आशीष ठाकूर ashishthakur1966@gmail.com

निफ्टी जेव्हा १८,६०० च्या उच्चांकावर असताना बाजारात उत्साहाचे, जल्लोषाचे आणि भारावलेले असे वातावरण होते. या उच्चांकावरून अवघ्या सव्वीस सत्रांत बाजाराची रया घालवणारी अशी १,६०० अंशांची घसरण झाल्याने, तेजीनी भारावलेल्या वातावरणाचे रूपांतर ‘सुन्या सुन्या मैफिली’त झाले आहे. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव

सेन्सेक्स: ५७,१०७.१५

निफ्टी: १७,०२६.४५

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रमन यांचे एक सुंदर वाक्य आहे.. ‘जगात काहीही नवीन घडत नसते, फक्त आपल्याला इतिहास आणि संदर्भ माहिती नसल्यामुळे ती घटना आपल्याला नवीन घडल्यासारखी वाटते.’ हे वाक्यप्रमाण डोळ्यासमोर ठेवत, निफ्टी निर्देशांकाचे इतिहासातील तेजी-मंदीचे चक्र अभ्यासता येईल.

१ इतिहास आणि संदर्भ जोडता या स्तंभातील १८ ऑक्टोबरच्या ‘सूर तेच छेडिता’ या लेखातील वाक्य होते.. निफ्टीवर अधोरेखित केलेली १८,१०० ची पातळी केंद्रबिंदू मानत, त्यात मागील तेजीचा ५०० अंशांचा संदर्भ जोडता १८,६०० चा उच्चांक दृष्टिपथात येतो जो १९ ऑक्टोबरला १८,६०४ चा उच्चांक गाठत साध्य केला.

२ उच्चांकावरून घसरण किती? याचा आढावा २५ ऑक्टोबरच्या ‘गेली तेजी कुणीकडे?’ या लेखात घेतला. इतिहासात डोकावता तेजीच्या बाजारात किमान १,००० अंशांची घसरण होते, हे सूत्र पकडत १८,६०० च्या उच्चांकातून १,००० अंश वजा करता २९ ऑक्टोबरला निफ्टीने १७,६१३ अंशाचा नीचांक गाठला.

३ निफ्टी निर्देशांकानी १७,६१३ पातळीचा नीचांक नोंदवल्यावर त्यात सुधारणा किती? याचा आढावा १५ नोव्हेंबरच्या ‘वळणबिंदूवरील वाटचाल’ या लेखात संसदीय लोकशाहीतील बहुमताच्या गणिताचा आधार घेता १,००० अंशांचे अर्धे ५०० अंशांच्या सुधारणेचे संकेत हे निफ्टीच्या १७,६०० च्या पातळीवरून मिळत होते, घडलेही तसेच १७,६०० अधिक ५०० अंश १८,१०० अंशाची पातळी १५ नोव्हेंबरला निफ्टीने त्या दिवसाच्या १८,२१० अंशांच्या उच्चांकी पातळीला स्पर्श करत, निर्देशांक त्या दिवशी १८,१०९ पातळीवर स्थिरावला.

४ निफ्टीच्या १८,ू१० पातळीच्या उच्चांकावरून १,००० अंशांच्या घसरणीचे सूतोवाच २२ नोव्हेंबरच्या ‘घडलंय-बिघडलंय!’ या लेखात केले होते व अवघ्या चार दिवसांत सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी निफ्टी निर्देशांकांनी १७,२१६ ची पातळी मोडीत काढत निफ्टीने दिवसभरात १६,९८५ अंशांचा नीचांक नोंदवला.

अशा रीतीने तेजीचा १,००० अंशांचा व मंदीचा ५०० अंशांचा पूर्वइतिहास आणि संदर्भ ध्यानात घेऊ न सोप्या शालेय गणिताच्या आधारे, किचकट आकडेवारीच्या वाटेला न जाता वाचकांना समजेल व त्यात त्यांना सहभागी होऊन अर्थार्जन करता येईल या दृष्टीने सोप्या भाषेत तेजी-मंदीचे चक्र विकसित केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘दै. लोकसत्ता’च्या वाचकांना आधीच परिस्थितीचा अंदाज देऊ न त्यांची आर्थिक-मानसिक तयारी केल्याने निफ्टीवरील १,६०० अंशांच्या घसरणीच्या धक्क्यामुळे तेजीचे स्वप्न भंगल्याने इतरांच्या दृष्टीने ही ‘सुनी सुनी मैफल’ ठरली, तर आपल्या वाचकांसाठी हीच मैफल रंगतदार आणि उत्कंठावर्धक ठरली.

आता कळीचा प्रश्न निफ्टी निर्देशांकाची भविष्यकालीन वाटचाल..

येणाऱ्या दिवसांत निफ्टीमध्ये सुधारणा अपेक्षित आहे. निफ्टी सातत्याने १७,२०० पातळीवर टिकून राहिल्यास निफ्टीचे प्रथम वरचे लक्ष्य १७,३५० व त्यानंतर १७,५५० लक्ष्य दृष्टिपथात येईल.

गेल्या लेखापासून आपण निफ्टीवर तेजीवाल्यांचे प्राबल्य असेल की मंदीवाल्यांचे हे आपण जाणून घेत आहोत. आताच्या घडीला निफ्टी सातत्याने १७,५५० पातळीच्या वर पंधरा दिवस टिकणे नितांत गरजेचे आहे व या सुधारणेला आपण मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक असे म्हणू शकतो. शाश्वत तेजी ही आताच्या घडीला निफ्टीमध्ये १८,१०० पातळीच्या वरची असेल.

येणाऱ्या दिवसांतील मंदीच्या वातावरणातील अशक्त सुधारणेत निफ्टी सातत्याने १७,५५० पातळीवर अडखळत असेल व १७,२०० ची पातळी राखण्यास वारंवार अपयशी ठरत असल्यास, निफ्टी १६,५०० व मंदीच्या परिस्थितीत निफ्टी १६,००० ची पातळी गाठू शकेल.

निफ्टीमध्ये १८,६०० पातळीपासून जे मंदीचे आवर्तन सुरू झाले आहे, ते इथे संपून पुन्हा नितांत सुंदर अशा तेजीची सुरुवात होईल. त्या वेळी निफ्टीचे वरचे लक्ष्य २०,००० असेल.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.