वित्त-नाविन्य : ओळख गमावून तर बसला नाहीत ना!

देशभरात वेगवेगळी बनावट नाव-ओळखी धारण करून लक्षावधी लोकांना गंडा घालणारे ‘स्टॉक गुरू’ खैरे दाम्पत्य अलीकडेच पोलिसांच्या तावडीत सापडले. ‘ओळख चोरी’ हा त्यांच्या सर्व गुन्ह्यंतील सामाईक दुवा होता, त्याचा जाच आपल्यालाही कसा होईल हे पाहा..

देशभरात वेगवेगळी बनावट नाव-ओळखी धारण करून लक्षावधी लोकांना गंडा घालणारे ‘स्टॉक गुरू’ खैरे दाम्पत्य अलीकडेच पोलिसांच्या तावडीत सापडले. ‘ओळख चोरी’ हा त्यांच्या सर्व गुन्ह्यंतील सामाईक दुवा होता, त्याचा जाच आपल्यालाही कसा होईल हे पाहा..
काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. एक बराच जुना मित्र भेटला. अनेक वर्षांनी भेटल्याने एकमेकांच्या चौकशीतच सुरुवातीची काही मिनिटे गेली. आता या बँकेबाहेर काय करतोस असे विचारल्यावर त्याचा चेहरा एकदम उतरला. त्याने सांगितलेली हकिगत थोडक्यात अशी- आयआयटीत शिक्षण पूर्ण झाल्यावर दोन वर्षांत हा अमेरिकेत गेला. अधूनमधून भारतात यायचा. पुण्यात एक फ्लॅटही पाच वर्षांपूर्वी घेतला होता. अमेरिकेत १५ वर्ष काढल्यावर भारतात स्वतचा व्यवसाय करत स्थायिक व्हायचा त्याचा विचार होता. एक औषध बनविण्याचा कारखाना काढण्यासाठी खेळते भांडवल उभे करायला हा बँकेत गेला होता. प्रोजेक्ट रिपोर्ट वगरे सगळे चांगले असूनही बँकेने त्याला कर्ज नाकारले. कारण काय तर त्याने तीन-चार वर्षांपूर्वी तीन बँकांकडून  पर्सनल लोन घेऊन बुडविली होते व दोन बँकांकडून क्रेडिट कार्डाची रक्कम वापरून ती परत केलीच नव्हती. सगळा मिळून तीन-चार लाखांचा मामला होता. अमेरिकेत हजारो डॉलर्स कमावून  भारतात स्वतचा कारखाना काढू बघणारा हा माणूस तीन-चार लाखांची कर्जे बुडवतो यावर विश्वास बसणे कठीण होते.
ही कहाणी ऐकून माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. हा सगळा मामला ‘आयडेंटीटी थेफ्ट’चा असावा. कोणीतरी भामटयाने या माझ्या मित्राची कागदपत्रे वापरून परस्पर कर्जे काढून ती बुडवली होती. त्यामुळे बँकांनी माझ्या मित्राच्या क्रेडिट रिपोर्टवर ‘कर्जबुडवा’ असा शिक्का मारला होता. एकदा कर्जबुडवेपणाचा शिक्का बसला की कर्ज मिळणे अशक्य होऊन बसते हे आपण यापूर्वीच पाहिले  आहे.
ओळख चोरी अर्थात ‘आयडेंटीटी थेफ्ट’ हा एक फार गंभीर मामला आहे. एखाद्या व्यक्तीच्या नावाने कर्ज काढायचे व ते परतच करायचे नाही अशी सोपी कार्यपद्धती वापरून काही मंडळी बँकांना लुबाडतात. ज्या व्यक्तीच्या नावाने कर्ज काढले जाते त्या व्यक्तीला तर शेवटपर्यंत त्याचा पत्ताही लागत नाही. पण ज्यावेळी त्या व्यक्तीला स्वत: कर्जाची गरज असते तेव्हाच अशा धक्कादायक बाबी प्रकाशात येतात. त्यामुळे ओळख चोरी टाळणे हाच त्यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. त्यासाठी काय खबरदारी घ्यावी ते पाहू.
१) कागदपत्रे सुरक्षित ठेवा:
पॅन कार्ड, रेशन कार्ड, क्रेडिट कार्ड स्टेटमेंट्स, बँकांची स्टेटमेंट्स सांभाळून ठेवा. प्रत्येक इमारतीच्या पत्रपेटीत क्रेडिट कार्ड – बँकांची स्टेटमेंट्स अनेकदा पडून असतात. त्यांचा दुरूपयोग होणे शक्य आहे. स्वत:चे पॅन कार्ड किंवा इतर कागदपत्रे त्रयस्थ माणसाच्या हाती कधीही देऊ नये. उगाचच भारंभर छायाप्रती काढून ठेवू नये. त्या गहाळ होऊन चुकीच्या हातात जाऊ शकतात. एखादी छायाप्रत, एखादे जुने स्टेटमेंट फेकून द्यायचे असल्यास नीट फाडून फेकून द्या.

२) तपशिलांवर लक्ष द्या:
क्रेडिट कार्डाच्या स्टेटमेंटमधील तुमचे पत्ते-फोन नंबर अचानक बदलणे. ही आयडेंटिटी थेफ्टची एक महत्त्वाची पायरी असू शकते. काही वेळा बँकेने एखादा वेगळाच ’चार्ज’ तुम्हाला लावलेला असू शकतो. हा चार्ज तुम्ही न घेतलेल्या (पण दुसऱ्याने तुमच्या नावे घेतलेल्या) कर्जासंबंधी असू शकतो. अशा गोष्टींचा बँकेशी पाठपुरावा करा.
३) सहीबरोबर कारण लिहा :
 बऱ्याचदा फोन कनेक्शन, इंटरनेट कनेक्शन, गाडी खरेदी या व अशा अनेक कारणांसाठी आपण आपल्या वास्तव्याचा पुरावा, ओळख म्हणून पॅन कार्ड किंवा वाहन चालकाच्या परवान्याची छायाप्रत देतो. त्या प्रतीवर सही देखील करतो. सही करताना सहीच्या अगदी जवळ मोक्याच्या ठिकाणी ती छायाप्रत कोणत्या कारणासाठी दिली जाते आहे ते लिहावे. म्हणजे फोन कनेक्शनसाठी दिलेली छायाप्रत कर्ज काढण्यासाठी वापरली जाण्याची शक्यता कमी होते.
४) सगळेच सज्जन नसतात:
बऱ्याचदा ईमेलवर अनेक ऑफर्स येतात. अत्यल्प किंमतीत एखादी आकर्षक परदेशी ट्रीप किंवा अशीच काहीशी ऑफर देऊ करतात. याकरिता तुमची माहिती मागविली जाते. ती माहिती देताना दहादा विचार करा. स्वतच्या कागदपत्रांची स्कॅन केलेली कॉपी पाठवणे टाळा. काहीवेळा अशा ऑफर्स फोनवर दिल्या जातात व फोनवरील विक्री प्रतिनिधी तुमच्या विषयीची माहिती विचारतात.अशावेळी थोडी सावधगिरी बाळगावी. सगळेच चोर नसतात हे जरी खरे असले तरी सगळे सज्जनही नसतात हे लक्षात ठेवावे. फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर स्वतची खाजगी माहिती टाकू नये. त्याचा गरवापर सहज शक्य आहे.
५) सिबिल रिपोर्ट तपासा :
सिबील क्रेडिट रिपोर्ट वर्षांतून एकदातरी मागवावा. या रिपोर्टमध्येच काहीही अनपेक्षित घडामोडी दिसल्यास आयडेंटिटी थेफ्टची शक्यता विचारात घ्यावी. तुमच्या नावाने बँकांकडे कर्जाची मागणी तुमच्या नकळत केली गेली असेल तर सदर बँकेशी संपर्क साधा व त्यांना तसे कळवा. पोलिसांत तक्रारही नोंदवा.
खबरदारी आणि सावधगिरी हाच आयडेंटीटी थेफ्टपासून बचावाचा सर्वात प्रभावी उपाय आहे.    
(लेखक आर्थिक साक्षरतेसाठी कार्यरत ‘क्रेडिटविद्या डॉट कॉम’चे संस्थापक-संचालक आहेत)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Do you lost your identiry

ताज्या बातम्या