदा रस्तेबांधणी व सिमेंट कंपन्यांना होईल.

एचडीएफसीच्या तिमाही नफ्यात गेल्या वर्षांतील भांडवली फायदा विचारात घेतला नाही तर २७ टक्के वाढ झाली. गृहबांधणी क्षेत्राला असलेला सरकारच्या धोरणांचा फायदा लक्षात घेता कंपनीमधील गुंतवणूक आणखी फायदा करून देईल. एचडीएफसीचा त्याच समूहातील इतर कंपन्यांतील भांडवली वाटा (एचडीएफसी बँक २१%, एचडीएफसी एएमसी ५२%, एचडीएफसी लाइफ ५०%) कंपनीला नेहमीच अधिक मूल्यांकन देत राहील.

इंडिगो पेंट्स या पाचव्या स्थानावर असणाऱ्या कंपनीचे समभाग प्राथमिक भाग विक्रीनंतर बाजारात सूचिबद्ध झाले व नशीबवान गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी शंभर टक्क्यांहून जास्त नफा मिळाला. बाजारातील प्रस्थापित एशियन पेंन्ट्सपेक्षा किती तरी जास्त मूल्य या कंपनीच्या समभागांना मिळत आहे. इंडिगो पेंट्समध्ये नव्याने गुंतवणूक करण्यासाठी महिनाभर वाट पाहावी लागेल.

सिमेंट व कृत्रिम धाग्यांमध्ये भक्कम पाय रोवलेली ग्रासिम इंडस्ट्रीजदेखील रंग क्षेत्रामध्ये उतरत आहे. कंपनीला बिर्ला व्हाइट पुट्टीच्या बळकट नाममुद्रेचा व वितरण जाळ्याचा फायदा होईल. कंपनीचे तिमाही निकाल या सप्ताहात जाहीर होतील.

एसकॉर्ट्स कंपनीच्या तिमाही निकालात उत्पन्नात २४ टक्के तर नफ्यात ८३% वाढ झाली. कंपनीच्या उत्पन्नात ग्रामीण भागातील शेतीला पूरक ट्रॅक्टर व इतर यंत्रे, पायाभूत क्षेत्रासाठी लागणारी अवजड यंत्रसामग्री व रेल्वेसाठी लागणारी यंत्रणा यांचा अनुक्रमे ७७, १५ व ८ टक्के वाटा आहे. ही तीनही क्षेत्रे सध्या सरकारच्या धोरणांमध्ये अग्रक्रमावर आहेत. त्यामुळे कंपनीचे भवितव्य उज्ज्वल आहे. प्रत्येक घसरणीच्या काळात कंपनीमध्ये टप्प्याटप्प्याने केलेली गुंतवणूक चांगला फायदा मिळवून देईल.

अमेरिकेत गेमस्टॉप या एका कंपनीतील समभागांच्या व्यवहारांमुळे अमेरिकन बाजारात  झालेल्या अभूतपूर्व वादळासारखे भारतीय भांडवली बाजाराला गेल्या सप्ताहात उधाण आले. स्टेट बँक, महिंद्रा आणि महिंद्रा, टाटा मोटर्स तसेच इतर अनेक मिडकॅप कंपन्यांचे निकाल उत्साहवर्धक आले आहेत. जानेवारी महिन्यातील जीएसटी व वाहन विक्रीचे आकडे तसेच पीएमआय निर्देशांकही अर्थव्यवस्थेला गती मिळत असल्याचे संकेत देत आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरांनी रेपो रेट कायम ठेवत, अर्थव्यवस्थेच्या वाढीला पूरक धोरण जाहीर करून, सकल उत्पादनात पुढील वर्षी साडेदहा टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे भारतीय बाजारात गेम स्टार्ट झाला आहे असेच म्हणावे लागेल. अर्थसंकल्प व रिझव्‍‌र्ह बँकेचा पतधोरण आढावा या ठळक घटना होऊन गेल्यावर बाजाराचे लक्ष उर्वरित कंपन्यांच्या निकालांवर व जागतिक घडामोडींकडे राहील. बाजारात नफावसुलीमुळे येऊ शकणारी एखादी घसरण खरेदीची संधी असेल.

sudhirjoshi23@gmail.com