शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेतील एक लाख ७८ हजार तरुण हताश

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद</strong>

आता महिनाभरात आचारसंहिता लागेल आणि नोकर भरती अडकून पडेल.  या भीतीने विवेक धांडे या तरुणाला ग्रासले आहे. २०१२ मध्ये त्याने डी.एड. शिक्षण पूर्ण केले होते. त्याच्या मागेपुढे शिक्षणशास्त्राची ही पदविका घेतलेल्या तब्बल एक लाख ७८ हजार जणांनी शिक्षण पात्रता परीक्षेनंतर अभियोग्यता परीक्षेतही यश मिळविले. या परीक्षेचा निकाल लागून आता १३ महिने झाले आहेत. आचारसंहिता तोंडावर आली आहे आणि अजून रिक्त जागांच्या निश्चितीची बिंदुनामावली तयार झालेली नाही. गेल्या महिन्यात या कामाला सरकारने पुन्हा मुदतवाढ दिली आणि डी.एड पूर्ण होऊन नोकरी नसल्याने तरुणांची धाकधूक वाढू लागली आहे. दर पंधरा दिवसाला रिक्तपदांचा नवा आकडा शिक्षणमंत्री सांगतात. त्यामुळे भरती प्रक्रिया खरेच आचारसंहितेपूवी होईल काय, या चिंतेने डी.एडधारकांना ग्रासले आहे.

नोकर भरती व्हावी म्हणून माहितीच्या अधिकारात रिक्त पदांची माहितीही मिळविण्यात आली. २०१० पासून शिक्षक भरती झालेली नाही.  त्यामुळे राज्यात मुख्याध्यापकांची २२१३ पदे, पदवीधर शिक्षकांची १०२२८ पदे व सहशिक्षकांची ७९७९ पदे रिक्त आहेत. मान्य पदे आणि कार्यरत पदाची वजाबाकी करुन विवेक रिक्तपदांचा अभ्यास सांगत होता. तीन वेळा शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या घोषणांची समाजमाध्यमातून उडवली जाणारी खिल्लीही त्याने दाखविली. वारंवार आश्वासन देऊनही भरती होईल काय आणि झाली तर ती आचारसंहितेपूर्वी होईल काय, या विषयी या क्षेत्रातील उमदेवार शंका व्यक्त करू लागले आहेत. विवेक धांडे, किरणकुमार सोनाळे, संतोष मगर अशी किती तरी सुशिक्षित बेरोजगार मंडळी भरती वेळेवर व्हावी, यासाठी निवेदने देत आहेत. रिक्तपदांचा एकूण आकडा जरी सरकारकडून दिला जात असला तरी जिल्हानिहाय कोणत्या प्रवर्गातील पद भरायचे आहे, याची माहिती अद्याप तयार नाही. स्थानिक स्वराज संस्था, खासगी अनुदानित व विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शाळांकडून बिंदुनामावलीनुसार पदसंख्या कळविण्यात आलेली नाही. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिलेल्या मर्यादेला दोनवेळा मुदतवाढही देण्यात आली. मात्र, काम पुढे सरकत नसल्याने भरती प्रक्रिया लटकेल, या भीतीने अनेक तरुणांना ग्रासले आहे. आचारसंहितेपूर्वी भरती न झाल्यास आम्ही काय करावे, असा प्रश्नच असल्याचे किरणकुमार सोनाळे सांगत होते. जालना आणि हिंगोली जिल्हय़ातील हे तरुण सध्या औरंगाबादमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास करत आहेत. गावी दुष्काळ पडल्याने आई-वडिलांकडून मिळणारी दरमहा खर्चाची रक्कम कमी झाली आहे. आचारसंहितेपूर्वी भरती व्हावी म्हणून काहीजणांनी पाठपुरावाही सुरू केला आहे.