ज्योतिषतज्ज्ञ उदयराज साने

Planetary Positions Causing Rainfall : पाऊस काही थांबेना! हिवाळा आला तरीही ऑफिस, शाळा, कॉलेजमध्ये स्वेटरऐवजी छत्री घेऊन जाण्याचे दिवस आले आहेत. यंदाच्या पावसाने शेतकरी, कामगार, व्यापाऱ्यांचे प्रचंड हाल केले, असेही म्हणायला हरकत नाही. नेहमी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात माघारी निघणाऱ्या पावसाची नोव्हेंबर आला तरीही परतण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. तर हे नेमकं असं घडतंय तरी का? या बदलत्या हवामानाला नक्की दोष कोणाचा? याचबद्दल वर्षाची ग्रहस्थिती तपासून जाणून घेतलेले हे भविष्य.

२०२५ चा पाऊस हा ग्रहांच्या कैचीत सापडल्यामुळे भारतात प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो आहे आणि यापुढेसुद्धा डिसेंबर संपेपर्यंत तो अशाच पद्धतीने कमी-अधिक प्रमाणात पडण्याची शक्यता आहे. त्याच खरं कारण म्हणजे राहू. २०२५ च्या सुरवातीला राहू आणि शनी हे दोन्ही ग्रह कुंभ राशीत होते. तसेच नेपच्यून हा समुद्राचा कारक ग्रह मीन राशीत होता. त्यामुळे राहू आणि नेपच्यून यांच्या एकत्रित भ्रमणामुळे हा पाऊस मोठ्या प्रमाणात पडला. त्याचबरोबर या प्रचंड प्रमाणात पडणाऱ्या पावसाला आणखीन ग्रहांची स्थिती (Planetary positions)सुद्धा कारणीभूत ठरली. जानेवारी २०२५ नंतर शुक्र आणि बुध हे ग्रहसुद्धा अशाच पद्धतीने जल राशी मीनमध्ये वक्री झाले. त्यामुळे नेहमीप्रमाणे जल राशीतला बुध भारतासाठी तापदायक ठरला.

एकूणच शनी, नेपच्यून, राहू हे ग्रह मीन राशीत आले. जानेवारी, फेब्रुवारी व मार्चदरम्यान राहू हा मीन राशीत होता; जो पुढे जाऊन कुंभ राशीत आणि बुध हा जल राशी मीनमध्ये वक्री झाला. त्यानंतर ७ एप्रिलला तो मार्गी झाला आणि मंगळसुद्धा कर्क राशीत होता. त्यामुळे पहिल्यांदा अवकाळी पाऊस, मग सतत ठरावीक काळाने पडणारा नियमित पाऊस (Regular Rain) झाला. त्यानंतर घडलं असं की, मृग नक्षत्रापासून रीतसर पावसाला सुरुवात झाली; तो अजूनही सुरूच आहे. त्यानंतर शनी, नेपच्यून आणि बुध मीन राशीत आणि राहू कुंभ राशीत वक्री अवस्थेत राहिले; अशी ग्रहस्थिती दिसून आली.

बुध जुलैमध्येही मीन राशीतच होता. जुलैनंतर तो कर्क राशीत गेला आणि अशा पद्धतीनं हा पाऊस जुलैनंतरही अशाच पद्धतीने सर्वत्र दमदारपणे पडत राहिला. बुध पृथ्वी आणि वायू राशीत ऑगस्ट-सप्टेंबरच्या सुमारास आला. पण, पुन्हा जल राशी मीनमध्ये हा बुध ऑक्टोबरच्या सुमारास वक्री झाला आणि या बुधामुळे हा पाऊस अजूनही सुरूच आहे. याचदरम्यान दोन चक्रीवादळं आली आणि त्यामुळे हा पाऊस अजून लांबला. एकूणच २०२५ चे ग्रहमान बघता असं दिसून येते की, बुध, शनी, राहू सतत भारतासाठी नव्हे, तर जगासाठी कायमच तापदायक राहिल्यामुळे सर्वत्र पाऊस प्रचंड प्रमाणात पडत राहिला.

त्याला प्रतिरोध करण्यासाठी गुरूचं भ्रमण तर लाभलं; पण गुरूचं भ्रमण भरमसाट वेगानं होत असल्यामुळे या गतीचे कोणतेही शुभ परिणाम भारताला किंवा जगाला मिळू शकले नाहीत. म्हणून एकीकडे पावसाचा धुमाकूळ, दुसरीकडे तिसऱ्या महायुद्धाची टोकदार स्थिती या कैचीत सर्व जग अडकल्याचं अनुभवायला मिळालं. मात्र, नव्या वर्षात संपूर्ण हवामान बदललं असल्यामुळे वायू रास कुंभेतून बुध वक्री होत असल्यामुळे पाऊस वाहून जाईल. म्हणजेच पावसाचं प्रमाण मात्र कमी-अधिक प्रमाणात राहील.

मात्र. २०२५ च्या पावसानं होणारं नुकसान डिसेंबरच्या अखेरपर्यंत सुरूच राहील, असं ठामपणे वाटत आहे. याचं कारण संपूर्ण हवामान बदललं आहे आणि जसजसं हे हवामान येणाऱ्या प्रत्येक वर्षात बिघडत राहील त्याप्रमाणे हा पाऊस कमी-जास्त होत राहील. तसेच आरोग्याच्या दृष्टीनंही याची वाईट फळं संपूर्ण भारतास अनुभवायला मिळतील. एकंदर २०२५ हे पावसासाठी कायमच लक्षात राहणारं वर्ष ठरलं, असं आपल्याला संपूर्ण ग्रहस्थितीवरून आढळून आलेलं आहे.