गंभीर त्वचाविकार, गॅस्ट्रो, जंतामुळे मोकाट कुत्री त्रस्त

औरंगाबाद : पशुचिकित्सकांच्या मते भटक्या कुत्र्यांना त्या-त्या शहरांचे सुरक्षासोबती मानले जाते. मात्र, औरंगाबादेतील ५० ते ५५ हजार मोकाट कुत्र्यांपैकी पाच हजारांपेक्षा अधिक कुत्रे हे पोटातील जंत, गंभीर प्रकारचा त्वचाविकार, गॅस्ट्रोसारख्या आजारांनी मृत्युपंथावर जात असल्याचे चित्र आहे.

संसर्गाने एकापासून दुसऱ्या कुत्र्याला होणाऱ्या या आजारांचा माणसांवरही परिणाम होण्याची शक्यता पशुचिकित्सकांकडून वर्तवण्यात येत आहे. या गंभीर विषयाकडे मात्र औरंगाबाद महानगरपालिका काणाडोळा करताना दिसत आहे.

औरंगाबाद शहरात किती मोकाट कुत्रे आहेत, असा प्रश्न मध्यंतरी महापौर नंदकुमार घोडेले यांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी उत्तर दिले होते ५० ते ५५ हजार, अर्थात हे उत्तर महापौरांनी कुत्र्यांची नसबंदी करणाऱ्या एका खासगी एजन्सीच्या व्यवस्थापकाकडील माहितीच्या आधारे दिले होते. यातील पाच हजारांपेक्षा अधिक कुत्र्यांना सध्या त्वचाविकारासह इतरही आजारांनी ग्रासलेले आहे. सिडकोतील जकातनाका स्मशानभूमी परिसरासह इतर भागातील रस्त्याच्या कडेला पडलेल्या कचऱ्याच्या ढिगांवर कुत्र्यांच्या झुंडी दिवसभर चरताना दिसणे हे दररोजचे चित्र असून अति खाणे होत असल्यामुळे त्यांच्या पोटात जंताचे प्रमाण वाढलेले आहे. या जंताळलेल्या कुत्र्यांमुळे माणसांनाही काही प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो, असे पशुचिकित्सक सांगतात.

औरंगाबादमधील अनेक कुत्रे अंगावरील केस झडलेल्या अवस्थेतील असून कायम अंग खाजवून त्यांना खाज-खरुजाचा आजार जडल्याचे दिसत आहे. कुत्र्यांना जंताचे औषधे, लस देण्याचे काम महापालिकेकडून सुरू करणे अपेक्षित असले तरी ते होताना फारसे दिसत नाही. कुत्र्यांना शरीरासाठी आवश्यक कॅल्शिअम मिळाले नाही तर ते माती खातात. बाहेरची घाण, कीडा, मुंगी, चप्पल खातात. इतर श्वानांपासून होणारा सांसर्गिक विषाणूजन्य गॅस्ट्रो होऊ शकतो. आजारापासून त्यास रक्ताची उलटी व शौच होते. वेळेत उपचार न मिळाल्यास शरीरातील पाणी कमी होते. हिमोग्लोबिनही कमी होऊन मृत्यूही ओढावू शकतो, असे पशुचिकित्सकांचे निरीक्षण आहे.

कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे श्वानांना अंगखाज होते. कॅल्शिअम हे श्वानांना  मांसाहारातून मिळतो. ते न मिळाल्यास श्वान काळी माती खातात. बऱ्याचवेळा शौच केलेल्या जागेची माती खाण्यात येते. त्यामुळे त्याचा संसर्ग इतरांना होतो. गोचिडसारखा कीटक जो एकदा रक्त शोषले की तो एक महिना अन्न-पाण्याशिवाय राहू शकतो, त्यांचाही कुत्र्यांना त्रास होतो. श्वानांना शहराचे सुरक्षासोबती मानले जाते. योग्यवेळी औषधोपचार मिळाले तर कुत्रे आजारापासून बचावू शकतात.

 – डॉ. राजशेखर दडके, श्वानचिकित्सक