News Flash

 महासत्तेचे गलिच्छ अर्थप्रदूषण

कितीही आडपडदा करा अन् मुखवटे चढवा. एक गोष्ट स्वच्छच आहे की अमेरिका एका संकटाच्या उंबरठय़ावर उभी आहे.

जागतिकीकरण आणि अमेरिकी नेतृत्वाच्या नादानपणाचे वाभाडे काढणारे स्टिग्लिट्झ यांचे वर्तमानपत्रीय स्तंभलेखन तर खास लोकप्रिय आहे. डझनभर पुस्तकेही आली आहेत. त्याच मालिकेतील  ‘द ग्रेट डिव्हाइड’ हे त्यांचे ताजे पुस्तक होय..

कितीही आडपडदा करा अन् मुखवटे चढवा. एक गोष्ट स्वच्छच आहे की अमेरिका एका संकटाच्या उंबरठय़ावर उभी आहे. धोरणकत्रे, बाजार नियंत्रक, व्यवस्थेचे ‘विश्वास’राव काहीही म्हणोत एकंदर लोकभावना प्रचंड नकारार्थी बनल्या आहेत. गंमत म्हणजे भारतासह जगभरातील अनेक उभरत्या राष्ट्रांची जनता, सामान्य गुंतवणूकदार कावराबावरा होत हे आघात फारसा संबंध नसतानाही सोसत आहे.

नेमेचि फुगणारे- फुटणारे बुडबुडे व त्यानंतर सुरू राहिलेली वित्तीय संकटांची मालिका आणि अमेरिका यांचा गेले दशक-दीड दशकापासून अन्योन्यसंबंध राहिला आहे. प्रत्यक्षात हे वेगळे काही तरी दीर्घकालीन स्वरूपाचे महाअरिष्टच असल्याची मांडणी करणारा जोरकस सूर खुद्द अमेरिकेतून उमटत आहे. काहीसा एकाकी परंतु भारदस्त असलेल्या या आवाजात नोबेल पारितोषिक विजेते, दिग्गज अर्थतज्ज्ञ जोसेफ स्टिग्लिट्झ यांचा प्रामुख्याने समावेश होतो. जागतिक बँकेचे माजी मुख्य अर्थतज्ज्ञ, िक्लटन प्रशासनात अर्थ-सल्लागार समितीचे एकेकाळी अध्यक्षपद भूषविणारे स्टिग्लिट्झ यांचा अमेरिकेतील असमान विकास व त्यातून निर्माण झालेली प्रचंड आíथक विषमता, हलाखी, बेरोजगारीवर कायम टीकात्मक रोख राहिला आहे. जागतिकीकरण आणि अमेरिकी नेतृत्वाच्या नादानपणाचे वाभाडे काढणारे त्यांचे वर्तमानपत्रीय स्तंभलेखन तर खास लोकप्रिय आहे. डझनभर पुस्तकेही आली आहेत. त्याच मालिकेतील हे ‘द ग्रेट डिव्हाइड’ हे त्यांचे ताजे पुस्तक होय.

आशावादी राहण्याचा निकराचा प्रयत्न आहे, पण सद्यकाळात ते खूपच अवघड बनले आहे. लोकांचा राजकीय व आíथक व्यवस्थेवरचा विश्वास झपाटय़ाने ढळत चालला आहे. अशा स्थितीत सुदृढ, खुशाल समाज तग धरून राहणे अशक्यच. अमेरिकेतील अलीकडच्या सार्वत्रिक निवडणुकांतील मतदानाचे प्रमाण हे दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच इतके खाली आले आहे. तरुणांमध्ये तर मतदानाने २० टक्क्यांचाही टप्पा गाठलेला नाही. सबंध जगभरात लोकशाहीचे प्रणेते, रक्षणकत्रे म्हणून धोशा करीत सुटलेल्या अमेरिकेतच लोकशाही कूचकामी ठरत असल्याची भावना जोर पकडत आहे. या स्थितीत आनंदाचे गाणे सुचू शकेल काय, असा स्टिग्लिट्झ यांचा सवाल आहे.

स्टिग्लिट्झ कोणी डावे अर्थतज्ज्ञ नाहीत. तर उलट ते महामंदीच्या आघातातून भांडवलशाही व्यवस्थेला वाचविणाऱ्या केनेशियन सिद्धांताचे सांप्रत काळातील प्रणेते आहेत. तरीही ते लेसे फेअर अर्थात निरंकुश अर्थदृष्टिकोनाचा ध्यास धरून बसलेल्या अर्थ-सनातन्यांचे कडवे टीकाकार आहेत. तीन महिन्यांपूर्वी ग्रीसमध्ये सार्वमत घेतले जाण्याआधीच ‘नाही’च्या बाजूने कौलाचा पुरस्कार करणाऱ्या पॉल क्रुगमन, थॉमस पिकेटी, नॉरियाल रुबिनी आदी समकालीन अर्थचिकित्सक प्रभावळीचे स्टिग्लिट्झ म्होरके आहेत. त्यांचे लिखाण अमेरिकेतील ‘नाही रे’ वर्गाच्या व्यथा-वेदनांचे गोंदण बनणे म्हणूनच नवलाचे नाही. किंबहुना ऑक्युपाय वॉलस्ट्रीट चळवळीची ‘वुई आर नाइंटीनाइन परसेन्ट’ (आम्ही सारे ९९ टक्के) ही ठळक घोषणा ही स्टिग्लिट्झ यांच्या ‘ऑफ द वन परसेन्ट, बाय द वन परसेन्ट, फॉर द वन परसेन्ट’ या शीर्षकाखाली त्या वेळी प्रसिद्ध झालेल्या लेखाचीच देणगी आहे. ऑक्युपाय वॉलस्ट्रीटसारख्या जगभरात लक्ष वेधून घेणाऱ्या उत्स्फूर्त आíथक चळवळींसाठी वैचारिक खाद्य म्हणून त्यांच्या लिखाणाची लोकप्रिय स्वीकारार्हता व मौलिकता निश्चितच आहे. प्रतिष्ठितांच्या माजघरातील पुस्तक सज्जाचे दागिना बनतील अशा पोथ्या रचण्यापेक्षा, स्टिग्लिट्झ यांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वर्तमानपत्रात स्तंभलेखन हे महत्त्वाचे माध्यम मानले. प्रस्तुत पुस्तकही त्यांच्या अन्य काही पुस्तकांसारखेच नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांचे सहीसही व शब्दाचाही बदल न करता संकलन आहे.

गेल्या काही वर्षांत विशेषत: दुसरे बुश यांच्या प्रशासनाने अमेरिकेला एका भयाण अरिष्टाच्या खाईत लोटले, अशी स्टिग्लिट्झ यांची ठाम धारणा आहे. अमेरिकेचा सुवर्णकाळ म्हणून जो गौरवला जातो त्या रिगन राजवटीतच दुर्दशेची बीजे दडली आहेत. आíथक सुबत्तेचे सर्वश्रुत परिणाम म्हणजे जीडीपीमध्ये या काळात भले उतार दिसला नसेल, पण व्यवस्थेचा मूलाधार निश्चितच ठिसूळ बनत चालला होता. अर्थव्यवस्थेला हानी पोहोचविणाऱ्या या घटनांनी नेहमीच दैनिकांच्या पहिल्या पानाचे ठळक मथळे मिळविले नसतील, पण त्यांनी केलेले घाव आयुष्यभरासाठी व्रण बनून टिकतील इतके तीव्र होते. बुश यांच्या काळातील दोन युद्धे क्रेडिट कार्डावरील महागडय़ा उधारीवर लढली गेली, असे ते उपहासाने सांगतात. बुश यांच्या नादान हट्टाखातर इराक-अफगाणिस्तानातील युद्धखोरीने अर्थव्यवस्थेवर असह्य़ भार लादला.

गुन्हा तर घडलाच पण त्याचा निवाडा उलट अपराध्याला बक्षिसी देणारा झाला. डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केलेल्या उपाययोजनातून श्रीमंतांना वारेमाप करसवलती मिळाल्या. वॉलस्ट्रीटचे प्रस्थ वाढेल अशा नव्या बाजाररचनांना जन्म दिला गेला. बँकिंग व्यवस्थेचा समाजासाठी उपयोग झाला नाही तरी निदान अपाय तरी होऊ नये इतकाही नियमन धरबंद नव्हता. परिणामी गरीब-श्रीमंत दरी प्रचंड वाढत गेली. सबंध संपत्ती-संसाधनावर वरच्या एक टक्का धनाढय़ांची मालकी असे विषमतेने भयाण टोक गाठले.

अमेरिकी पतव्यवस्थेची नियंता- फेडरल रिझव्‍‌र्हचे तत्कालीन अध्यक्ष अ‍ॅलन ग्रीनस्पॅन यांच्या तथाकथित उपायांनीही अर्थव्यवस्थेतील अनागोंदीवर आणि एन्रॉन, वर्ल्डकॉम व तत्सम कॉर्पोरेट घोटाळ्यांत मश्गूल राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचारावर मुखवटा चढवण्याचेच काम केले. मंदीतून, विशेषत: राजकीय पेचातून बाहेर पडण्याचा तोडगा म्हणून युद्धे जरूर मदत करतात. पण त्यातून भांडवल निर्माणाच्या स्थिर प्रक्रियेचा विध्वंस होतो. अमेरिकेत त्या वेळी कौटुंबिक बचतीचा दर जवळपास शून्यावर आला. अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला युद्धामुळे अडथळे आले. बुश यांच्या युद्धखोरीचा असा नकारात्मक ताळेबंद स्टिग्लिट्झ मांडतात. आधीच मोठा कर्जभार, त्यात जगात सर्वाधिक इंधन जाळणाऱ्या अमेरिकेची युद्धापायी प्रति िपप २० डॉलरवरून १४० डॉलपर्यंत भडकलेल्या तेलासाठी आणखी कर्जउचल सुरू होती. फेडने व्याजाचे दर अल्पतम ठेवून या कर्ज भुकेला जाळ मिळवून दिलाच, सट्टेबाजीलाही भांडवल पुरविले. महत्त्वाच्या पायाभूत सोयीसुविधांत गुंतवणुकीसाठी सरकारकडे पसा नव्हता. शिक्षण संस्था-संशोधन संस्थांची आबाळ सुरू होती. तर मोकाट राहिलेले खासगी भांडवलही उत्पादक कामाऐवजी वित्तीय बाजारातील सट्टेबाज गुंतवणुकीला प्राधान्य देत होते. यातून कमावल्या जाणाऱ्या भांडवली लाभावर कर बसण्याचेही दडपण नव्हते. परिणामी स्थावर मालमत्तेचा बुडबुडा (हाऊसिंग बबल) फुगला. किमती अवाच्या सवा ताणल्या गेल्या. या किमती आणखी भडकतील या मोहाने सामान्य अमेरिकनांनी ऐपतीपलीकडे जाऊन, बँकांकडून सहज उपलब्ध तारण कर्जे घेतली. एक ना अनेक नावीन्यपूर्ण, झटपट विना-दस्त (लायर लोन्स), शून्य डाऊन पेमेन्ट (सबप्राइम) कर्जाच्या प्रकारांमध्ये लोकांना बँका फासत गेल्या. त्यातून त्यांनी प्रचंड नफा कमावला. पतनिर्धारण कंपन्या, लेखापाल, बाजार विश्लेषक सारेच या लबाडीत सामील होते. वॉलस्ट्रीटच्या कृपेने ही तारणी कर्जे सट्टेबाजांकडून साऱ्या जगभरात धडाक्यात विकणे सुरू होते. तारण कर्ज प्रकाराच्या सुरू असलेल्या या यथेच्छ थट्टेकडे एकीकडे फेडचे दुर्लक्ष तर दुसरीकडे व्यवस्थेचे विश्वासरावांच्या ‘बाजार सारे काही ताळ्यावर आणेल’ या भ्रमावर विसंबून सरकारचा कानाडोळा सुरू होता.

अखेर २००८ सालात वारेमाप खुळखुळत असलेला पसा आणि सल-सरभर नियमन या विखारी संमिश्रणाने घातलेला धुडगूस पुढे आला. अमेरिकेलाच नव्हे तर अध्र्या जगाला कवेत घेणाऱ्या कर्ज महाअरिष्टात त्याचे रूपांतर दिसून आले.

अर्थव्यवस्थेला नियम-कानूंचे वेसण व त्यावर देखरेख ठेवणारा पंच लागतो. अमेरिकेत मात्र या नियमन व पंच व्यवस्थेला हितसंबंधांची वाळवी लागली होती. नियम एकच आपले राजकीय व आíथक वजन वापरून, अशी यंत्रणा निर्माण करायची, जेणेकरून आपले लागेबांधे असलेल्या कंपन्यांना मोठा लाभ होईल. यातून खरेच कुणाचे इप्सित सफल झाले असेल याची कल्पना नाही, पण राष्ट्रीय हिताला तिलांजली मात्र दिली गेली. स्टिग्लिट्झ या व्यवस्थेचे पालकत्व स्वीकारलेल्या बदचलनी व बथ्थडांचा उल्लेख ‘कॅपिटलिस्ट फुल्स’ असा करतात. भांडवलशाही व्यवस्थेला मोकाट-बाजाराभिमुख ठेवून तिला संकटांचे घर बनवून बदनाम करणारी हीच मंडळी आहेत. गत ३० वर्षांत अशाच बाजाराभिमुख अर्थव्यवस्थांवर तब्बल १०० अरिष्टे त्यापायी ओढवली असल्याचे ते सांगतात.

घरांच्या किमती घटत गेल्या आणि उचललेल्या कर्जाच्या तुलनेत तारण संपत्तीचे मूल्य कवडीमोल बनले. अर्थात एकाच तारणावर अनेक पदरी कर्ज उचल झाली होती. पुढे ओबामा प्रशासनाने नियमनांत सुधारणांचा बागुलबुवा निर्माण केला. प्रत्यक्षात ती मलमपट्टीच होती. बुडबुडा फुटला, काही बँका बुडाल्या. काहींना तगवण्यासाठी सरकारने त्यांच्या घशात अब्जावधी डॉलर ओतले. पण घरांमध्ये पसा गुंतविणाऱ्या गरिबांच्या आयुष्यभराच्या पुंजीवर पाणी फेरले गेले व लक्षावधींच्या डोक्यावरचे छप्पर गेले. या लबाडीचे सूत्रधार मात्र सहीसलामत सुटले.

अमेरिकेची पत घसरली, डॉलरचे मूल्य उतरले. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे ते मुख्य चलन असल्याने, युरोपीय राष्ट्रांच्या निर्यात आमदनीला त्याने कात्री लावली. अमेरिकेने आपला व्यभिचारी विकार, गलिच्छ अर्थप्रदूषण जगभरातील आश्रित राष्ट्रांना निर्यात केला. स्टिग्लिट्झ सांगतात, अमेरिकेला जडलेली ही व्याधी एंडेमिक म्हणजे स्थान-मर्यादित नाहीच. अंधानुकरण करणाऱ्या उभरत्या अर्थव्यवस्थांमध्ये तिचा लागलीच संसर्ग होऊन साथीच्या रोगासारखी ती पसरते.

आíथक विषमता हा आंतरराष्ट्रीय, वैश्विक मुद्दा आहे आणि त्यावर राजकीय सत्ता हाच उपाय असल्याचे स्टिग्लिट्झ सांगतात. अर्थात अराजकाचा वाढता धोकाही खुणावत असल्याचे ते सांगतात. नेमका राजकीय पर्याय कोणता पुढे येईल हा सध्या कळीचा प्रश्न आहे. काळच त्याचे उत्तर देईल. सध्या अमेरिकेत डेमोक्रॅट्सच्या हिलरी िक्लटनसमोर डेमोक्रॅट्सकडून बर्नी सँडर्स हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. हे सँडर्स स्वत:चा उल्लेख डेमॉक्रॅट सोशालिस्ट असा आवर्जून करतात. अध्यक्षपदाच्या उमेदवाराने उघडपणे समाजवादाचा पुरस्कार करावा आणि तरी त्यांना वाढती लोकप्रियता मिळावी हे महासत्तेसाठी अभूतपूर्वच!

* ‘द ग्रेट डिव्हाइड’, ले. जोसेफ स्टिग्लिट्झ, पेंग्विन बुक्स, पृ. ४२८, किंमत ९९९ रु.

सचिन रोहेकर-   sachinrohekar@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 12:20 am

Web Title: the great divide by joseph e stiglitz book review
Next Stories
1 ऐका कोळियाचे शोकगीत!
2 ‘अभिजात’ अगाथा..
3 सागरी साहसाची साद्यंत कथा..
Just Now!
X