Mahalaxmi Arrival Signs: प्रत्येक वर्षी कार्तिक अमावस्येला साजरी होणारी दिवाळी ही केवळ रोषणाईचा नव्हे तर शुभतेचा आणि समृद्धीचा सण मानला जातो. दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करून आपल्या भक्तांना आशीर्वाद देते, अशी श्रद्धा अनेक पिढ्यांपासून प्रचलित आहे. म्हणूनच लोक आधीपासून घराची स्वच्छता, सजावट आणि चौकटीवर दिवे लावून देवीचं स्वागत करण्याची तयारी करतात.
ज्योतिषशास्त्रात असा उल्लेख आहे की, महालक्ष्मीच्या आगमनापूर्वी काही शुभ संकेत दिसू शकतात. हे संकेत शुभत्व, आर्थिक प्रगती किंवा घरातील सकारात्मक उर्जेची चाहूल देणारे मानले जातात. चला जाणून घेऊया अशा ५ शक्यता कोणत्या असतात, ज्या लक्ष्मीच्या आगमनाचं सूचक मानल्या जातात?
माता लक्ष्मी घरी येताच दिसतात हे ५ शुभ संकेत!
१. घराभोवती दिसणारे “घुबड”
ज्योतिषशास्त्रात घुबडाला देवी लक्ष्मीचे वाहन मानलं जातं. असं मानतात की, दिवाळीच्या रात्री जर घराजवळ घुबड दिसले, तर ती एक शुभ ऊर्जा असते. अनेक परंपरांनुसार हा संकेत देवीच्या उपस्थितीची चाहूल देणारा असतो.
हा संकेत मिळाल्यावर लोक घरात सकारात्मकता आणि प्रकाश वाढवतात म्हणजेच देवीचं स्वागत.
२. अचानक धनवाढ किंवा खर्चात घट
अचानक आर्थिक लाभ होणे, थकबाकी मिटणे किंवा बँक खात्यात वाढ होणे या गोष्टींना ज्योतिषशास्त्रानुसार शुभ मानलं जातं. असं घडल्यास ते महालक्ष्मीच्या कृपादृष्टीचं सूचक असल्याचं सांगितलं जातं. अर्थात, हे संकेत केवळ शक्यता म्हणून मानले जातात, परंतु ज्योतिषीय दृष्टीनं हा काळ समृद्धीचा मानला जातो.
३. रोजगार किंवा व्यवसायात प्रगती
जर दीर्घकाळ ठप्प असलेला व्यवसाय अचानक सुरू होऊ लागला किंवा कामात अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं तर काही ज्योतिषांच्या मते, ते लक्ष्मीच्या आगमनाची सूचना असते. अशा काळात सकारात्मक विचार, कृतज्ञता आणि घरातील आनंद टिकवणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं.
४. घरातील तुळस, मनीप्लांट किंवा जेड प्लांटचा बहर
ज्योतिषशास्त्रानुसार, घरातील हिरवळ आणि झाडं ही समृद्धीची प्रतिकं असतात. जर तुमच्या घरातील तुळस, मनीप्लांट किंवा जेड प्लांट अचानक हिरवेगार, ताजे आणि वाढते वाटू लागले तर ही सकारात्मक ऊर्जेची उपस्थिती असल्याचं मानलं जातं. अशी ऊर्जा म्हणजेच घरात सुख, शांतता आणि शुभत्वाचा वास असणं.
५. घराभोवती गोड सुगंध किंवा शांत वातावरण
कधी कधी घराभोवती गोड सुगंध, थंडावा किंवा शांत वातावरण जाणवतं. ज्योतिषशास्त्रानुसार ही एक शुभ लहरींची उपस्थिती असू शकते. अशा वेळी दीप लावा, सकारात्मक विचार करा आणि घरातील वातावरण शांत ठेवा.
या सर्व गोष्टींना ज्योतिषीय शक्यता म्हणूनच पाहावं. पण, हे संकेत दिसल्यावर एक गोष्ट नक्की, घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचं वातावरण निर्माण होतं. दिवाळीचा काळ हा प्रकाश, शांती आणि श्रद्धेचा आहे. मग या सणात आपल्या घरातही प्रकाश, प्रेम आणि सकारात्मकतेचं आगमन होवो, हीच खरी ‘महालक्ष्मी’च्या आगमनाची खूण!
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)