जागतिकीकरणाची आजची अर्थव्यवस्था ही बऱ्याच अंशी बौद्धिक संपदा हक्कांच्या पायावर उभी आहे. अमेरिका आणि चीनच्या स्पर्धेत टिकून जागतिक बाजारपेठेत पाय रोवणे भारतासाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी या जागतिकीकरणाच्या आणि ज्ञानाधारित व्यवसायांच्या युगात एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे आपल्या बौद्धिक संपदेचे जतन, संवर्धन आणि संरक्षण. भारतात अनेक उद्योगसंस्था आपापली नावीन्यपूर्ण उत्पादने, सेवा, प्रक्रिया विकसित करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. परंतु या बौद्धिक संपदेची नोंदणी व वापर यांविषयी अनास्था दिसून येते. यामागे अनेक कारणे आहेत. बौद्धिक संपदेविषयी धूसर कल्पना, नोंदणी प्रक्रिया पार पाडण्याबद्दल अनुत्साह आणि नोंदणीसाठी लागणारा वेळ – खर्च यांविषयीचे अज्ञान, संथ नोंदणी प्रक्रिया आणि सल्लागारांची वानवा इत्यादी कारणे चटकन सांगता येतात. अशा परिस्थितीत डॉ. भारती डोळे आणि डॉ. दिलीप सरवटे यांनी लिहिलेले ‘मॅनेजमेंट परस्पेक्टिव्ह ऑन इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स’ हे पुस्तक उद्योगसंस्थांसाठी वाट दाखवणारे ठरेल.

बौद्धिक संपदेचा योग्य वापर करून व्यूहरचनात्मक व्यवस्थापन (स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट) अधिक सक्षम व स्पर्धात्मक कसे करता येईल, याचे मार्गदर्शन हे पुस्तक करते. बौद्धिक संपदा हक्क व त्यासारख्या अन्य हक्कांकडे पाहण्याचे अर्थशास्त्रीय आणि व्यवस्थापकीय असे दोन दृष्टिकोन मानले जातात, त्यापैकी ‘व्यवस्थापकीय दृष्टिकोना’वर भर देणारे हे पुस्तक आहे. त्याचा परीघ व्यवस्थापनापुरता मर्यादित नसून व्यवस्थापकांबरोबरच उद्योजक, संशोधक, वकील, शास्त्रज्ञ, या साऱ्यांच्या गरजा डोळय़ापुढे ठेवूनच ते लिहिले गेले आहे.

ढोबळ संकल्पनांपासून सूक्ष्माकडे- म्हणजे तरतुदी व कायदे यांच्याविषयीच्या उदाहरणांपर्यंत सुसंगतपणे या पुस्तकातील प्रकरणांची मांडणी झाली आहे. सुरुवातीला बौद्धिक संपदेची संकल्पना आणि व्याप्ती यांविषयी माहिती आहे, तर पुढे पेटंट डिझाइन, ट्रेड मार्क, कॉपी राइट, ट्रेड सीक्रेट, जीआय (जिओग्राफिकल इंडिकेशन्स) या विविध प्रकारच्या बाबींसंबंधीच्या व्यवस्थापकीय व्यूहरचनेबद्दल सविस्तर चर्चा केली आहे. या सर्व विषयांच्या मूळ संकल्पना, महत्त्व, ऐतिहासिक पाश्र्वभूमी, कायदेशीर व व्यवस्थापकीय दृष्टिकोन तपशीलवार मांडले आहेत.

विषय तांत्रिक व कायद्याशी संबंधित असूनही सोप्या व रंजक भाषेत गाभा वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम दोन्ही लेखकांनी केले आहे. त्यासाठी लेखकांनी जगभरातील अनेक उदाहरणे प्रत्येक प्रकरणात मांडली आहेत. अ‍ॅपलच्या डिझाइन स्ट्रॅटेजीचे (अभिकल्प-व्यूहाचे) वेगळेपण सांगताना अनेक दाखले दिले आहेत. आधी सॉफ्टवेअर नंतर उत्पादन विकसित करणे, लहान लहान पथके करून त्यांतील सभासद न बदलता पूर्णतेपर्यंत काम करणे, ‘साधेपणातच उपयुक्तता व सौंदर्य दडले आहे’ हे अ‍ॅपलचे तत्त्वज्ञान, हे रंजकपणे सांगतानाच पेटंट डिझाइनची माहिती येते.  ‘जिओग्राफिकल इंडिकेशन्सचा (जीआय) भारताला फायदा’ या विषयाबद्दल लिहिताना, कोल्हापुरी चप्पल हे उदाहरण घेऊन आर्थिक फायद्याबरोबरच सामाजिक बदल आणि व्यापक लाभ यांवरही प्रकाश टाकला आहे. हळदीच्या पेटंटची चर्चा करताना डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे विचार उद्धृत केले आहेत.

मराठीत हा विषय सोपा करून  सांगणारे सदर ‘लोकसत्ता’त २०१५ मध्ये होते, परंतु इंग्रजीत अशा विषयावरले सुलभ ज्ञान देणारे पुस्तक भारतीय संदर्भात हवेच होते, ती कमतरता या पुस्तकाने दूर केली आहे.

– संजीवनी राहणे