भाजप-शिवसेनेमध्ये मतभेद वाढत आहेत. केवळ संवादाचा अभाव असल्यामुळे दोन्ही पक्षांतील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हा संवाद बिघडू नये, या साठी नक्की प्रयत्न करतील, असा विश्वास आहे. मात्र, मतभेद असेच ताणले गेले तर सेना सरकारला बाहेरून पािठबा देऊ शकते, असे सूचक वक्तव्य भय्यूमहाराज यांनी केले.
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी भय्यूमहाराज दोन दिवसांपासून जिल्हा दौऱ्यावर आहेत. या निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्याला ज्येष्ठ बंधूप्रमाणे आहेत. त्यांच्याशी आपला नेहमी संवाद असतो. लोकसंवाद यात्रेनिमित्त आपण बाहेर असल्यामुळे मागील काही दिवसांपासून त्यांच्याशी बोलणे झाले नाही. मात्र, दोन्ही पक्षांतील मतभेद केवळ संवादाच्या अभावामुळे निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही पक्षांतील मान्यवर नेते हा संवाद बिघडू नये, या साठी नक्की प्रयत्न करतील आणि सरकार सुरळीत चालू राहील. मात्र, मतभेद ताणले गेल्यास शिवसेना अन्य पर्यायाचा विचार करू शकते, अशा सूचक शब्दांत भय्यूमहाराज यांनी भाष्य केले.
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने सुरुवातीला सावकार आणि बनावट बियाणे व औषधी निर्माण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करायला हवी. परंतु याकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्य तपासणीची नाही, तर त्यांना मानसिक आधार देण्याची गरज आहे. सरकारने आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर व मानसोपचार तज्ज्ञांच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न समजून घ्यायला हवेत, असेही भय्यूमहाराज यांनी सांगितले.
‘शिवसेनेची पाकविरोधी भूमिका रास्त’
शिवसेनेने पाकिस्तानच्या विरोधात घेतलेली भूमिका रास्त असल्याची पाठराखण भय्यूमहाराज यांनी केली. मुंबईवरील दहशतवादी हल्ला आपण अजून विसरलो नाही. देशाचा स्वाभिमान कधीच गहाण टाकणार नाही. त्यामुळे शिवसेनेकडून पाकिस्तानच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेचे आपण जाहीर समर्थन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील काळात शिवसेनेने अशा पद्धतीची भूमिका घेतल्यावर आपण स्वत: तेथे हजर राहू, असेही त्यांनी नमूद केले.