Shravan 2022: श्रावण महिना म्हणजे व्रत वैकल्यांचा महिना. अशावेळी सणाच्या निमित्ताने देवाला नैवद्य दाखवण्याची पद्धत आहेच. मुळात नैवैद्य म्हणजे काय तर.. देवाला “निवेदनीय” असे जे द्रव्य म्हणजे नैवेद्य. ईश्वराला अर्पण करता येण्यासारखी, त्याला देण्यासारखी खाद्य वस्तू, म्हणजे नैवेद्य. तंत्रसार या ग्रंथातील माहितीनुसार, नैवेद्य हा पाच प्रकारचा असू शकतो म्हणजेच त्यात निदान पाच प्रकारचे अन्न समाविष्ट असावे, असे अन्न जे गिळता येईल, चावता येईल, चाटून खाता येईल, चोखून खाता येईल व पिता येईल. अशा पाच पदार्थांचा नैवैद्य हा सर्वसमावेशक व पूर्णतः पोषक मानला जातो. आपणही नैवेद्याला पाच किंवा त्याहून अधिक प्रकार हौशीने बनवता असाल पण त्याची मांडणी सुद्धा योग्य करणे आवश्यक आहे.

या लेखात आपण नैवैद्याचं पान वाढायची योग्य पद्धत जाणून घेणार आहोत. तसेच हे पान देवासमोर कसे ठेवावे याचे नियमही आपण पाहणार आहोत.

ताटाच्या निमुळत्या बाजूला म्हणजेच टोकाला उजवीकडे पुरी, पुरणपोळी असे पदार्थ तर डावीकडे लिंबू, मीठ, लोणचे, चटणी असे तोंडीलावणीचे पदार्थ ठेवावेत. मध्यभागी डावीकडे गोडाचा पदार्थ म्हणजेच खीर, गुलाबजाम (जे काही बनवलेले असेल ते) ठेवावे. तर उजव्या बाजूस दोन प्रकारच्या भाज्या ठेवतात, यात एक रस्सा भाजी व एक सुकी भाजी समाविष्ट असते. तर पानाच्या पसरट बाजूस उजवीकडे वरण भात, मसालेभात, ठेवला जातो तर डावीकडे तळलेले पदार्थ म्हणजे पापड, कुर्डई ठेवली जाते.

अनेक कुटुंबांमध्ये प्रथा वेगवेगळी असू शकते मात्र यात एक महत्त्वाचे शास्त्र म्हणजे जे पदार्थ अधिक प्रमाणात खायचे आहेत ते उजव्या बाजूस ठेवावे जेणेकरून सहज खाता येईल आणि जे तोंडलावणीचे पदार्थ आहेत ते डावीकडे ठेवावेत ज्यामुळे ते अधून मधून खाल्ले जातील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नैवेद्य दाखवताना पाळायचे नियम

  • नैवेद्य दाखवताना देवापुढे चौकोन करून त्यात पुन्हा X असे चिन्ह काढावे
  • यावर नैवेद्याचे ताट/ पान, भांडे, पात्र ठेऊन मग नैवेद्य दाखवावा.
  • या पात्रावर तुळशीचं पान ठेवावे.
  • नैवेद्य देवाच्या उजव्या हाताला ठेवावा.
  • नैवेद्याच्या पानाभोवती डावीकडून उजवी कडे असे आपल्या उजव्या हाताने पाणी सोडावे.
  • देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर आपण तो लगेच स्वत:ही खाऊ नये आणि इतरांना लगेच वाटू सुद्धा नये, निदान काही वेळ नैवैद्य देवासमोर राहू द्यावा

(टीप- वरील लेख हा सामान्य माहिती व गृहीतके यांच्यावर आधारित आहे)