अनेक राज्यांतून परवानगी नसल्याने मजूर अडकले

औरंगाबाद : पहिल्या टाळेबंदीनंतर चालत प्रवास करणाऱ्या १४ हजार ५२३ मजुरांना  शिबिरांमध्ये सांभाळले जात असले तरी अनेक मजूर ना शिबिरामध्ये आहेत ना त्याची नावे नोंदलेली आहेत. काही जण तर आजही रस्त्यावर असल्याचे दिसून आले आहे. शहरातील अयोध्यानगर भागातील मोकळया मैदानात त्यांचा मुक्काम असून त्यांचे हाल होत असल्याचेही दिसून येत होते. पहिल्या काही दिवसानंतर सामाजिक भावनेतून अन्नधान्य पुरविणारेही आता फारसे पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. शिबिरांमधील मजुरांची योग्य काळजी घेतली जात असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. औरंगाबादमधून विविध राज्यात जाण्यास तयार असणाऱ्या मजुरांची संख्या दोन हजार चारशे असल्याचे सांगण्यात येत आहे.

मध्यप्रदेश सरकारकडून मजूर नेण्याची तयारी दर्शविल्यानंतर शुक्रवारी रात्री एक रेल्वे भोपाळपर्यंत पाठविण्यात आली. डब्यामध्ये गर्दी असू नये म्हणून ५४ जणच एका डब्यात असतील अशी व्यवस्था करण्यात आली होती. मधल्या व्यक्तीला झोपण्यासाठीचा बर्थ काढून टाकण्यात आला होता. पिण्याच्या पाण्याची बाटली, जेवणाचे पाकीट त्यांच्यासमवेत देण्यात आले होते. जालना येथील मध्यप्रदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांची नावे मात्र यामध्ये नव्हती. ज्यांना परराज्यात जायचे अशांची करोना चाचणी करुन घ्यावी आणि पाठवावे, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान शिबिरांमधील या मजुरांचा १४ दिवसाचा विलगीकरणाचा कालावधी संपला आहे. त्यातील अनेकांना कोणतीही लक्षणे नाहीत. जालना येथील अपघातामुळे स्थलांतरितांचा प्रश्न किती गंभीर आहे, हे पुन्हा एकदा पुढे आले आहे. सायकलवरून, चालत जाणारे जथ्थेच्या जथ्थे दिसत असतानाही शासनाने धोरण ठरविताना टाकलेल्या अटींमुळे सारे घडत असल्याचा आरोप औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

औरंगाबादमधून सर्वाधिक मजूर झारखंड येथे जाण्यास इच्छूक असून त्यांची संख्या ६३८ एवढी असून मध्यप्रदेशातील ५६५ जणांची नोंद होती. त्यामुळे नांदेड,परभणी, जालना व औरंगाबाद येथील मजुरांना घेऊ न एक गाडी भोपाळकडे शुक्रवारी रवाना झाली. मात्र, हे मजूर पोचण्यापूर्वीच मध्यप्रदेशात जाण्यास इच्छूक १६ जणांचा अपघातात मृत्यू झाला.