आशीष ठाकूर

गेल्या लेखात निफ्टी निर्देशांकाचे ११,२३५ हे वरचे लक्ष्य सूचित केलेले होते. सरलेल्या सप्ताहात गुरुवारी निफ्टी निर्देशांकाने ११,२३९ चा दिवसांतर्गत उच्चांक मारत अचूक लक्ष्यवेध केला. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव:

सेन्सेक्स : ३८,१२८.९० / निफ्टी : ११,१९४.१५

बुद्धिबळात घोडय़ाची चाल जशी अडीच पावले असते, तशीच तेजी-मंदीची खेळी ही निफ्टी निर्देशांकांवर ३५० अंशांची आहे. या महिन्याच्या पूर्वार्धात निफ्टी निर्देशांकाला जेव्हा १०,९०० चा स्तर ओलांडण्यास वारंवार अपयश येत होते, तेव्हा निफ्टी निर्देशांक १०,९०० उणे ३५० अंश १०,५५० वर स्थिरावयाचा आणि पुन्हा वर उसळत असे.

पण निफ्टी निर्देशांकाने १०,९०० चा स्तर पार केल्यावर निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य काय असेल? तर पुन्हा १०,९०० अधिक ३५० अंश ११,२५०. या लक्ष्यासमीप सरलेल्या सप्ताहातील गुरुवारचा उच्चांक होता. अशी ही इतकी अचूक ३५० अंशांमध्ये निफ्टी निर्देशांकाची तेजी-मंदीची वाटचाल चालू आहे.

लक्ष्यपूर्ती झाल्याने आता भविष्यातील निर्देशांकाची वाटचाल कशी असेल?

आताच्या घडीला निर्देशांकावर सर्वसमावेशक तेजी नसून, अवघ्या सात-आठ समभागांना, ज्यांचे निर्देशांकावर प्रस्थ, वजन आहे अशांना हाताशी धरून तेजीचा डोलारा सांभाळला जात आहे. तेव्हा तेजीच्या भविष्यकालीन वरच्या लक्ष्यासाठी पुन्हा आपल्याला निफ्टीवरील ३५० अंशांच्या तेजी-मंदीच्या वाटचालीला ‘केंद्रभूत’ मानून भविष्यातील वाटचालीचा आढावा घ्यावा लागेल.

येणाऱ्या दिवसांत निफ्टीचा भरभक्कम आधार हा १०,९०० असेल तर सेन्सेक्सवर ३७,००० असा असेल. हा आधार निर्देशांकांनी सातत्याने राखल्यास निर्देशांकांचे प्रथम वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३८,२०० आणि निफ्टीवर ११,२५० असेल आणि त्यानंतर सेन्सेक्सवर ३९,५०० आणि निफ्टीवर ११,६०० चा स्तर दृष्टिपथात येईल.

आताच्या घडीला तेजी र्सवकष नसल्याने, निर्देशांकांनी सेन्सेक्सवर ३७,००० आणि निफ्टीवर १०,९०० चा स्तर राखल्यास उत्तमच, पण जर का हा उपरोक्त स्तर राखण्यास निर्देशांक अपयशी ठरल्यास सेन्सेक्स ३५,७०० आणि निफ्टी १०,५५० पर्यंत खाली घसरू शकतो.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com