When is Ashadi Ekadashi in 2025: हिंदू धर्मात प्रत्येक सणासह व्रत-वैकल्यांनाही पवित्र मानले जाते, ज्यामध्ये एकादशी, संकष्टी, प्रदोष, पौर्णिमा या मासिक व्रतांचा समावेश आहे. एकादशीचे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे. हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते. त्यापैकी एक कृष्ण पक्षामध्ये असते, तर दुसरी शुक्ल पक्षामध्ये असते. अशा प्रकारे वर्षामध्ये एकूण २४ एकादशी येतात. परंतु ,या २४ एकादशीतील एक एकादशी अत्यंत खास मानली जाते, ज्याची करोडो वारकरी दरवर्षी वाट पाहत असतात. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या आषाढी एकादशीला सर्वोत्तम मानले जाते. या एकादशीला ‘देवशयनी एकादशी’, असेदेखील म्हटले जाते. असं म्हणतात की, एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापापासून मुक्ती मिळते आणि त्यांना पुण्याची प्राप्ती होते.

आषाढी एकादशी २०२५ तिथी (Ashadi Ekadashi 2025 Tithi And Date)

आषाढ एकादशी दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते. हिंदू पंचांगानुसार, आषाढी एकादशीची तिथी ५ जुलै (शनिवार) रोजी संध्याकाळी ६ वाजून ५८ मिनिटांनी सुरू होणार असून, ६ जुलै (रविवार) रोजी रात्री ९ वाजून १४ मिनिटांपर्यंत असेल. उदय तिथीनुसार, आषाढी एकादशीचे व्रत ६ जुलै रोजी केले जाईल.

आषाढी एकादशी २०२५ शुभ मुहूर्त (Ashadi Ekadashi 2025 Shubh Muhurat)

ब्रह्म मुहूर्त – सकाळी ०४:०८ ते ०४:४९ पर्यंत
अभिजित मुहूर्त – दुपारी ११:५८ ते १२:५४ पर्यंत
विजय मुहूर्त – दुपारी ०२:४५ ते ०३:४० पर्यंत
गोधूलि मुहूर्त – संध्याकाळी ७:२१ ते ०७:४२ पर्यंत
अमृत काल – दुपारी १२:५१ ते ०२:३८ पर्यंत
त्रिपुष्कर योग – रात्री ०९:१४ ते १०:४२ पर्यंत
रवि योग – सकाळी ०५:५६ ते रात्री १०:४२ पर्यंत

आषाढी एकादशी व्रताचे पारण करण्याची वेळ

आषाढी एकादशीच्या व्रताचे पारण ७ जुलै (सोमवार) रोजी केले जाईल. पंचांगानुसार, सकाळी ०५:२९ ते सकाळी ०८:१६ ही वेळ व्रताचे पारण करण्यासाठी शुभ राहील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात? (Devshayani Ekadashi 2025)

या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते, असे म्हटले जाते. या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणण्याचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून, उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते म्हणजेच देवांची रात्र सुरू होते. म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी (देवांच्या निद्रेची) एकादशी, असे म्हणतात. या एकादशीपासून श्री विष्णू निद्रावस्थेत जातात, जे कार्तिक एकादशीला म्हणजेच देवउठनी एकादशीला जागे होतात, असे म्हटले जाते. श्री विष्णूंच्या निद्रावस्थेतील चार महिन्यांना चातुर्मास म्हटले जाते.

आषाढी एकादशी कशी साजरी कराल? (Ashadi Ekadashi 2025 Puja Vidhi)

  • एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे.
  • घरातील देवी-देवतांची पूजा करावी, तसेच भगवान विष्णूला पिवळी फुलं, चंदन, तुळस अर्पण करावी आणि धूप-दीप लावून आरती करावी.
  • पूजा पूर्ण झाल्यावर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा आणि श्री विष्णू सहस्रनामाचा जप करा आणि भगवान विष्णूला नैवेद्य अर्पण करा.
  • शेवटी श्री विष्णूची आरती करून, तुमच्या आणि कुटुंबाच्या कल्याणाची प्रार्थना करा.