Gudhi Padwa 2024 Date: वैदिक पंचांगानुसार यंदा ९ एप्रिलपासून चैत्र मासाचा प्रारंभ होत आहे. हिंदू नववर्ष म्हणजेच गुढी पाडवा व चैत्र नवरात्रीची तिथी एकाच दिवशी म्हणजेच ९ एप्रिलला जुळून आली आहे. यंदा हे दोन्ही सण अत्यंत शुभ योगांमध्ये साजरे होणार आहेत. या दिवशी अमृत सिद्धी व सर्वार्थ सिद्धी हे दोन योग असतील पण त्यापुढे सुद्धा रामनवमी पर्यंत तब्बल पाच वेळा रवी योग व तीन वेळा सर्वार्थ सिद्धी योग जुळून येणार आहे. चैत्र नवरात्रीच्या नऊही दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी यापैकी एक ना एक योग सक्रिय असल्याने या कालावधीत माता दुर्गेच्या भक्तांना वरदान लाभू शकते. नेमक्या कोणत्या दिवशी कोणता शुभ मुहूर्त आहे व त्याचा कोणत्या राशीवर शुभ प्रभाव होऊ शकतो हे जाणून घेऊया.

गुढीपाडव्याच्या नंतर चैत्र नवरात्रीत ‘हे’ योग असतील कायम

९ एप्रिलला म्हणजेच चैत्र शुक्ल प्रतिपदेला अमृत सिद्धी योग व रवी योग असणार आहे. यानंतर १० एप्रिलला सर्वार्थ सिद्धी योग असेल व मध्य रात्री पुन्हा रवी योग सुद्धा सुरु होईल. ११ एप्रिलला रवी योग कायम असेल. त्यानंतर पुन्हा १३ एप्रिलला रवी योग जुळून येईल. १५ एप्रिलला सर्वार्थ सिद्धी योग असेल व नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच १६ एप्रिलला रात्री उशिरा पुन्हा हा योग सक्रिय होईल. यावेळी रवी योग सुद्धा कायम असेल. यानुसार चैत्र नवरात्रीच्या कालावधीत तब्बल पाच वेळा रवी योगाचा दुर्मिळ संयोग जुळून येणार आहे.

चैत्र नवरात्रीच्या पंचमीला गुरु आदित्य योग, ‘या’ तीन राशींचा फायदा

चैत्र नवरात्रीची पंचमी म्हणजेच १३ एप्रिलला शनिवारी रात्री सूर्य मेष राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी अगोदरच गुरुदेव उपस्थित आहेत. सूर्य व गुरूच्या एकत्र येण्याने आदित्य गुरु योग निर्माण होणार आहे. यामुळे मेषसहित गुरुच्या स्वामित्वाची मीन रास व सूर्याच्या स्वामित्वाची सिंह रास लाभ प्राप्त करू शकते. सूर्याच्या तेजाने या तीन राशींच्या व्यक्तिमत्वाला वेगळीच झळाळी मिळू शकते. तर गुरुच्या आशीर्वादाने आपण आयुष्यात नेतृत्व करून, आपल्या ज्ञानाचा प्रसार करून आर्थिक पाठबळ मिळवू शकता.

हे ही वाचा<<होळीनंतर शनी महाराज नक्षत्र बदलणार, गुढीपाडव्याआधी मेष ते मीनपैकी कुणाला होईल धनलाभ? १२ राशींचे भविष्य पाहा

राम नवमी कधी असेल?

दरम्यान, चैत्र नवरात्रीच्या नवमीला प्रभू श्री रामजन्म साजरा केला जाणार आहे. रामनवमी यंदा १७ एप्रिल २०२४ ला असेल, दुपारी १२ वाजता देशभरात राम जन्मोत्सव धुमधडाक्यात साजरा होईल. यंदा अयोध्या नगरीत या निमित्ताने मोठा उत्साह पाहायला मिळेल.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व सामान्य ज्ञानावर आधारित आहे)