रपेट बाजाराची : सुधीर जोशी

गेल्या सप्ताहाच्या पहिल्या तीन दिवसात विविध कारणांमुळे बाजारावर मंदीचे सावट होते. अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या बैठकीत काय निर्णय होतो या काळजीने अमेरिकेतील बाजार सावधतेने व्यवहार करीत होते. चीनच्या सरकारने चीनमधील ई-कॉमर्स व विशेषत: ‘ऑनलाईन’ शिक्षण देणाऱ्या मोठय़ा कंपन्यांवर आर्थिक निर्बंध आणायचे ठरविले. त्यामुळे आशियाई बाजारात विक्रीची लाट आली. गुरूवारच्या मासिक सौदापूर्तीच्या दिवशी पोलाद व अन्य धातू क्षेत्रातील कंपन्यांमधे मोठी तेजी आली. साप्ताहिक तुलनेत हिंडाल्को १३ टक्कय़ांनी तर चीनकडून पोलाद निर्यातीवर आणखी निर्बंध लादले जाण्याच्या शक्यतेने अन्य पोलाद कंपन्यांचे समभाग सहा ते १२ टक्कय़ांनी वधारले. बाजार किरकोळ घसरणीने बंद झाला असला तरी धातू क्षेत्राचा निर्देशांक ७.७८ टक्कय़ांनी वाढला.

पुढील महिन्यात पोलाद कंपन्या किंमती आणखी वाढविण्याची शक्यता आहे. टाटा स्टीलच्या समभागात गेल्या सात दिवसात १२ टक्कय़ांची वाढ झाली. युरोपियन बाजारात पोलादाची मागणी वाढली आहे तसेच भारतातही मागणी वाढण्यास सुरूवात झाली आहे. कंपनी पुढील सप्ताहात पहिल्या तिमाहीचे दमदार निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. यापूर्वी व्यक्त केलेल्या मताप्रमाणे कंपनीच्या समभागातील प्रत्येक घसरणीत खरेदीची संधी आहे.

इंडियामार्ट इंटरमेश ही ई-कॉमर्स क्षेत्रात कार्यरत असणारी भारतीय कंपनी आहे. गेली २५ वर्षे ही कंपनी आपल्या पोर्टलद्वारे लहान, मध्यम व मोठय़ा साधारणपणे दीड लाख व्यवसायिकांना एकत्र जोडून त्यांचे व्यवसाय वाढविण्यास मदत करीत आहेत. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात १९ टक्के वाढ झाली आहे. कंपनीने नवीन भांडवल उभारले असून आता पेमेंट गेटवे, बिलिंग व अकाउंटिंग अशा नवीन सुविधा देऊ करणार आहे. त्यासाठी या क्षेत्रातील काही लहान कंपन्यांचे अधिग्रहण करण्याची देखील शक्यता आहे. डिजिटल युगाच्या गरजेनुसार ई-कॉमर्स क्षेत्रातील वाढता व्यवसाय पाहता या कंपनीमधील गुंतवणूक सध्याच्या काळाला अनुरूप असेल.

लार्सन अ‍ॅंड टुब्रोच्या तिमाही नफ्यात चौपट वाढ झाली. अर्थात गेल्या वर्षांच्या या तिमाहीत देशभर टाळेबंदीचे कडक निर्बंध होते त्यामुळे ही तुलना समर्पक होत नाही. तरीही कंपनीच्या हातातील मागण्या व पायाभूत प्रकल्पांमधे येत्या काही महिन्यात होणाऱ्या वाढीमधे कंपनीला नवी कंत्राटे जास्त प्रमाणात मिळतील. बऱ्याच दलाली पेढय़ांनी कंपनीच्या समभागांचे नवीन उद्दिष्ट १,८०० रुपयांपर्यंत जाण्याचे अंदाजले आहे.

खासगी बँकिंग क्षेत्रातील अ‍ॅक्सिस, आयसीआयसीआय व कोटक महिंद्र या तीनही आघाडीच्या बँकांचे निकाल चांगले आहेत. नफ्यामधे गेल्या वर्षांच्या तुलनेत भरघोस वाढ झाली. टाळेबंदीमुळे किरकोळ व पगारदार मध्यम वर्गाकडील कर्जवसुलीत जरा घसरण झाली पण पुढच्या काळात त्यामधील कसर भरून निघेल. पोर्टफोलियोमधील बँकिंग क्षेत्राचा हिस्सा म्हणून या बँकांत गुंतवणूक असायला हवी.

आयसीआयसीआय लोम्बार्ड या खासगी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या कंपनीच्या तिमाही निकालात नफ्यामधे ६२ टक्कय़ांची मोठी घसरण झाली. करोनामुळे वाढलेल्या रुग्णालयीन उपचारांच्या दाव्यांचा हा परिणाम होता. पण त्याच कारणासाठी कंपनीच्या नवीन विमा पॉलिसी व हप्तय़ांमधे देखील वाढ झाली आहे. कंपनीने विम्याचे दरही वाढविले आहेत. नजीकच्या काही काळातील तोटय़ाकडे दुर्लक्ष करून दीर्घ मुदतीच्या लाभासाठी या कंपनीत टप्याटप्याने केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल.

मारुती सुझुकीला विविध प्रकारच्या खर्चातील वाढीला सामोरे जावे लागत आहे. या वर्षांतील नव्या विस्तार योजनांच्या खर्चाचा भारही कंपनीला सोसावा लागणार आहे. कंपनीने गेल्या वर्षांतील तुलनेत नफ्यात वाढ जाहीर केली असली तरी नफ्याची टक्केवारी घसरली आहे. कंपनीचा एसयूव्हीमधील वाटा घसरलेला आहे. येत्या सणासुदीच्या काळात विक्रीतच वाढ झाली तरी नफ्याचे प्रमाण कमी राहण्याचे संकेत आहेत. त्यामुळे कंपनीतील गुंतवणूक जरा सबुरीने करायला हवी.

गेल्या सप्ताहाप्रमाणे या सप्ताहातही बाजारात मोठे चढ-उतार संभवतात. स्टेट बँक, महिंद्र अँड महिंद्र, टायटन, टाटा कन्झ्युमर, सिप्ला, भारती एअरटेल या मोठय़ा कंपन्यांचे निकाल, रिझव्‍‌र्ह बँकेची द्वैमासिक आढावा बैठक, वाहन विक्री व जीसटी संकलनाचे आकडे अशा घटना बाजाराला दोलायमान ठेवतील.

sudhirjoshi23@gmail.com