निर्यातक्षम दुचाकी उत्पादनात मात्र स्थिरता

औरंगाबाद- करोना संसर्ग वाढल्यामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधाचे परिणाम एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ापासून औद्योगिक क्षेत्रावर पडू लागले आहेत. स्थानिक पातळीवर होणारी दुचाकी आणि तीनचाकी व चारचाकी वाहनांची विक्री पूर्णत: थांबली आहे. मात्र, निर्यातक्षम उत्पादनावर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही.  एप्रिल महिन्यात तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये टाळेबंदी लागल्यापासून उत्पादनाचा वेग क्षमतेच्या  ६० ते ४० टक्क्य़ांवर आला आहे. मार्चअखेपर्यंत औद्योगिक क्षेत्रातील वीज वापराची आकडेवारी उत्पादन आलबेल असल्याचे सांगणारी होती.

दुचाकीच्या क्षेत्रातील नामांकित बजाज कंपनीचे उपाध्यक्ष कैलास झांझरी म्हणाले, की ‘गेल्या वेळीच्या टाळेबंदीपेक्षा आजची स्थिती चांगली आहे. निर्यातक्षम दुचाकी निर्मितीस आणि विक्रीस परवानगी असल्यामुळे ५० टक्के मनुष्यबळाच्या कार्यक्षमतेवर काम सुरू आहे. कोविडच्या सर्व नियमांचे पालन करत आहोत. त्यामुळे जवळपास ७० देशांमध्ये होणारा  दुचाकी निर्यातीचा व्यवसाय कायम आहे. फिलिपिन्स, ब्राझील, बांगलादेश आणि युरोपातील काही देशांतही निर्यात होत आहे. मात्र, स्थानिक बाजारपेठात होणारी विक्री थांबलेली आहे.’  औद्योगिक क्षेत्रात वेगवेगळ्या उत्पादनांवर परिणाम होत असल्याचे ‘सीआयआय’ या संघटनेचे अध्यक्ष रमण आजगावकर यांनी सांगितले. टाळेबंदीनंतर मागणी पुरवठय़ाची साखळी तुटते, त्याचे परिणाम जाणवत आहेत. ऑटो क्षेत्रावर तसेच इलेक्ट्र्नॉनिक आणि घरगुती उपकरण निर्मितीच्या क्षेत्रातही आता परिणाम दिसू लागले आहेत.  औरंगाबाद हे दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी गाडय़ांच्या निर्मिती देशातील महत्त्वाचे केंद्र आहे. मोठय़ा दुचाकी कंपनीला लागणारे वेगवेगळे सुटे भाग तयार करणाऱ्या अनेक कंपन्या औरंगाबाद येथे आहेत. त्यांच्या उत्पादनांवर मोठा परिणाम दिसून येत आहे. वाहन उद्योग क्षेत्रातील उद्योजक उमेश दाशरथी म्हणाले की, करोना संसर्गाचा वेग वाढल्यानंतर निर्बंधांमुळे तसेच मागणीत घट झाल्यामुळे एप्रिलमध्ये उत्पादनात घट दिसून येत आहे. लसीकरणाच्या वेगावर आता उद्योगाची गणिते अवलंबून असणार आहे.  मार्चपर्यंत मात्र उद्योगाचा वेग फारसा मंदावला नव्हता. वीज वापराच्या आकडेवारीवरूनही ते स्पष्ट होत आहे. मार्चपर्यतचा वीज वापर असा होता

जानेवारी महिन्यात औरंगाबाद शहरातील औद्योगिक क्षेत्रात १६०.६७ दशलक्ष युनिट वीज वापर झाला. फेब्रुवारीमध्ये तो १००.७० दशलक्ष युनिट वापर होता. तर मार्चमध्ये तो वापर १०८.८६ होता. औरंगाबाद विभागातही वीज वापरातील फरक फारसे दिसून आले नाही. मात्र, एप्रिलमध्ये त्यात मोठी घट असल्याचे सांगण्यात येते.