करोनाच्या भयामुळे घराबाहेर पडता येत नाही. जे कोणी अनावश्यक फिरतात त्यांनाही पोलीस रोखतात. अशा स्थितीत ज्या औरंगाबाद शहरामध्ये कचऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण होत असे, तेथील सफाई कामगार आणि कचरावेचक सध्या दररोज कचरा उचलण्यासाठी येतात. अनेकांच्या हातातून कचरा घेताना त्यांच्या हातांना स्पर्श होऊ नये याची काळजी घेतात. ज्या व्यक्ती रुमाल बांधत नाहीत, त्यांना रुमाल बांधून या, असे सांगतात! त्यांचे हे सामाजिक योगदान लक्षात घेता काही मंडळींनी धन्यवाद मोहीम सुरू केली आहे.

आपापल्या गल्लीतील सफाई कामागाराचे छायाचित्र समाजमाध्यमांवर टाकून त्यांचे कौतुक करा, अशी मोहीम शहरात सुरू आहे. काही कचरावेचक महिलांना धान्य आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही केला जात आहे. त्या प्रयत्नांमुळे शहराच्या हितासाठी घराबाहेर पडणाऱ्या यंत्रणेचे बळ वाढेल, असा दावा केला जात आहे.

औरंगाबादसह विविध शहरांमध्ये कचरा प्रक्रिया उद्योगाला नवी दिशा आणि गती देणाऱ्या नताशा झरीन म्हणाल्या की, ‘‘कचरावेचक आणि सफाई कामगार यातील फरक आपण समजून घ्यायला हवा. जे लोक शहरातील रस्त्यांवर रोज भंगार गोळा करून विकायचे, त्यांचे प्रश्न आता गंभीर बनले आहेत. कारण आता भंगार गोळा करून त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग सध्या बंद पडल्याने ही साखळी पूर्णत: कोलमडली आहे.’’

शहरात कचरा वेचक म्हणून काम करणाऱ्या दीडशे ते दोनशे जणांना एक महिना पुरेल एवढे रेशन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. कचरावेचकांना बाहेर पडता येत नसल्याने त्यांच्या कामाचा भार सफाई कर्मचाऱ्यांवर पडत आहे. त्याचबरोबर दररोजचा ओला आणि कोरडा कचरा वेचण्याचे कामही ते करत आहेत. त्यांना धन्यवाद देण्यासाठी समाजमाध्यमांवर प्रत्येकाने ‘थॅन्क यू’ म्हणावे अशी मोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती झरीन यांनी दिली. या मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागरिक सफाई कर्मचाऱ्यांच्या फराळाची सोय करीत आहेत. आणखी २०० कचरावेचक कुटुंबापर्यंत पोहोचण्यासाठी दोन लाख रुपयांची गरज भासणार आहे.

मदतीसाठी पुढाकार

‘‘किराडपुरा भाागातील सोहेल पठाण, शोभा नरवडे, कुसूम जगदाळे यांसह सर्व चमूचे धन्यवाद,’’ असा संदेश सिद्धार्थ नावाच्या तरुणाने टाकला.  औरंगाबाद शहरातील बजाज माझी स्वच्छ सिटी, अन्न वाचवा समिती, सहयोग फाऊंडेशन यासह सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था स्वच्छतेच्या क्षेत्रातील व्यक्तींची काळजी घेण्यासाठी पुढे आल्या आहेत. आतापर्यंत या कर्मचाऱ्यांचे कोणी कौतुक करीत नव्हते, पण आता काही नागरिक आवर्जून त्यांची छायाचित्रे समाजमाध्यमांवर झळकवू लागले आहेत. कचरावेचकांच्या आयुष्यावर मात्र टाळेबंदीचा मोठा परिणाम जाणवत असून त्यांना मदत करणे हे मोठे काम अनेकांनी करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

कचरा उचलण्याचे काम विनाव्यत्यय

औरंगाबाद शहरातून साधारणत: साडेचारशे टन कचरा रोज उचलला जातो. टाळेबंदीनंतर ती सेवा खंडित न होऊ देणे, हे महापालिका प्रशासनाचे यश मानले जात आहे. महापालिका आयुक्तही या कामी लक्ष ठेवून आहेत. सफाई कर्मचाऱ्यांनी हातमोजे व नाकाला बांधूनच काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. सफाई कर्मचाऱ्यांना धन्यवादाबरोबरच त्यांची काळजी घेतली जात असल्याचे चित्र करोनाच्या पाश्वभूमीवर दिसून येत आहे. फक्त हा बदल व्हायला काहीसा उशीर झाला, अशीही प्रतिक्रिया आता उमटत आहे.