News Flash

‘पीएम केअर’मधील १५० व्हेंटिलेटर निष्कृष्ट; वापराविना यंत्रणा धूळ खात

 साथरोगाच्या काळात व्हेंटिलेअरची कमतरता लक्षात घेऊन व्हेंटिलेटरचा पुरवठा पीएम केअरमधून करण्यात आला.

तक्रार कोणाकडे करायची; खासदार जलील यांचा सवाल

औरंगाबाद: ‘ पीएम केअर’ निधीतून पुरविण्यात आलेले १५० व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे असून त्याचा उपयोग करता येणार नाही, असे औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांनी लोकप्रतिनिधींच्या बैठकीत कबूल केल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. केवळ औरंगाबादच नाही तर खासगी रुग्णालये आणि राज्यातील बहुतांश घाटी रुग्णालयातील व्हेंटिलेटरची अशीच अवस्था असल्याचा दावा केला जात आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी व्हेंटिलेटर वापरात येत नसल्याचे बैठकीत सांगितल्यानंतर प्रशासकीय पातळीवर प्रकरण ढकलण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, व्हेंटिलेटरची निकृष्टता एवढी अधिक आहे की ते वापरातच आणता येत नसल्याने सर्व यंत्रणा धूळ खात पडून आहे. साथरोग टीपेला असताना पंतप्रधानांची बदनामी होत असल्याने उत्पादक कंपनीच्या तंत्रज्ञाला बुधवारी खास बोलावून घेण्यात आले. तपासणी सुरू झाली असली तरी निकृष्ट व्हेंटिलेटर खरेदी झाली असली तरी तक्रार कोणाकडे करायची असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

साथरोगाच्या काळात व्हेंटिलेअरची कमतरता लक्षात घेऊन व्हेंटिलेटरचा पुरवठा पीएम केअरमधून करण्यात आला. ते व्हेटिंलेटर मिळाल्याची छायाचित्रेही भाजप नेत्यासह प्रसिद्धीस देण्यात आली. पण ही यंत्रसामुग्री बसविल्यानंतर रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा हव्या त्या दाबाने होईल असे मात्र घडत नव्हते. त्यामुळे सारे व्हेंटिलेटर एका बाजूला काढून ठेवण्यात आले. या अनुषंगाने बोलताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, ‘जिल्हाधिकारी बैठकांमध्ये सांगत असलेला आकडा आणि प्रत्यक्षात सुरू असणारे व्हेटिंलेटर यामध्ये मोठी तफावत होती. खरे तर ही सामुग्री हाताळण्यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळ आवश्यक असते. पण यंत्रे फारशी योग्य नाहीत असे लक्षात येताच ती ग्रामीण भागासाठी वितरित करण्यात आली. तेथे ती यंत्रणा चालवू शकतील असे डॉक्टर नाहीत. परिणामी सदोष यंत्रांची माहिती बाहेर आली नाही. आता घाटी रुग्णालयातील यंत्रसामुग्री पडून असल्याचे लक्षात आल्यानंतर सारे यंत्रच निकृष्ट असल्याचे पुढे येत आहे. आता थेट ‘पीएम केअर’मध्येच एवढे सारे घडत असेल तर तक्रार तरी कोणाकडे करायची?’ केवळ औरंगाबादच नाही तर राजस्थान, पंजाबमधून येणाऱ्या व्हेंटिलेटरविषयी प्रसिद्ध होणारी माहिती कमालीची निराशा आणणारी आहे.

वैद्यकीय अधिकारी हे यंत्र आता उपयोगाचे नाही असे सांगत असल्याने भाजपच्या नेत्यांनी मंगळवारी घाटी रुग्णालयातील व्हेटिंलेटरची पाहणी केली. उत्पादक कंपनीला दूरध्वनी केले. ‘मेक इन इंडिया’मधील ही कंपनी असून या कंपनीने आता तपासणीसाठी अभियंते पाठविले आहेत. साधारणत: एक व्हेंटिलेटरची किंमत २० ते २२ लाख रुपये असते. आता देण्यात आलेले व्हेटिंलेटरची किंमत तशी कमी आहे, पण त्याचा रुग्णांसाठी उपयोग होत नाही. दरम्यान अतिदक्षता विभागात ‘व्हेंटिलेटर’ न मिळाल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे.

मराठवाड्यात काही जिल्ह्यात रुग्ण उपचाराअभावीही कोसळत असल्याचे दिसून येत आहे. अशा काळात व्हेंटिलेटरची खरेदी एवढी निकृष्ट कशी झाली आणि त्याची तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न आहे. कारण अधिकारी या विषयावर व्यक्त व्हायला तयार नाहीत.

‘सर्व पातळीवर आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत आहे. त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये नाना प्रकारचे घोळ घालणे सुरू आहे. ‘पीएम- केअर’मधील व्हेंटिलेटरदेखील असाच प्रकार आहे. केवळ राज्यात नाही तर अनेक राज्यातून असेच अहवाल मिळत आहेत. पण प्रश्न पुन्हा तोच आहे की आता थेट पंतप्रधानांच्या निधीतून अशी खरेदी होत असेल तर लेखी तक्रार तरी कोणाकडे करणार? – इम्तियाज जलील, खासदार औरंगाबाद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 12:03 am

Web Title: pm care 150 ventilator mim mp imtiaz jalil akp 94
Next Stories
1 पुरवठादारांकडून खासगी रुग्णालयांसाठी प्राणवायूच्या दरांत वाढ
2 आपत्तीत तत्परता अन् दिरंगाईही
3 धुळे महापौरपदाचे इतर मागासवर्गीयांसाठीचे आरक्षण रद्द
Just Now!
X