औरंगाबाद जिल्ह्य़ातील चार नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा जिंकून काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखले असले तरी दोन पालिकांचे नगराध्यक्षपद जिंकून भाजपने मुसंडी मारली तरी गंगापूरचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही.  शिवसेनेचे भाजपपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले असले तरी गतवेळच्या तुलनेत शिवसेनेची ताकद फार वाढलेली नाही.

पैठण पालिकेच्या प्रचारासाठी भाजपच्या सर्व बडय़ा नेत्यांनी हजेरी लावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह प्रदेशाध्यक्षांनी बरेच प्रयत्न केले होते. अगदी प्रत्येक प्रभाग एका नेत्याला दत्तक देण्यात आला होता. डॉ. भागवत कराड, किशनचंद तनवाणी, दिलीप थोरात ही मंडळी रोज एक चक्कर तरी पैठणला मारत असत. युती न करता सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. त्यात भाजपला यश मिळाले. खरे तर तिसऱ्या टप्प्यातील नगरपालिका प्रचारात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा जाणीवपूर्वक पुढे केला जात होता. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेत जागोजागी गोंधळ घातला. त्यामुळे निवडणुकीमध्ये जातीच्या अंगाने मतदान व्हावे, असाही प्रयत्न केला गेला. तशी जातीच्या अंगाने भाजपनेही रणनीती आखली होती. नारायण कुचे यांच्या कोपरासभा पैठणमध्ये वाढवा, असा संदेशही देण्यात आला होता. चर्मकार समाज अधिक असल्याने तो वळविण्यासाठी केलेले हे खास प्रयत्न जातीच्या अंगाने रणनीती कशी होती, हे सांगण्यास पुरेसा होता. मात्र, नोटाबंदीनंतर ऐनकेनप्रकारेण निवडून येण्यासाठी पैठणमध्ये सर्व काही करण्यात आले. या पालिकेत आता सर्वात कमी वयाचे भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. गंगापूरमध्ये भाजपने जोर लावला होता. आमदार प्रशांत बंब यांनी त्यासाठी प्रयत्न केले होते. येथे भाजपचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वंदना प्रदीप पाटील निवडून आल्या असल्या तरी या पालिकेत भाजपचे केवळ दोन नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेनेचे ८ व काँग्रेसचे ७ नगरसेवक निवडून आले आहेत.

कन्नडमध्ये शिवसेनेकडून उमेदवार निवडीचे स्वातंत्र्य न मिळाल्याने आमदार हर्षवर्धन जाधव यांनी त्यांचे वडील रायभान जाधव यांच्या नावाने आघाडी केली होती. बऱ्याच सभा घेऊनही त्यांना काही यश मिळाले नाही. कन्नडमध्ये संतोष कोल्हे या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांने पुन्हा एकदा गड राखला. गेल्या दहा वर्षांपासून कन्नड नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता होती. सर्वाधिक १३ नगरसेवक आणि नगराध्यक्षपदी स्वाती संतोष कोल्हे निवडून आल्याने काँग्रेसला यश मिळाले. आमदार अब्दुल सत्तार यांनी कन्नड कॉंग्रेसच्या ताब्यात राहावी, यासाठी बरेच प्रयत्न केले होते. आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सेनेच्या नेतृत्वाला दिलेले आव्हानही चर्चेत आले आहे. कन्नडमध्ये एमआयएमचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला. शबाना रंगरेज यांनी अधिक मते मिळवूदेखील भाजप-सेनेच्या उमेदवाराला म्हणावा तसा फायदा झाला नाही. खुलताबादमध्येही काँग्रेसच्या एम. एम. कमर यांनी विजय मिळविला. जिल्हय़ाच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप अग्रेसर दिसत असला तरी संख्याबळ लक्षात घेता काँग्रेसची पकड ढिली झाली असल्याचे मात्र दिसत नाही. तुलनेने शिवसेनेची ताकद मात्र फारशी वाढली नाही.

  1. औरंगाबाद जिल्ह्य़ातील निवडणूक ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वादग्रस्त ‘लक्ष्मीदर्शना’च्या वक्तव्याने गाजली होती. पैठणच्या सभेत दानवे यांनी हे विधान केले होते.
  2. त्या पैठणमध्ये भाजपला यश मिळाले. भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला. मावळत्या पालिकांमध्ये तीन ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेसचे खुलताबाद आणि कन्नडमध्ये नगराध्यक्ष निवडून आले असून, भाजपने पैठण आणि गंगापूरचे नगराध्यक्षपद पटकवले.
  3. शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी स्वत:ची आघाडी स्थापन करून शिवसेनेलाच आव्हान दिले होते. पण आमदार जाधव यांच्या आघाडीला मर्यादित यश मिळाले.
  4. गंगापूर आणि पैठणमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले असले तरी या दोन्ही नगरपालिकांमध्ये भाजपला बहुमत मिळालेले नाही.

नगराध्यक्ष

२ – काँग्रेस</p>

२ – भाजप

नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप अग्रेसर दिसत असला तरी संख्याबळ लक्षात घेता काँग्रेसची पकड ढिली झाली असल्याचे मात्र दिसत नाही.