शंभराहून अधिक करोनाबाधित रुग्णांची वाढ

औरंगाबाद :  निष्काळजीपणाला जवळ करत केली जाणारी गर्दी आणि मुखपट्टी बांधण्याचे कष्टही नकोसे असलेल्या औरंगाबादकरांमुळे विषाणूचे पाय विस्तारत आहेत. शुक्रवारी १०८ रुग्णांची वाढ झाली. तीन हजार २१२ रुग्णांपैकी १७५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. करोनामधील मृत्यूचे प्रमाण मात्र वाढतेच आहे. हर्सूल कारागृहातील पाच जणांना नव्याने लागण झाली आहे. दरम्यान १७७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान शुक्रवारी पुन्हा आणखी एका करोनाबाधित कैद्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून पलायन केले. आतापर्यंत चार कैदी पळाले होते. त्यातील दोघांना पोलिसांनी पुन्हा पकडले.

शहरातील चारशेहून अधिक वस्त्यांमध्ये विषाणूने पाय पसरले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांत करोना चाचणीचा वेग पुन्हा वाढविण्यात आला आहे. आतापर्यंत १७ हजार ४६६ जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यात रोज वाढ होत आहे. आतापर्यंत १४ हजार २०२ जणांचा अहवाल करोना चाचणीला नकारात्मक आला. चाचण्यांचा वेग आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या वतीने ठरवून दिलेल्या निकषानुसारच होत आहेत. मात्र विषाणूने लक्षणे नसणाऱ्या अनेकांमध्ये प्रवेश केला असल्याचेही एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे.  राज्यातील सहा  जिल्ह्यांत करोना चाचणी यादृच्छिकीरण पद्धतीने करण्यात आल्या. बीड, परभणी, जळगाव येथे ३९६ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. तर नांदेडमध्ये ३९६, सांगलीमध्ये ४००, अहमदनगरमध्ये ४०४ तर नांदेडमध्ये ३९३ चाचण्या घेण्यात आल्या. या सर्व जिल्ह्यांमध्ये चार, सहा, पाच आणि दोन रुग्ण आढळून आले. याचा अर्थ केल्या जाणाऱ्या चाचण्यांशिवायही विषाणूने पाय पसरले आहेत. मात्र, अनेकांना लक्षणेही जाणवली नाहीत. लक्षणे  नसणाऱ्यांचे पण बाधित व्यक्तींचे प्रमाण ७० टक्के असावे असा अंदाज आहे. सहा जिल्ह्यांत करण्यात आलेले हे सर्वेक्षण प्रो. डॉ. बलराम भार्गव यांनी केले होते. त्याचे निष्कर्षही जिल्हा पातळीवर कळविण्यात आले आहेत.

चाचण्या, मृत्यूचे प्रमाण आणि रुग्णालये याचा ताळमेळ घातला जात असून रुग्णांना दाखल करून घेण्यास खासगी रुग्णालयांनी  टाळटाळ करू नये तसचे खाटांच्या उपलब्धतेची माहिती दर्शनी ठिकाणी लावावी, असे निर्देश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले आहेत.

आणखी एक कैदी पळाला

हत्येच्या आरोपाखाली हर्सूल मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला कैदी शुक्रवारी सकाळी पळाला. इम्रान बेग नासीर बेग (वय ३५) असे पळालेल्या कैद्याचे नाव असून तो सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १३ मध्ये छाती दुखण्याच्या आजारावर उपचार घेत होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बेगमपुरा पोलीस ठाण्यातून देण्यात आली. दरम्यान, मागील दहा दिवसांपूर्वीच कारागृहातील दोन करोनाबाधित कैदी पसार झाले होते. त्यातील एक कैदी सय्यद सैफला अटक करण्यात पोलिसांना यश आले. मात्र, दुसरा अक्रम नावाचा कैदी अद्यापही फरार आहे. तो करोनाबाधित आहे. दरम्यान, कारागृहातही काही कैद्यांना आणि काही पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झालेली आहे. तीन दिवसांपूर्वी काही कैद्यांनी एसबीओ शाळेतील काचा फोडून गोंधळ घातला होता. कारागृहात कैद्यांची वाढती संख्या लक्षात घेता तुरुंग प्रशासनाने काही कैद्यांना जळगाव रोडवरील एसबीओ शाळेत ठेवले होते.

सात जणांचा करोनामुळे मृत्यू

गेल्या २४ तासात नव्याने सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे. दोन दिवसापूर्वी घाटी रुग्णालय परिसरातील व्यक्तीला उपचारासाठी दाखल करण्यात आले  होते. त्यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला. त्यांच्या लाळेचे नमुने करोनाचाचणीला सकारात्मक आल्याचे शुक्रवारी स्पष्ट  झाले. शिवशंकर कॉलनीमधील ६५ वर्षीय उच्च रक्तदाब असणारा पुरुष, हडको येथील मानसिक आजार असणारा व्यक्ती, आझाद चौक येथील ४४ वर्षांचा व्यक्ती, रोशनगेट भागातील ६५ वर्षीय महिला, रहेमानिया कॉलनी तसेच आकाशवाणी परिसरातील ६७ वर्षांच्या  व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला. यातील एका व्यक्तीस मूत्रपिंडाचा विकार होता तर अन्य एकास उच्च रक्तदाबाचा आजार असल्याचे घाटीतील डॉक्टरांनी कळविले आहे.

नांदेडमध्ये चार रुग्णांमध्ये वाढ

नांदेड जिल्ह्यातील करोनाची रुग्णसंख्या ३०० वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीळकंठ भोसीकर यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळपर्यंत एक रुग्ण आढळलेल्या नांदेड शहरात पुन्हा रात्री तीन रुग्ण आढळले आहेत. यातील हे तिन्ही रुग्ण जिल्ह्याबाहेरून प्रवास करून नांदेड येथे आले होते. हे रुग्ण तिन्ही महिला असून त्या ४५,१२,१६ या वयोगटातील असल्याचे सांगण्यात आले. हे तिन्ही रुग्ण नांदेड  शहरातीलच आहेत.