राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असून त्यानुसार त्यांनी विदर्भ व मराठवाडय़ाचा नियोजित दौरा रद्द केल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले.

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार पवार येथील ‘स्वाराती’ मराठवाडा विद्यापीठाची मानद डी.लिट. पदवी स्वीकारण्यासाठी गुरुवारी सायंकाळी यवतमाळ जिल्ह्यातून नांदेडमध्ये येणार होते; पण १५ ऑगस्ट रोजी त्यांच्या कार्यालयाने विद्यापीठ प्रशासनाकडे ई-मेल पाठवून पवार येऊ शकत नाहीत, असे कळविले. या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच वरील संदेश आल्याने विद्यापीठ प्रशासन गडबडले. मुख्य म्हणजे दौरा रद्द होण्याचे नेमके कारण त्यावेळी पुढे आले नाही. नांदेडला मुक्काम करून १९ रोजी पवार उस्मानाबादला जाणार होते. शेकापचे दिवंगत नेते भाई उद्धवराव पाटील यांच्यावरील चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन पवारांच्या हस्ते निश्चित झाले होते; पण हा कार्यक्रमही बारगळला आहे.

पवार यांनी पुसद येथील कार्यक्रमाला आपल्याऐवजी खासदार प्रफुल्ल पटेल यांना पाठविले. त्यानुसार ते गुरुवारी सकाळी विशेष विमानाने येथे आले व येथून मोटारीने पुसदला रवाना झाले. त्यांच्या आगमनाप्रसंगी विमानतळावर पक्षाचे मोजके स्थानिक नेते हजर होते.

त्यानंतर बाहेर आलेली माहिती अशी की, गेल्या काही दिवसांत दौरे व कार्यक्रमांमुळे अति दगदग झाल्याने पवारांना थकवा जाणवत होता. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना काही दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असून पवार बारामतीत विश्रांती घेणार आहेत.