Sharadiya Navratri 2025: यंदा २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. हिंदू धर्मात आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते. भारतात शारदीय नवरात्रीला महत्त्वाचे स्थान प्राप्त असून, संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात. पहिली नवरात्र चैत्र महिन्यात असते; तर दुसरी शारदीय नवरात्र आश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री या गुप्त स्वरूपात असतात. परंतु, चैत्र आणि अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.

यात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि नऊ दिवसांत देवीच्या विविध नऊ रूपांची पूजा-आराधना व सेवा केली जाते. नऊ दिवस उपवासही केला जातो. परंतु, यंदाची नवरात्री नऊ दिवसांची नसून, १० दिवसांची असून, अकराव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जाणार आहे.

यंदाची नवरात्र १० दिवसांची का?

२२ सप्टेंबर रोजी प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार असून, १ ऑक्टोबर रोजी महानवमी म्हणजे नवरात्रीचा शेवटचा दिवस असेल. तसेच २ ऑक्टोबर रोजी विजयादशमी (दसरा) साजरी केली जाईल. परंतु नवरात्रीच्या काळात तृतीया तिथी तब्बल दोन दिवस म्हणजेच (२४ व २५ सप्टेंबर रोजी असणार आहे.) त्यामुळे नवरात्री नऊऐवजी १० दिवसांची असेल. तसेच देवीच्या मूर्तीचे विसर्जन नेहमीप्रमाणे दशमी तिथी सुरू झाल्यावर म्हणजे २ ऑक्टोबर रोजी होईल.

शारदीय नवरात्र २०२५ घटस्थापना शुभ मुहूर्त

घटस्थापनेचा शुभ मुहूर्त २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजून ९ मिनिटांपासून ते सकाळी ८ वाजून ६ मिनिटांपर्यंत आहे. या वेळेत तुम्ही घटस्थापना करू शकता. तसेच अभिजात मुहूर्त सकाळी ११ वाजून ४९ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ३८ मिनिटांपर्यंत असेल.

शारदीय नवरात्री तिथी

  • २२ सप्टेंबर, सोमवार – प्रतिपदा तिथी
  • २३ सप्टेंबर, मंगळवार – द्वितीया तिथी
  • २४ सप्टेंबर, बुधवार – तृतीया तिथी
  • २५ सप्टेंबर, गुरुवार – तृतीया तिथी
  • २६ सप्टेंबर, शुक्रवार – चतुर्थी तिथी
  • २७ सप्टेंबर, शनिवार – पंचमी तिथी
  • २८ सप्टेंबर, रविवार – षष्ठी तिथी
  • २९ सप्टेंबर, सोमवार – सप्तमी तिथी
  • ३० सप्टेंबर, मंगळवार – अष्टमी तिथी
  • ०१ ऑक्टोबर, बुधवार – महा नवमी तिथी

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)