जिल्ह्यातील प्रमुख चार नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, चारही नगरपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावण्यासाठी जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी कंबर कसली आहे. डॉ. क्षीरसागर यांच्या नेतृत्वाचा यात कस लागणार आहे.
वडवणीत इच्छुकांच्या मुलाखती घेताना गावपातळीवरील निवडणुकीतूनच कार्यकर्ता घडतो. त्यामुळे उमेदवारी कोणालाही मिळाली तरी इतरांनी पक्षाला विजयी करण्याचाच विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. चारही नगरपंचायत क्षेत्रात भाजपचे आमदार असल्याने या नगरपंचायतींवर वर्चस्व मिळवण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार मोच्रेबांधणी सुरू केली आहे. येत्या १ नोव्हेंबरला या नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.
भाजपचे आमदार भीमराव धोंडे यांच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातील आष्टी, पाटोदा, शिरूर तर आमदार आर. टी. देशमुख यांच्या माजलगाव मतदारसंघातील वडवणी नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. माजलगावचे राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्रकाश सोळंके व आष्टीचे सुरेश धस यांनी नगरपंचायतीवर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी कंबर कसली आहे. जिल्हाध्यक्ष डॉ. क्षीरसागर यांच्याकडे पक्षाचे जिल्हा नेतृत्व आल्यानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या चारही नगरपंचायतींवर पक्षाचा झेंडा फडकावण्यासाठी स्थानिक नेत्यांबरोबर समन्वय करून त्यांनी तयारी सुरू केली आहे.
वडवणीत पक्षांतर्गत सर्व नेत्यांना एकत्र करून डॉ. क्षीरसागर यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. लोकसभा व विधानसभा निवडणुका, तसेच नगरपंचायतींच्या निवडणुकीत मूलभूत फरक असतो. मोठय़ा निवडणुकीत नेता उभा असतो आणि गावपातळीच्या निवडणुकीतून कार्यकर्ता घडतो. त्यामुळे उमेदवार कोणीही असो, पक्षाचा विजय करण्याचा विचार केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांनी केले. वडवणी नगरपंचायतीत १७ जागा असताना जवळपास शंभर इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यावरून राष्ट्रवादीला चांगला प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला सपाटून पराभव पत्कारावा लागल्यानंतर सर्वच मतदारसंघांत नेत्यांनी जनसंपर्क वाढवत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लक्ष घातले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने दोन ठिकाणी विजय मिळवल्यानंतर आता नगरपंचायतीत मोच्रेबांधणी केली आहे.