‘अर्थ’पूर्ण : जेवढय़ा लवकर सुरू कराल तेवढे चांगले!

नुकतेच चांगल्या कॉलेजमधून बी.टेक. झालेले सुनील कासले यांनी नागपूरहून प्रश्न विचारला आहे- प्रॉडक्शन इंजिनीअर म्हणून नागपूरलाच एका इंजिनीअरिंग कंपनीत १ जुलै २०१२ ला नोकरी लागली आहे. त्यांची मासिक प्राप्ती रु. २२,०००/-. त्यांनी गुंतवणुकीला सुरुवात केलेली नाही.

नुकतेच चांगल्या कॉलेजमधून बी.टेक. झालेले सुनील कासले यांनी नागपूरहून प्रश्न विचारला आहे- प्रॉडक्शन इंजिनीअर म्हणून नागपूरलाच एका इंजिनीअरिंग कंपनीत १ जुलै २०१२ ला नोकरी लागली आहे. त्यांची मासिक प्राप्ती रु. २२,०००/-. त्यांनी गुंतवणुकीला सुरुवात केलेली नाही. या स्थितीत आर्थिक नियोजन कधी व कसे करावे? त्यांचे आई-वडील दोघेही राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरी करतात. आडगावात किंवा नागपूरच्या बाहेर बदली नको म्हणून दोघांनी आजपर्यंत बढतीच्या संधी नाकारल्या आहेत. वडिलांचे वय ५२ व आईचे वय ४८ आहे.
त्यांना एक लहान बहीण आहे. ती प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत शिकत आहे. सुनील यांच्यावर अवलंबून कोणीही नाही. जाण्या-येण्यासाठी कंपनीची बससेवा आहे. परंतु स्वत:चे वाहन असल्यास कंपनी रु. १०००/- पेट्रोलभत्ता देते. शक्य झाल्यास तीन वर्षांनी एम.बी.ए. करण्याची त्यांची इच्छा आहे. सुनीलजी, आर्थिक नियोजन सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे. पाटी कोरी असताना लिहिलेली अक्षरे स्वच्छ दिसतात. पुसून पुन्हा लिहिल्यास आधी लिहिलेले थोडेतरी राहतेच. तसेच आर्थिक नियोजनाचे आहे. तुमचे आई, वडील दोघेही मिळवते असल्याने सध्या तुम्हास घरखर्चाची जबाबदारी नाही असे गृहीत धरतो. म्हणजे आज तुमच्या बचत खात्यात तीस हजार रुपये असावेत. तुमच्या आर्थिक नियोजनात जोखीम नियोजन, कर नियोजन, निवृत्ती नियोजन व गुंतवणूक नियोजन अभिप्रेत आहे. तसेच तुमच्या गरजा किंवा उद्दिष्टे पुढीलप्रमाणे- घरखरेदी, लग्नासाठी आणि शिक्षणासाठी तरतूद.
जोखीम नियोजन : जोखीम नियोजनात तुमची गरज गंभीर आजाराचा विमा, आयुर्विमा आणि आरोग्य विमा आहे. तुमच्या कंपनीतून आरोग्य विम्याची सुविधा मिळणार नसेल तर दोन लाखांचा आरोग्य विमा उतरवावा. त्या करारातील सर्व अटी आधी एजंटला विचारून घ्याव्यात. काही कंपन्या २४ तास किंवा ४८ तास हॉस्पिटलमध्ये वास्तव्य असेल तरच खर्च भरून देतात. आयुर्विम्यासाठी तुमची नोकरी कायमस्वरूपी असणे आवश्यक आहे. आयुर्विमा कंपन्यांच्या वेबसाइटवर ही माहिती उपलब्ध असते. त्यानुसार रु. ५० लाखांची टर्म पॉलिसी घ्यावी. वेबसाइटवर लॉग ऑन करून पॉलिसी घेतल्यास खूप स्वस्त मिळते. तुमच्या वयास साधारणत: रु. ७००० ते ८०००/- वार्षिक हप्ता येईल. पुढील काही वर्षांनंतर उत्पन्नवाढ झाल्यावर आयुर्विमा वाढवावा. गंभीर आजाराचा विमा (Critical illness cover) तुमच्या वयास रु. ५ लाखांस वार्षिक हप्ता रु. १०००/- असेल व अपघात विमा ५ लाखांस वार्षिक हप्ता रु. १०००/- असेल. दोन्ही विमा सर्वसाधारण विमा प्रकारात येतात. नोकरीला लागल्यापासूनच निवृत्तीची सोय म्हणून गुंतवणूक सुरू केल्यास अवधी खूप मिळतो व थोडी रक्कम नियमित बाजूला काढल्यास मोठी रक्कम जमा होते. त्यासाठी रु. १०००/- दरमहा चांगल्या इक्विटी म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये गुंतवणूक करावी. आपण ५८ व्या वर्षी निवृत्त होणार असे धरल्यास एकूण ३६ वर्षे आपणास मिळतात. इतक्या मोठय़ा काळात इक्विटी म्युच्युअल फंडात १२ ते १५% परतावा सहज मिळू शकतो. आपण रु. १०००/- दरमहा भरल्यास १३% परतावा अपेक्षित धरल्यास ३६ वर्षांनी ही रक्कम रु. ९६ लाख होईल. ही रक्कम तुमच्या कंपनीच्या पी.एफ. आणि ग्रॅच्युइटीव्यतिरिक्त जास्तीची असेल. बहुतेक वेळा निवृत्ती योजनांचा विचार वयाच्या चाळिशीनंतर केला जातो. परंतु लवकर सुरुवात केल्यास व नियमितता राखल्यास मोठी रक्कम जमा होते.
कर नियोजन : चालू आर्थिक वर्षांत तुम्हास करपात्र उत्पन्न नसेल. तरीसुद्धा या वर्षी पीपीएफचे खाते चालू करावे. हे खाते सोळा आर्थिक वर्षांसाठी असते. गरज नसताना आज खाते चालू केल्यास त्याचे एक वर्ष कमी होईल. या योजनेसाठी आता एजंट नाहीत. त्यासाठी तुम्हाला स्वत: धावपळ करावी लागेल. मार्च महिन्यात सरकारी बँकांत खूप गर्दी असते. बँक कर्मचारी हे खाते मार्च महिन्यात उघडण्यास नाखूश असतात. म्हणून हे खाते लगेचच सुरू करावे. पुढील आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये तुमचे उत्पन्न करपात्र होईल. त्या वेळच्या आयकराच्या तरतुदीनुसार करबचतीसाठी गुंतवणूक करणे आवश्यक असेल.
गुंतवणूक नियोजन : गुंतवणूक करताना ती रोकडसुलभ, कर्जरोखे व जोखीमयुक्त या तीनही प्रकारांत विभागून असावी. तसेच ती आपल्या गरजांभिमुख असावी. आपल्या आयुष्यात चार महत्त्वाचे टप्पे असतात. आपले शिक्षण व्यवसाय, स्वत:चे घर, लग्न तुम्ही अजून तीन वर्षांनी एम.बी.ए. करू इच्छिता. एम.बी.ए. पूर्ण झाल्यावर तुमचे वय जवळपास २७ असेल. नवीन अभ्यासामुळे तुमच्या उत्पन्नात मोठय़ा फरकाने वाढ होईल म्हणून आज फक्त शिक्षणाच्या गरजेचा विचार करून इतर गरजांचा विचार नंतरच्या टप्प्यात करता येईल. शिक्षणासाठी रक्कम तीन वर्षांनंतर लागणार आहे. आज पूर्णवेळ एम.बी.ए. चांगल्या संस्थेतून करावयाचे झाल्यास खर्च पाच लाख किंवा जास्त होतो. मासिक खर्च कमीत कमी ठेवून दरवर्षी दीड ते दोन लाख रुपयांची बचत होऊ शकते व तीन वर्षांत साडेपाच ते सहा लाखांपर्यंत रक्कम तयार होईल. जी तुमच्या शिक्षणास उपयोगी होईल. शिक्षणासाठी याहूनही जास्त खर्च येणार असेल तर बँकेतून शिक्षणकर्ज कमी व्याजदरात मिळू शकते. कर्जफेड शिक्षण पूर्ण होऊन नोकरी लागल्यावर करता येते. गुंतवणुकीसाठी अवधी तीन वर्षांचा असल्यामुळे गुंतवणूक रोकड सुलभ (Emergency fund) आणि कर्जरोखे स्वरूपातच असावी. जोखीमयुक्त गुंतवणूक करू नये. सहा महिन्यांचे उत्पन्न रोकडसुलभ स्वरूपात असावे. साधारणत: रु. ३०,०००/- बचत खात्यात व रु. १,००,०००/- म्युच्युअल फंडांच्या लिक्विड फंडात जमा करावेत. यासाठी जवळपास आठ महिन्यांचा कालावधी जाईल. नंतरची बचत म्युच्युअल फंडांच्या डेट योजनांमध्ये ग्रोथ पर्यायात करावी. हे करताना पुढील वर्षी कर प्रणालीत जे बदल होतील ते विचारात घेणे आवश्यक असेल. नोकरी सोडून एम.बी.ए. करताना दरवर्षी रु. २२,०००/- खर्च विमा आणि रकढ साठी करावा लागेल म्हणून एकूण तरतुदीत रु. ४४,०००/- जास्त विचारात घ्यावे लागतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Artha vruttant saving investment

ताज्या बातम्या