Isht devta: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ग्रह, नक्षत्र यांना अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा आणि नक्षत्रांचा मानवी जीवनावर खूप प्रभाव पडतो. व्यक्तीचा जेव्हा जन्म होतो, तेव्हा जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत प्रवेश करतो, त्यावरून व्यक्तीची जन्म राशी ठरते. यावरूनच व्यक्तीचे गुण, स्वभाव, आवड-निवड यांसारख्या बऱ्याच गोष्टींची माहिती मिळते. तसेच यामध्ये आपल्या राशीनुसार आपली इष्ट देवता कोण आहे हे देखील सांगितले जाते.

हिंदू धर्मामध्ये आपण आपल्या आवडीनुसार कोणत्याही देवाची पूजा-आराधना करू शकतो. पण, आपल्या इष्ट देवाची पूजा करणेदेखील आपल्यासाठी महत्वपूर्ण मानले जाते. कारण इष्ट देवतेचा संबंध आपले कर्म आणि जीवनाशी संबंधित असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, आपल्या इष्ट देवतेची पूजा-आराधना केल्याने आपल्यावर त्या देवतेची अखंड कृपा प्राप्त होते.

राशीनुसार जाणून घ्या तुमची इष्ट देवता

मेष आणि वृश्चिक

मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ असल्यामुळे या दोन्ही राशींची देवता एकच आहे. या राशींच्या व्यक्तींची इष्ट देवता श्री हनुमान आहेत तसेच श्रीराम देखील आहे. त्यामुळे या राशींच्या व्यक्तींनी यांची पूजा-आराधना करावी.

वृषभ आणि तूळ

वृषभ आणि तूळ या राशींचा स्वामी ग्रह शुक्र असल्यामुळे या राशींच्या व्यक्तींची इष्ट देवता देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गा आहे, यांनी नेहमी या देवतांची उपासना करावी.

मिथुन आणि कन्या

मिथुन आणि कन्या या राशींचा स्वामी ग्रह बुध आहे, त्यामुळे या राशींच्या व्यक्तींनी श्री गणेश आणि श्री विष्णूंची पूजा-आराधना करावी.

कर्क

कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे. त्यामुळे या व्यक्तींनी नेहमी महादेवाची आराधना करावी. या राशीच्या व्यक्तींवर महादेव सदैव प्रसन्न असतात.

सिंह

सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य असल्याने या राशीच्या व्यक्तींनी नेहमी श्री हनुमान आणि गायत्री देवीची पूजा-उपासना करावी, ज्यामुळे ते सदैव तुमच्या पाठीशी असतील.

हेही वाचा: आता पडणार पैशांचा पाऊस! ‘बुधादित्य राजयोगा’च्या प्रभावामुळे ‘या’ तीन राशींवर लक्ष्मीची अपार कृपा

धनू आणि मीन

धनू आणि मीन राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे. त्यामुळे या व्यक्तींनी श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची तसेच गुरुदत्तांची पूजा-आराधना करावी.

मकर आणि कुंभ

मकर आणि कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनि असल्याने या व्यक्तींनी नेहमी महादेव आणि श्री हनुमानांची पूजा करावी.

ज्योतिषशास्त्रानुसार, आपल्या इष्ट देवतेची पूजा केल्याने लवकर फलप्राप्ती होते. परंतु, इष्ट देवतेसोबतच तुम्ही तुमच्या आवडत्या देवाचीदेखील पूजा-आराधना करू शकता.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)